लेखक- धनंजय सानप
दवाखान्यातल्या (Clinic) भकास वातावरणात मोबाईल स्क्रीनवर (Mobile Screen) बोट फिरवत बसलेले सुन्या आणि शऱ्या अधूनमधून सलाईनच्या बाटलीकडे बघत होते. सलाईन अर्ध्याच्यावर संपलं होतं. आज्जी अर्ध झोपत होती. शऱ्याच्या गुडघ्यातून अर्ध दुमडलेल्या पायांना आता कळ लागत होती. म्हणून त्यानं पाय लांब केले आणि अंग मोडत आळस दिला. सुन्या आज्जीच्या शेजारीच कॉटवर बसून होता. त्याला रिडींग हॉलमध्ये (Reading Hall) बसण्याची सवय असल्यानं असं नुसतं बसून राहणं कंटाळवाणं वाटत नव्हतं. पण इथं ठराविक वेळेनंतर आज्जीची चुळबूळ सुरू होती. त्यानं त्याला थोडसं अंग चोरून घ्यावं लागतं होतं. अधूनमधून कानाजवळ गुणगुणारे मच्छर त्याला त्रास देत होते. आज्जी कदाचित मच्छरांमुळेच चुळबुळ करत होती.
मच्छर कानाजवळ येऊन गुणगुणायला लागले की, माणसानं तिथून उठून दोन मिनिटं उभं राहावं. मच्छर मारायच्या भानगडीत पडू नये. एका सेंकदात मच्छर ४०० वेळेस पंख फडफडत राहिली की, त्यांची गुणगुण कानाला त्रासदायक वाटते. मच्छरांची मादी माणसांच्या कानाजवळ येऊन गुणगुणत राहते, असं त्यानं बसस्टँडवरच्या बुक डेपोतून विकत घेतलेल्या जीकेच्या पुस्तकात वाचलं होतं. त्याला ते आत्ताच का आठवावं, असंही वाटून गेलं. पण आपल्याच मनावर आपलाच बऱ्याचदा ताबा नसतो. म्हणून त्यानं दुसऱ्या कशाचा तरी विचार करायचं ठरवलं. इंस्टा ओपन करून भकाभका दिसेल त्याला लव दिले.
त्याला गुलजारांच्या अनेक ओळी आवडायच्या. म्हणून त्यानं गुलजारांच्या फॅन्सचे चार पाच पेज फॉलो करून ठेवलेली होती. रिकामा वेळ मिळाला की, इंस्टाला जाऊन पेजच्या कमेंट बॉक्समधील कमेंट वाचूनही त्याला बरं वाटायचं. खरंतर यातल्या कित्येक ओळी गुलजारांच्या नावानं खपवलेल्या असतात, पण त्याचं त्याला काही देणंघेणं नव्हतं. मन रमवायला मिळतं याचं त्याला समाधान अनुभवायचं असायचं.
इकडं येताना इअरफोन घेऊन यायला हवं होतं. गाणी ऐकत बसता आलं असतं, असं मनातल्या मनात सुरूच होतं. पण खरंतर इथल्या परिस्थितीत गाणी ऐकणं बरं वाटलं नसतं. असाच आडवातिडवा मोघम विचार सुरूच होता. आता त्यानं उगाच शऱ्याचा अंदाज घ्यायला सुरुवात केली होती. शऱ्याच्या आज्जीकड त्याचा बाप म्हणतो तसा आज्ज्यानं पैसा ठेवला असेल का आणि असलाच तर आज्जी कुणासाठी तो लपून ठेवत असेल, तिनं कुठं ठेवला असेल, शऱ्यासाठी लपून ठेवला असणार. कदाचित शऱ्यालाच ते माहीत नसावं. शऱ्याला याबद्दल छेडायला हवंय कधीतरी. आत्ता विचारलं तर त्याला वाईट वाटेल, म्हणून त्यानं तोही विचार अर्धवट सोडून दिला. मनात चाललेल्या या गोंधळात तो रमत चालला होता. दुसरीकडे मोबाईलच्या स्क्रीनवरून बोट फिरवणं सुरूच होतं. मधेच दादांचं बोलणं आठवलं. पुन्हा गोंधळ वाढत गेला. या गोंधळाच्या एका वर्तुळातून दुसऱ्या वर्तुळात जाताना असंबंध गोष्टी सुरू होत्या.
तेवढ्यात शऱ्या हाताचा कोपरा चोळत म्हणला, "मायला या मच्छारानं एक लई ताण दिलाय." त्या वाक्यानं सुन्याच्या डोक्यातलं चक्र उलटं फिरायला लागलं. शऱ्याच्या जागी आपण असतो तर या परिस्थितीत काय केलं असतं. कदाचित त्याच्या इतका खमकेपणा आपल्यात आला नसता. कदाचित आपण सगळं सोडून दूर कुठंतरी पळून गेलो असतो. आजवर आपण वेगळं केलंय तरी काय? सतत कशापासून तरी पळत आलोत. नैराश्याची झालर झटकत त्यानं विचार करणं थांबवलं. आजूबाजूला नजर फिरवत दवाखानातला कॉट, भिंतीचा पिवळा रंग, टेबलवर ठेवलेलं सामान आणि बंद पडलेला फॅनवरून त्याची नजर भिरभिरत होती. सगळंच एकाच वेळी निरर्थक वाटायला लागलं. अशा निरर्थकपणाचे उमाळे कित्येक वेळा त्याला दाटून यायचे. त्यात दवाखान्यातला वास नाकात शिरत होता. त्यानं दीर्घ श्वास सोडत अंग मोकळं सोडण्याचा प्रयत्न केला. पण तोही फसला होता.
खैरबांडेच्या दवाखान्यात या वेळेला मच्छरांशिवाय कुणीच येणार नव्हतं. डॉक्टर यायला बराच वेळ लागणार याचा अंदाज दोघांनाही आलेला. शऱ्या म्हणला, "भाई सलाईन संपलं वाटतं." तसं सुन्यानं जागेवरूनच वर पाहत हा उलसक राहिलंय म्हणत पाठीतून सरळ होत आळस दिला. सलाईन आता संपलं होतं. शऱ्यानं जागेवरून उठून सलाईनची पुंगळी बंद केली. शऱ्या म्हणला, "मायला ह्येव ऍडझवा डाक्टर कधी येतोय की! सुई खुपसून असंच बसयाचं व्हय ह्याची वाट बघत?" सुन्या म्हणला, "फोन कर त्याला." शऱ्या म्हणला "त्याचा नंबरच नाई." "त्या बोर्डावर बघ असन." बेडवर पडलेल्या अवस्थेत आज्जी म्हणाली, "मोह्या अंगाला कळ लागलीय." "दम धर जराशी. डाक्टरला फोन करतो." शऱ्या म्हणला.
शऱ्या बाहेरच्या बोर्डजवळ येऊन लाईटमध्ये चमकत असलेला बोर्ड बघत म्हणला, "लैच दलिंदरय राव ह्येव डाक्टर. नुसतीच डिग्री लिहिलीय. नंबरच नाइ." सुन्या आतून म्हणला "असन ना नीट बघ!" "आरं नाइचत बघू कुठून?" शऱ्या वैतागून बोलला. आजूबाजूला मान फिरवत कुणी दिसतंय का याची चाचपणी शऱ्यानं करून घेतली. पण कुणीच दिसत नव्हतं. तेवढ्यात सुन्या म्हणला, "हिकडं यी! मी काढतो सुई." शऱ्या तसा गडबडीत आत आला. "भाई, व्हायचं लचांड दुसरंच बरं का!" "आरं दम धर काढतो मी!" सुन्याच्या बोलण्यात आता विश्वासाची लहर उमटलेली शऱ्याला जाणवली.
सुन्यानं जाग्यावरून सरकत बाजूच्या टेबलवरची स्प्रिरिटची बाटली आणि कापसाचा बारीक बोळा उचलला. बाटलीतलं स्प्रिरिट कापसाच्या त्या बारीक बोळ्यावर ओतलं. "बबलू, जरा दमानं काढ हं." सुन्या त्यावर म्हणला, "काय नाय होत, मपल्यावर विश्वास ठेवा. अन् डोळे मिटून घ्या." सुन्यानं उठून स्प्रिरिटनं भिजवलेला बोळा आज्जीचा सुरकुत्यालेल्या हाताच्या नसावरून फिरवला. सुईच्या वर लावलेली टेप आजूबाजूनं ओली केली. ओली टेप हळूहळू दोन्ही बाजूनं उचकवली. तेव्हा आज्जीच्या हाताची कातडी निवळ सैल पडलेली त्याला जाणवली.
डाव्या हातानं टेप काढत कापसाचा तो बारीक बोळा सुईवर हळुवार ठेवला. आज्जी झालंच, सुई काढतोय, जराशी कळ लागण, असा सावधानतेचा इशारा आज्जीला देत सुन्यानं हळूच उजव्या हातानं सुई उपसली. आणि डाव्या हातानं सुई उपसलेल्या जागेवर बोळा ठेवत आज्जीला बोळा धरायला सांगितला. आज्जीचा हात सोडत त्यानं सुई सलाईनच्या बाटलीत वरच्या बाजूला खुपसली आणि आज्जीला म्हणला, "झालं जरा येळ तसंच पडून रहावा." शऱ्या हे सगळं नुसतं आवाक होऊन पाहत होता.
त्यानं न राहून सुन्याला विचारलं, "भाई, कुठं शिकलास हे?" "लै मोठी स्टोरीय सांगीन कव्हातरी. आत्ता लै उशीर झालाय." "हाव ना राव. बरं आज्जी उठून बस." म्हणत शऱ्यानं अंग झटकलं. आज्जी कॉटचा आधार घेत उठून बसली. सुन्यानं बरं वाटतंय का ? विचारलं. त्यावर आज्जी म्हणली, "हा आता जरासं बरं वाटायलंय." शऱ्या म्हणला, "चला मंग आता निघू. लै रात झाली. डाक्टर काय येत नसतोय आता." ते ऐकून सुन्या बाहेर येऊन उभा राहिला. शऱ्या आज्जीच्या हाताला धरून तिला घेऊन बाहेर आला. सुन्या म्हणला, "मायला, दवाखान्याचं सेटर खाली ओढलं पाहिजे." "घी ओढून. त्या ऍडझव्या डाक्टरला सकाळी गाठतो." सुन्यानं सेटर खाली ओढलं तसा त्याचा खडखड आवाज शांत वातावरणात घुमत राहिला. सुन्या, शऱ्या आणि आज्जी हळूहळू पावलं मोजत किसन अण्णाच्या घराच्या दिशेनं चालू लागले.
तेवढ्यात गाडीच्या सायलन्सरचा कानठाळ्या बसवणारा आवाज पलीकडच्या गल्लीतून आला. पुढच्या क्षणात अर्जुन बप्पाची गाडी समोर येऊन काचकन ब्रेक लागून समोरच थांबली. गाडीची लाईट डोळ्यावर आली. डॉक्टर खैरबांडे गाडीवरून उतरत म्हणाले, "पोरांहो, संपलं व्हय सलाईन! मला यायला थोडा उशीर झाला." तोवर अर्जुन बप्पानं गाडी गर्रकन वळवत डाक्टर साहेब येतो म्हणत निरोप घेतला. गाडी खेकाना उडवत निघून गेली. तसा शऱ्या डॉक्टरकडे बघत रागानं म्हणला, "ही काय यायची येळ झाली का डाक्टर? किती येळच ताटकळत बसून होतो. ह्येव सुनील होता म्हणून जमलं. नाइतर तुम्ही पार तांबडं फुटूस्तोर बसायला लावत होता वाटतं." "गढीवरच्या मोठ्या मालकाची तब्येत ढासळलेली. इमर्जन्सी होती. म्हणून थोडा उशीर झाला." डॉक्टर म्हणाले. त्यावर वैतागून खिशातल्या शंभरच्या दोन नोटा डॉक्टर पुढे करत शऱ्या म्हणला, "म्हणून काय गरिबाला नुसतं सुई खुपसून निघून जायचं असतंय काय!"
त्यावर आज्जीनं शऱ्याचा हात दाबत "गप बस चल गप." डॉक्टरनं पैसे घेत "नाही रे आपल्याला कसं गावात राहयचं म्हणलं की, सगळं आलंच." "खरंय तुमचं जाऊद्या. येतो आता." म्हणत शऱ्यानं राग आवरता घेत पुढं पाऊल टाकलं. तशी आज्जी मागे वळत म्हणली, "डाक्टर सायब पोरगं जरा ताणात हाई. त्याचं बोलणं मनावर घेऊ नका बरं का." डॉक्टर त्यावर नुसताच नाय नाय करत बरं वाटतंय ना आता? आराम करा, म्हणला. आज्जी व्हय म्हणली.
आणि तिघं पुन्हा चालू लागले. डॉक्टर दवाखान्याकडे निघून गेला. सुन्याच्या डोक्यात ते सगळं दृश्य घोळत राहिलं. पण झोपचा अंमल हळूहळू अंगावर चढायला लागला होता. कडाडून जांभई देत सुन्यान त्या सगळ्या दृश्याकड दुर्लक्ष केलं. आणि चालण्यावर लक्ष केंद्रित केलं. आता गावात भयाण शांतता पसरली होती. चालताना अंगावर वाऱ्याची झुळूक येत होती. लांब कोल्हेकुई सुरू झाली होती. त्या कोल्हेकुईवरून रात्र पुढं सरकायला लागलीय, याची जाणीव सुन्याला झाली होती.
क्रमशः
#गोतावळा_७
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.