Kolhapur Culture Agrowon
ॲग्रो विशेष

Avanti Kulkarni : मऊ मनाचं रांगडं कोल्हापुर - भाग २

Team Agrowon

अवंती कुलकर्णी

दुसरं वाद्य म्हणजे डफ किंवा कोल्हापुरी भाषेत डफडं. हे डफडं अगदी जोरात वाजवलं जातं. त्याला आस कमी असते, त्यामुळं त्यातून येणाऱ्या आवाजाचे तरंग अगदी क्षणभरापुरते असतात. त्यामुळं तो आवाज ‘डब डब’ असा येतो, त्याचं कोल्हापुरी भाषेत ‘ढबाक’ झालंय.

ही वाजंत्री वाजवायचा मान हा कायम कोल्हापुरातल्या होलार समाजातील उत्तम कलाकारांकडं असतो. ही आमच्या छत्रपती शाहूराजांपासूनची परंपरा आहे. म्हणजे असं ,की पिराच्या वेळीही यांना वाजंत्री वाजवायचा मान असतो अन् त्रंबोली यात्रेला पण यांचाच तो हक्क असतोय.

तर नदीला नवीन पाणी आलं, की ही यात्रा काढली जाते. मंगळवारच्या किंवा शुक्रवारच्या पहाटे नदीवर जाऊन तरुण मंडळी कावड भरून पाणी आणतात. मग गल्लीच्या कोपऱ्यावर मरगाई, टेमलाई आणि म्हसूबाच्या नावानं दगडाला शेंदूर लावतात, उदबत्ती कापरानं ओवाळतात आणि मग बकरं कापतात. हे सगळं अगदी पहाटे पहाटे होतं. सकाळ झाली की मटणाचे वाटे होतात. गल्लीतल्या घराघरांतून हे वाटे पोहोचवले जातात.

तोपर्यंत एखाद्या घरात सगळा नैवेद्य तयार केला जातो. या नैवेद्यात पिठल्याची म्हणजेच झुणक्याची वडी म्हणजेच शुद्ध भाषेत पाटवडी, मेथी, शेपूची भाजी किंवा गौरीला करतात तसली आल्यापाल्याची भाजी, वांग्याची चरचरीत भाजी, भाकऱ्या, दहीबुत्ती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका मोठ्या वाडग्यात नाही तर मटक्यात आंबील... असा नैवेद्य असतो. म्हसूबा, मरगाई आणि त्रंबोलीच्या नैवेद्यात या सगळ्याबरोबर वाट्यातनं ‘काळीजा’ची भाजी करून तीपण नैवेद्य किंवा गारवा म्हणून तयार करतात.

तिकडं जाणत्या बायका गल्लीतून कुमारिका गोळा करतात. त्यांना नवीन कपडे करतात. हातात बांगड्या, केसात फुलं, गजरा माळून त्यांचा मळवट भरतात. मग स्वच्छ केलेल्या तांब्याच्या किंवा नवीन अशा मातीच्या डेरक्यात नदीचं आणलेलं पाणी या बारक्या पोरींच्या हातून भरून घेतात. मग बायका एक मोठी परात घेतात.

त्यात दहीबुत्ती आणि घुगऱ्या म्हणजे भिजवलेले हरभरे कालवतात. आणि मग सुरू होते यात्रा. गुलाल उधळत, पीऽऽऽढबाकच्या सुरातालात सगळी गल्ली उत्साहानं, जोशात यात्रेत सामील होते. गल्लीच्या कोपऱ्यावर यात्रा आली की उदबत्ती, धूपकापूर लावून हा परातीत कालवलेला दहीभातघुगऱ्या शिंपडतात. अन् हे असं टेमलाईला पोहोचेस्तोवर करत राहतात.

देवळापाशी यात्रा पोहोचली, की प्रदक्षिणा घालून घागरीतून, डेरक्यातून आणलेलं नदीचं पाणी देवीच्या पायांवर घातलं जातं. आणि मग बरोबर आणलेला नैवेद्य गाभाऱ्यात आणतात. तिकडं नैवेद्य देवीसमोर ठेवला, की त्यावर बकऱ्याची मुंडी आणि पाया ठेवले जातात. यामागं समज असा, की मुंडी म्हणजे डोकं हा मुख्य अवयव.

तिथून सुरुवात करून शेवट म्हणजे पाय, म्हणजेच सुरुवातीपासून शेवटपर्यंत देवीला अर्पण. असा नैवेद्य दाखवून माणसं मधला भाग म्हणजेच काळीज मात्र स्वतःला प्रसाद म्हणून घेतात. यात्रा गल्लीतून बाहेर पडली, की ज्या ज्या घरात वाटे दिलेत तिथं मटण शिजवायला सुरुवात होती. रस्से रटरटायला लागतात आणि सुक्कं चटचटायला लागतं. आणि गल्लीत एकच खमंग, भूक चाळवणारा दरवळ सुटलेला असतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT