Sorghum  Agrowon
ॲग्रो विशेष

Sorghum Production : ज्वारीचा गोडवा अजून वाढवा

Sorghum Productivity : आताच्या वाढीव दरामुळे ज्वारी उत्पादकांना थोडाफार लाभ होत असला, तरी हे पीक शेतकऱ्यांना कायमस्वरूपी किफायतशीर ठरण्यासाठी ज्वारीची उत्पादकता वाढवावी लागेल.

विजय सुकळकर

Agriculture of Sorghum : मागील काही वर्षांपासून राज्यात ज्वारीचा पेरा घटत चालला होता. ज्वारीची कमी उत्पादकता, मिळणारा अत्यंत कमी दर आणि बदलत्या आहार शैलीने आपल्या ताटातील भाकरीची जागा गव्हाच्या चपातीने घेतली होती. त्यातून मागणी घटली. शेतकऱ्यांकडील जनावरे कमी झाल्याने अनेक शेतकऱ्यांना कडब्याचीही गरज उरली नाही.ज्वारीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविण्यामागची ही काही प्रमुख कारणे आहेत.

या वर्षीचे चित्र मात्र थोडे वेगळे दिसते. बाजार समित्यांमध्ये सध्या काही शेतकऱ्यांच्या ज्वारीला दर्जानुसार सहा हजार ते सात हजार रुपये प्रतिक्विंटल असा चांगला दर मिळतोय. हीच ज्वारी थोडी नीटनेटकी करून ग्राहकांसाठी बाजारात सात हजार ते आठ हजार रुपये प्रतिक्विंटलने उपलब्ध होतेय. अर्थात, ज्वारीसाठी प्रतिकिलो ७० ते ८० रुपये ग्राहकांना मोजावे लागत आहेत. या वर्षीच्या कमी पाऊसमानामुळे गहू, हरभरा, मका या पिकांपेक्षा रब्बीत शेतकऱ्यांनी ज्वारीला पसंती दर्शविली आहे.

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यात रब्बी पेरणीत गतवर्षीच्या तुलनेत साडेचार लाख हेक्टरने अधिक पेरणी झाली आहे. रब्बी ज्वारीचा पेरा अधिक असला तरी जमिनीत फारच कमी ओलावा आणि बहुतांश शेतकऱ्यांकडे सिंचनासाठी पाण्याची सोय नसल्याने अनेक ठिकाणचे ज्वारी पीक वाळत आहे.

त्यातच रब्बी ज्वारीवर अनेक भागांत लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने उत्पादनात घटीची शक्यता वर्तविली जातेय. पुढील काळात ज्वारीचे उत्पादन घटल्याने बाजारात आवक कमीच राहील. त्यातच ज्वारीचे पोषणमूल्य आणि आहारातील महत्त्व अनेकांना पटल्याने आरोग्याबाबत जागरूक ग्राहकांचा कल ज्वारीची भाकरी खाण्याकडे वाढत आहे. त्यामुळे ज्वारीला मागणी वाढून दरही चांगलेच राहणार असल्याचे संकेत मिळताहेत.

देशातील एकूण ज्वारी क्षेत्रापैकी ४० टक्के क्षेत्र महाराष्ट्रात आहे. उत्पादनदेखील देशाच्या तुलनेत ५७ टक्के इतके आहे. आपल्या राज्याचे ज्वारी हे मुख्य पीक आणि ज्वारीची भाकरी हेच मुख्य अन्न. अत्यंत कमी ओलाव्यावर आणि विशेष म्हणजे ताण सहन करण्याच्या गुणधर्मामुळे अवर्षणप्रवण विभागातील हक्काचे पीक म्हणून ज्वारीकडे पाहिले जाते.

आता ज्वारीला मागणी वाढून दरही चांगली मिळत आहे. चाराटंचाईमुळे ज्वारीच्या कडब्यालाही चांगला दर मिळतोय. याचा ज्वारी उत्पादकांना लाभ होणार असला तरी हे पीक शेतकऱ्यांना कायमस्वरुपी किफायतशीर ठरण्यासाठी ज्वारीची उत्पादकता वाढवावी लागेल. ज्वारीच्या अधिक उत्पादनक्षम वाणांचे संशोधन करावे लागेल.

ज्वारीची उत्पादकता वाढीसाठी प्रगत लागवड तंत्राचा प्रसार-प्रचार शेतकऱ्यांमध्ये करावा लागेल. शेतकऱ्यांनी ज्वारीचे उत्पादन वाढविल्यानंतर दर कोसळू नयेत, ही काळजी घ्यावी लागेल. आहारात ज्वारीच्या भाकरीचे प्रमाण वाढविण्यासाठी याच्या सेवनाचे महत्त्व लोकांना पटवून द्यावे लागेल. ज्वारीमुळे पोटाचे विकार कमी होतात, हृदयासंबंधी आजारातही ज्वारी उपयुक्त आहे.

ज्वारीमुळे शरीरातील अतिरिक्त चरबी, वजन कमी होते. ज्वारीचे नवीन पौष्टिक वाण मुलं, महिलांचे कुपोषण कमी करण्यासही हातभार लावतात. ज्वारी सेवनाचे हे सर्व फायदे गावोगाव जाऊन लोकांना पटवून द्यावे लागतील. ज्वारीपासून धान्याबरोबर जनावरांना चाराही मिळतो. ज्वारीपासून अनेक प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात.

ज्वारीच्या प्रक्रियायुक्त पदार्थांना देश-विदेशांतून मागणी वाढत आहे. गावातील बेरोजगार तरुण, महिलांना ज्वारीवरील प्रक्रियेचे प्रशिक्षण देऊन त्यांना या उद्योगात उतरविण्यासाठी आर्थिक मदतही करावी लागेल. ज्वारीची प्रक्रिया आणि पोषणमूल्यातील श्रीमंती कळल्याशिवाय या पिकाला चांगले दिवस येणार नाहीत. अनेक विकसित देशांत ज्वारीचा वापर हा जैवइंधनासाठी देखील केला जातोय. आपल्याकडे जैवइंधन म्हणून ज्‍वारीचा वापर वाढला तर ज्वारी उत्पादक अन्नदात्याबरोबर ऊर्जादाताही होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT