Sangli News : शेतीसाठी दिवसा वीज देण्यासाठी राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत या योजनेचे जिल्ह्यातील प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने गांभीर्याने कार्यवाही करावी. प्रलंबित बाबी तातडीने पूर्ण कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज येथे दिल्या.
मुख्यमंत्री सौरऊर्जा कृषी वाहिनी योजनेच्या आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी प्रभारी पोलिस अधीक्षक रितू खोखर, उपवनसंरक्षक नीता कट्टे, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सोनिया सेठिया, महावितरणचे अधीक्षक अभियंता सवाईराम, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) वसुंधरा बारवे, कार्यकारी अभियंता पी. व्ही. पंचमुख, अतिरीक्त कार्यकारी अभियंता देवदत्त हसबे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे यांच्यासह उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. काकडे म्हणाले, की मुख्यमंत्री सौरऊर्जा कृषी वाहिनी ही राज्य शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेसाठी एकूण ४७ जागा निश्चित केल्या आहेत. त्यापैकी २९ जागांचे क्षेत्र आवाडा या कंपनीस हस्तांतरित करण्यात आले आहे. या २९ जागांमधील सौरऊर्जा प्रकल्पातून २०७ मेगावॉट वीजनिर्मिती अपेक्षित आहे.
यापैकी बसर्गी व जिरग्याळ (ता. जत), मणेराजुरी (ता. तासगाव), माडगुळे व लिंगीवरे (ता. आटपाडी) या ठिकाणी सहा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. तर कोसारी, बेवनूर, तिकोंडी, बेळुंडगी, मोरबगी, माडग्याळ, शेड्याळ, हळ्ळी (ता. जत), केरेवाडी (ता. कवठेमहांकाळ), भाग्यनगर (ता. खानापूर) पळसखेल (ता. आटपाडी) या ठिकाणचे प्रकल्पांचे काम प्रगतिपथावर आहे. प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करावेत.
या योजनेअंतर्गत प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध होणार आहे. बळीराजा मोफत वीज योजनेतून ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या शेतीपंपांना मोफत वीज मिळणार आहे. त्यामुळे सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी संबंधित नियुक्त कंपनीने स्थानिक संबंधित सर्व यंत्रणांशी समन्वय ठेवावा. एक समन्वयक नेमून संबंधित गावच्या ग्रामस्थांना प्रकल्पाचे फायदे समजावून सांगावेत. अधीक्षक अभियंता सवाईराम यांनी या योजनेअंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रकल्पांची सद्यःस्थिती सादर केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.