औरंगाबाद : यंदाच्या खरीप हंगामात (Kharip Season) मराठवाड्यात ४१ लाख ४३ हजार ४७८ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ५० लाख २६ हजार ४२ हेक्टर आहे. आठ लाख ८२ हजार ५६४ हेक्टर क्षेत्र अजूनही नापेर असल्याची स्थिती आहे.
औरंगाबाद कृषी विभागातील (Agriculture Department)औरंगाबाद, जालना, बीड या तीन जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत ८७.४६ टक्के पेरण्या झाल्या आहेत. तीनही जिल्ह्यांत खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र २० लाख ९० हजार १९८ हेक्टर आहे. त्यापैकी १४ जुलैपर्यंत १८ लाख २८ हजार २१ हेक्टरवर आतापर्यंत पेरण्या झाल्या आहेत.
सोयाबीन (Soybean), कपाशी (Cotton), मका (Maize) आणि तुरीची पेरणी करण्याला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. औरंगाबाद कृषी विभागातील औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत कपाशी ८ लाख ७७ हजार ७४३ हेक्टरवर, सोयाबीन ५ लाख ५ हजार ९७० हेक्टर, मका १ लाख ८३ हजार २८३ हेक्टर, तर तुरीची १ लाख ९ हजार ६३६ हेक्टर, खरीप ज्वारीची २८०३ हेक्टर, बाजरी ४९ हजार ७१ हेक्टर, इतर तृणधान्यांची २५८२ हेक्टर, कडधान्यामध्ये मूग ४० हजार ७४३ हेक्टर, उडीद ४४ हजार ५१५ हेक्टर तर अन्य कडधान्यांची १५८६ हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे.
गळीत धान्यांत (Oil Seeds) सर्वात जास्त सोयाबीनची पेरणी झाली आहे. त्यापाठोपाठ भुईमूग (Ground nut) ८०५८ हेक्टर, तीळ ४४७ हेक्टर, कारळ ४९.८० हेक्टर, अन्य गळीत धान्य १०६२ हेक्टर आणि सर्वात कमी सूर्यफुलाची ४८ हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे.
लातूर कृषी विभागाअंतर्गत लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड या पाच जिल्ह्यांत खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र २९ लाख ३५ हजार ८४४ हेक्टर आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात २३ लाख १५ हजार ४५७ हेक्टरवर अर्थात ८४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
विभागात खरीप ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र ९४१७८ हेक्टर आहे. त्यापैकी केवळ ३१ टक्के क्षेत्रावर म्हणजे २९ हजार ५३४ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. तुरीचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ४९ हजार २५३ हेक्टर आहे. त्यापैकी ६४ टक्के क्षेत्रावर म्हणजे २ लाख २५ हजार २०३ हेक्टरवर तुरीची पेरणी झाली आहे.
लातूर कृषी विभागातील पेरणी स्थिती
- लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेडमध्ये मुगाचे सर्वसाधारण क्षेत्र ९६ हजार ८३९ हेक्टर
- ५३ हजार ९९८ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे केवळ ५६ टक्के क्षेत्रावर मुगाची पेरणी
- उडदाचे सर्वसाधारण क्षेत्र ९८ हजार ९२७ हेक्टर.
- ६३४९५ हेक्टरवर अर्थात ६४ टक्के क्षेत्रावर उडदाची पेरणी
- सोयाबीनचे १५ लाख ७१ हजार ८६८ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र
- ९८ टक्के क्षेत्रावर अर्थात १५ लाख ४३ हजार ९५ हेक्टरवर सोयाबीन
- कपाशीचे सर्वसाधारण क्षेत्र ४ लाख ८५ हजार ८८ हेक्टर
- ७९ टक्के क्षेत्रावर अर्थात ३ लाख ८४ हजार ६८६ हेक्टरवर कपाशी लागवड
अतिवृष्टीच्या भागात सर्वेक्षण
लातूर जिल्ह्यातील १३, नांदेडमधील ८०, परभणीतील २४ व हिंगोलीतील २४ मंडलांत अतिवृष्टी झाली. क्षेत्रीय स्तरावर अतिवृष्टी झालेल्या गावांमध्ये सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत. बहुतांश ठिकाणी पेरणी केलेल्या क्षेत्राचे नुकसान व जमीन खरडून वाहून जाण्याचे प्रकार झाले आहेत. अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी सोयाबीन पिकाची दुबार पेरणी होण्याची शक्यता आहे. पिकाचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर दुबार पेरणीचे निश्चित क्षेत्र करण्यात येईल, असे कृषी विभागाने कळविले आहे.
पिके उगवली आहेत. सततच्या पावसामुळे पिके पिवळी पडण्याचा धोका आहे. नुकतीच पेरणी झालेल्या बियाण्यांच्या उगवणीलाही अडचण येऊ शकते. शेतात पाणी साचल्यास पाण्याचा शेताबाहेर निचरा करावा.डॉ. दिनकर जाधव, विभागीय कृषी सहसंचालक, औरंगाबाद.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.