Studied and profitable cultivation of three varieties of dragon fruit
Studied and profitable cultivation of three varieties of dragon fruit Agrowon
ॲग्रो विशेष

तीन वाणांच्या ड्रॅगन फ्रूटची अभ्यासू अन् फायदेशीर शेती

शामराव गावडे

सांगली जिल्ह्यात दुष्काळी जत तालुक्यातील प्रतापपूर येथील युवा शेतकरी अझरुउद्दीन बाबू शेख यांनी सुमारे सहा वर्षांपासून ड्रॅगन फ्रूट (Dragon Fruit) शेतीत सातत्य ठेवले आहे. सुमारे तीन वाण तसेच लोखंडी व सिमेंट खांबांची रचना व अलीकडे कमी खर्चातील मांडव असे प्रयोग, अभ्यास व व एकूण व्यवस्थापनातून एकरी १० ते १२ टन उत्पादकता व तीन बाजारपेठांत चांगले दर मिळवून शेतीचे अर्थशास्त्र सुधारले आहे.

सांगली जिल्ह्यातील जत हा अवर्षणग्रस्त तालुक्यात प्रतापपूर गाव आहे. या तालुक्यातील म्हणा किंवा गाव परिसरातील बरीचशी शेती निसर्गाच्या भरवशावर असणारी आहे. या ठिकाणच्या जमिनीत पाण्याचे स्रोत शोधून शाश्‍वत पाणी शेतीला निर्माण करणे आणि त्यातून वेगळे प्रयोग करणे हे शेतकऱ्यांचे स्वप्न असते. ते प्रत्यक्षात उतरणे म्हणजे देखील महाकष्टाचे काम. परंतु येथील जिद्दी शेतकऱ्यांनी ते करून दाखवले आहे. त्यापैकी अझरुद्दीन शेख हे होत.

सुरुवातीचे प्रयत्न

अझरुद्दीन यांचे वडील बाबू शेख माध्यमिक शिक्षक होते. शेतीची आवड होती. परंतु जमीन कमी होती. ते २००८ मध्ये सेवानिवृत्त झाले. त्या पैशांतून गावाजवळ पाच एकर शेती खरेदी केली. जमिनीचे सपाटीकरण करून बाजरी शाळू गहू अशी पारंपरिक पिके ते घेऊ लागले. सन २०१२ मध्ये विहीर घेतली. त्यास चांगले पाणी लागले आणि शेख यांचा उत्साह दुणावला. नंतर ते पपई, केळी अशी पिके घेऊ लागले. या भागात वरदान असणारे व कमी पाण्यावर येणारे म्हणून डाळिंब पिकाची ओळख आहे. डाळिंबातील प्रगतिशील शेतकरी या भागात पाहायला मिळतात. बाबू शेख यांनीही एक एकरावर त्याची
शेती केली. परंतु रोगराईला हे पीक पहिल्यांदाच बळी पडले. निराश होऊन बागच काढून टाकली.

ड्रॅगन फ्रूटचा प्रयोग

बाबू शेख यांचा मुलगा अझरुद्दीन हे देखील क्रिडा शिक्षक आहेत. मात्र त्यांनाही शेतीची आवड होती.
शेतातच राहायला असल्याने रोजचा अनुभवही होता. जत तालुक्यात व अन्यत्र ड्रॅगन फ्रूट पीक रुजत असल्याकडे त्यांचे लक्ष वेधले. उमेद दांडगी होती. या पिकाबाबत अधिक माहिती घेण्यास सुरवात केली. ५० हून अधिक शेतकऱ्यांच्या प्लॉटला भेटी दिल्या. गुजरातपर्यंत जाऊन आले. या पिकाला लागणारे कमी पाणी व मिळणारा चांगला दर त्यामुळे आपणही हा प्रयोग करून पाहू असे ठरविले.
त्याचवेळी शेतीची सर्व जबाबदारी वडिलांनी अझरुद्दीन यांच्याकडेच दिली. मग शेतीची धुरा खांद्यावर घेतल्यावर नोकरी आणि शेती असे हातात हात घालून चालायचे सूत्र ठेवले.

प्रयोगातील अनुभव

सुरुवातीला सन २०१६ मध्ये एक एकरांत लागवड केली. भांडवली खर्च जवळपास आठ ते दहा लाख रुपये आला होता. एकरी फक्त आठशे किलो माल निघाला तर दर मिळाला अवघा ३५ रुपये प्रति किलो. अझरुद्दीन नाराज झाले. पण त्याच वेळी आपले काय चुकले याचा अभ्यास सुरू केला. शेतकऱ्यांशी चर्चा केली. व्यवस्थापनात सुधारणा केल्या. त्याचा फायदा मिळू लागला.
सुरुवातीला केवळ शेणखत व काही प्रमाणात ‘एनपीके’ खते द्यायचे. मग ८० टक्के सेंद्रिय व
२० टक्के रासायनिक खते असे संतुलन ठेवले. निंबोळी पेंड, अमिनो ॲसिड, फुल्व्हिक ॲसिड,
जिवाणू कल्चर यांचाही वापर सुरू केला.


आजची ड्रॅगनफ्रूट शेती- ठळक बाबी

-सध्या चार एकरांवर ड्रॅगन फ्रूट. रोपे गुजरातहून आणली आहेत.
- या शेतीत मंडप किंवा बाग उभारणीचा खर्च मोठा असतो. त्यामुळे तो कमी करण्याच्या उद्देशाने विविध पद्धतींचा अवलंब केला. दोन एकरांत लोखंडी ॲगलवर बाग आहे. त्याचा एकरी १० लाखांपर्यंत येतो. एक एकरांत सिमेंट पोल व प्लेट पद्धत आहे. त्याचा खर्च एकरी साडेतीन लाख रुपये येतो. अलीकडेच कमी खर्चिक प्लेटरहित व्हिएतनाम पद्धतीने एक एकरांत लागवड केली आहे. त्याचा
खर्च दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत येतो. शेतकऱ्यांना सर्व पद्धतीच्या बाग पाहण्यास उपलब्ध असल्याचे अझरुद्दीन सांगतात.
-तीन वाण. यातील एक वाण आतून जांभळट लाल (जम्बो पर्पल रेड). दोन पांढऱ्या रंगाचे.
-संपूर्ण क्षेत्रावर ठिबक
-सुरुवातीला पाणी कमी लागते फळधारणेनंतर आठवड्यातून दोन वेळा जास्तीत जास्त एक तास.
-जून-जुलैला लागवड. वर्षानंतर फळे काढणीयोग्य.
-उत्पादन- वाणनिहाय बदलते. चार वर्षांनंतर उत्पादनात स्थिरता येण्यास सुरुवात. एकरी १० ते १२ टन. सुरुवातीच्या वर्षांत ते कमी मिळते.
-पहिली दोन ते तीन वर्षे उत्पादन व उत्पन्न कमी असल्याने बागेतील मधल्या पट्ट्यात कांदा, लसूण हरभरा अशी कमी उंचीची पिके घेत उत्पन्न मिळवले आहे.


अर्थशास्त्र
अझरुद्दीन सांगतात की सांगली. कोल्हापूर व मुंबई या तीन बाजारपेठांना माल पाठवतो.
प्रति किलो सरासरी दर ७०, ८० ते १०० रुपये मिळतो. कमाल दर १७० ते २४० रुपयांपर्यंत मिळाला आहे. खते, कीडनाशके, तोडणी पॅकिंग असा उत्पादन खर्च प्रत्येक वर्षी एक लाख रुपये येतो.
एकरी १० टन उत्पादन व किलोला ५० रुपये दर मिळाला तरी पाच लाख एकूण व निव्वळ उत्पन्न
चार लाख रुपयांपर्यंत मिळू शकते. द्राक्ष, डाळिंब व ऊस आदी पिकांच्या तुलनेत देखभालही
कमी असल्याचे अझरुद्दीन सांगतात. लागवडीबरोबर आता रोपांची प्रति नग चाळीस रुपये दराप्रमाणे विक्रीही सुरू केली आहे. त्यातून वर्षाला चांगले उत्पन्न मिळू लागले आहे. प्रसिद्ध क्रिकेटपट्टू व भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्या रांची येथील शेतावर शेख यांच्या शेतावरून रोपे गेली असल्याचे सांगण्यात आले.

संपर्क ः अझरुद्दीन शेख, ९४०३१८०३९७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

SCROLL FOR NEXT