Paddy SRT Technology
Paddy SRT Technology Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy SRT Technology : आदिवासी भागात रुजतेय ‘एसआरटी’ तंत्रज्ञान

Team Agrowon

मुकुंद पिंगळे

Paddy Production : गावंधपाडा (ता. पेठ, जि. नाशिक) येथील प्रयोगशील शेतकरी यशवंत गावंडे यांनी २०२० पासून भात पिकात एसआरटी (सगुणा राइस टेक्निक) तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला. त्याद्वारे उत्पादनात एकरी चार क्विंटल वाढ त्यांनी साधली आहे. याच तंत्रज्ञानाने ते अन्य पिकांचे प्रयोग घेऊ लागले आहेत. जिल्ह्याच्या आदिवासी व अन्य पट्ट्यात शंभरहून अधिक शेतकरी या तंत्राचा वापर करून मजुरीबळ, उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात बचत करू लागले आहेत.

नाशिक जिल्ह्यातील पश्‍चिम भाग प्रामुख्याने आदिवासीबहुल आहे. सर्वाधिक भाताचे उत्पादन या भागात घेतले जाते. पारंपरिक भातशेतीत श्रम अधिक लागतात. उत्पादन खर्चही दिवसेंदिवस वाढत आहे. मजुरांची मोठी टंचाई निर्माण झाल्याने कामे वेळेवर पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. पेठ तालुक्यातील गावंधपाडा येथील सेंद्रिय कृषिभूषण शेतकरी यशवंत महादू गावंडे यांनी या समस्या सोडविण्यासाठी एसआरटी (सगुणा राइस टेक्निक) तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे ठरविले. कर्जत (जि. रायगड) येथील प्रगतिशील शेतकरी चंद्रशेखर भडसावळे यांनी ही पद्धत विकसित केली
आहे.

...अशी झाली तंत्रज्ञान वापरास सुरुवात

गावंडे यांनी वनराज शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली आहे. ते कंपनीचे अध्यक्ष आहेत. ४६० शेतकरी सभासद आहेत. नाशिक- मोहाडी येथील प्रसिद्ध सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे मध्यंतरी प्रयोगशील भात उत्पादकांच्या शोधात होते. त्यांची गावंडे यांच्याशी भेट झाली. त्यातून भातशेतीतील खर्च कमी करण्यासाठी एसआरटी तंत्रज्ञान वापरण्यासंबंधी शिंदे यांनी त्यांना सुचविले. श्री. भडसावळे यांचे मार्गदर्शन घेत जून २०२० पासून गावंडे यांनी या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास सुरुवात केली.

गावंडे यांच्या एसआरटी तंत्र व्यवस्थापनातील मुद्दे

-सुरुवातीला जमिनीची खोलवर नांगरट.
-त्यानंतर ढेकळे फोडून रोटाव्हेटरद्वारे माती बारीक करून घेण्यात येते.
-सारायंत्राद्वारे साडेचार फूट रुंद, अर्धा फूट उंच आणि १०० सेंमी माथा असलेल्या गादीवाफ्याची (बेड) बांधणी होते. त्या वेळी शेणखत व गांडूळ खताचा वापर.
-साचा वापरून ९ बाय ९ सेंमी अंतरावर भात बियाणे टोकण. सोबत शिफारशीनुसार रासायनिक
खताचाही वापर. इंद्रायणी वाणाचा वापर होतो.
-कापणी लागवडीनंतर सुमारे ११० दिवसांनंतर होते. गावंडे सांगतात, की एसआरटी पद्धतीत
भात पीक काढणीस तुलनेने लवकर येते.

पुढील पिकांचे नियोजन

-भातकापणीनंतर दुसरे पीक घेण्यासाठी गादीवाफ्याची ओलवणी.
-त्यानंतर तणनाशकाची फवारणी. आधीच्या पिकाचे फुटवे जमिनीतच कुजविले जातात.
-त्यानंतर रब्बी हंगामात याच बेडवर गावंडे यांनी मधुमक्याचा तर उन्हाळी हंगामात भुईमुगाचा प्रयोग केला आहे. मक्यासाठी १८ बाय
१८ सेंमी तर तूर व उडीद या पिकांसाठी ९ बाय ९ सेंमी अंतर वापरले.
- या पद्धतीत पीक तसेच तणांचे अवशेष जमिनीतच कुजल्याने सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत.

उत्पादन

पूर्वी पारंपरिक पद्धतीत गावंडे यांना एकरी १६ ते १७ क्विंटल उत्पादन मिळायचे. एसआरटी तंत्रज्ञानाच्या वापरातून हेच उत्पादन २० ते २१ क्विंटल मिळू लागले आहे. एकरी तीन ते चार क्विंटलची वाढ त्यातून झाली आहे. वनराज कंपनीतर्फे शेतकऱ्यांकडील भात प्रति किलो २८ ते ३० रुपये दराने खरेदी करण्यात येतो. तो पुढे ‘सह्याद्री’ कंपनीला पुरवण्यात येतो. या तंत्राद्वारे उत्पादित मधुमक्याचे एकरी सहा ते सात टन उत्पादन मिळाले आहे. गावंडे सांगतात, की या तंत्रज्ञानात नांगरणी करावी लागत नाही. शून्य मशागत तंत्राचा वापर होतो. त्यामुळे नांगरणी, मजुरी खर्चात मोठी बचत होते. मजूरबळ कमी लागते. एकूण उत्पादन खर्चात ५० ते ६० टक्के बचत होते.

शेतकऱ्यांकडून तंत्राचा अवलंब

गावंडे सांगतात, की ‘एसआरटी’ तंत्राचा वापर आता पेठ, दिंडोरी, त्र्यंबकेश्‍वर. सुरगाणा भागातील १०० हून अधिक शेतकरी करू लागले आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ते उपयुक्त ठरत आहे.
भात पिकात या तंत्राचे सकारात्मक परिणाम दिसून आल्यानंतर नागली, उडीद, तूर, मधुमका
आदी पिकांत त्याचे प्रयोग शेतकरी करू लागले आहेत. आदिवासी भागात रेशीम शेतीचा विस्तार होत असताना येथील रेशीम उत्पादकांनी तुतीची लागवड याच पद्धतीने करण्यास सुरुवात केली आहे.
नाशिक जिल्ह्याचा पश्‍चिम भाग पाणलोट क्षेत्र आहे या भागात अधिक पर्जन्यमान होत असल्याने
माती मोठ्या प्रमाणात वाहून जाते. एसआरटी पद्धत व शून्य मशागत तंत्रातून जमिनीची धूप थांबण्यास मोठी मदत झाली आहे त्यामुळे ही पद्धत पर्यावरणपूरक असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.

प्रतिक्रिया :

एसआरटी तंत्रज्ञान निवडण्यामागचे मुख्य कारण म्हणजे लहान शेतकऱ्यांचे कष्ट आणि पैसा यात बचत होते. जमिनीची सुपीकता वाढून उत्पादनात वाढ होते. सुरुवातीला तयार केलेल्या बेडवरच पुढील पिके घेता येतात. नांगरणी, मशागतीवर होणारा हजारो रुपयांचा खर्च वाचतो. ही मोठी जमेची बाजू आहे.
-यशवंत गावंडे, ९४२३०७०९१११

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Zero Tillage Technique : आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात वाहते शून्य मशागत तंत्राचे वारे

Crop Insurance : पीकविम्यासाठी अंतिम मुदतीची वाट पाहू नये

Crop Competition : खरीप हंगामासाठी पीक स्पर्धा

Farmers Protest : कर्जमाफी, पीकविमा भरपाईसाठी ‘रास्ता रोको’

Jackfruit Research : फणस संशोधन केंद्राचा प्रस्ताव निधी मंजुरीच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT