Solapur News : यंदा पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, खरीप पेरणीसाठी बियाण्यांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी केंद्रांवर वर्दळ वाढली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक सोयाबीन, उडीद आणि तुरीच्या बियाण्यांना मागणी आहे. पण सध्या पुरेशा प्रमाणात ते मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढत आहेत. परंतु सर्वच बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.
गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला आहे. बहुतेक सर्व ११ तालुके पावसाने व्यापले आहेत. अनेक ठिकाणी ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. जिल्ह्यातील प्रमुख भीमा, सीना, निलकंठा, नागझरी या नद्याही वाहत्या झाल्या आहेत. जिल्ह्याची जूनची पावसाची सरासरी १०२ मिलिमीटर आहे. पण प्रत्यक्षात आतापर्यंत १५०.५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. आता केवळ वाफशाची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत.
बियाणे खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. सोयाबीनच्या महाबीजच्या केडीएस-७२६, उडदाच्या १६२ आणि तुरीच्या बीडीएन-७११ या वाणाला शेतकऱ्यांची पसंती आहे. महाबीजच्या एकाच वाणाच्या अथवा खासगी कंपनीच्या एकाच वाणाच्या बियाण्यांना मागणी वाढते आहे. सोयाबीन, उडदाच्या बियाण्यांचा तुटवडा आहे, पण त्यातही सर्वाधिक तुरीच्या बियाण्यांचा तुटवडा असल्याचे सांगण्यात आले. काही विक्रेत्यांकडे ते आलेच नाही, असेही सांगण्यात आले.
आमच्याकडे पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध आहेत. सोयाबीनच्या केडीएस ७२६ ला सर्वाधिक मागणी आहे. उडीद उत्पादन घटल्याने बियाणे निर्मिती कमी आहे, त्यात मागणी कमी असल्याने अडचण येते. पंरतु उडदाच्या १६२ लाही मागणी असल्यास तेही मागवू,प्रमोद भिंगारदिवे, प्रमुख कृषी क्षेत्र अधिकारी, महाबीज, सोलापूर
विशिष्ठ वाणाच्या बियाण्यांच्या मागणीमुळे अडचणी येतात. महाबीजसह खासगी कंपन्यांचे बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. बियाण्यांचा तुटवडा नाही, महाबीजसह खासगी कंपन्यांचे उडादाचे २ हजार ४२० क्विंटल इतके बियाणे उपलब्ध आहे. त्यापैकी ८६० क्विंटल विक्री झाले आहे. सोयाबीनचे २० हजार २०० क्विंटल आले, त्यापैकी ७१०० क्विंटल विक्री झाले आहे. तुरीचे २ हजार ७० क्विंटल बियाणे आले, त्यापैकी ४३०० क्विंटल विक्री झाले आहे.दत्तात्रय गावसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.