Rural Story Agrowon
ॲग्रो विशेष

Sameer Gaikwad : आकसत चाललेलं मरण...

Rural Story : गावात कुणी तरी गेलं ही बातमी नुसती कळली तरी भानातात्या लगोलग त्या घरचा रस्ता नीट धरायचा. म्हणजे काय? तर तो वाटंत भेटंल त्याला संगट घ्यायचा. म्हणजे बखोटीला मारून न्यायचा.

Team Agrowon

समीर गायकवाड

Indian Agriculture : ‘भाऊशी वाकडं तर नदीवर लाकडं’ ही गावबोलीतली म्हण अशाच भानातात्यासारख्या माणसामुळे अज्ञात ज्ञानीजनास सुचली असावी. कारण भानातात्याशी वाकडं घेतलेल्या माणसाला तो लाकडं देखील नीट रचू द्यायचा नाही.

भानातात्या म्हणजे भानुदास जगन्नाथ रोकडे. त्याच्या पापभीरू वडिलांना तीन भाऊ. त्यांचा शब्द कुटुंबात प्रमाण होता. सुखसमृद्धीने आणि दूधदुभत्यानं त्यांचं घर भरलेलं. केव्हाही पाहिलं तर ढेलजेत जुंधळ्याची, गव्हाची पोती रचलेली दिसत. कुणाच्या घरी चूल पेटलेली नसली की त्याच्या घरची बाईल तोंडावर पदर झाकत वयनीबायकडं यायची.

वयनीबाय म्हणजे भानातात्याची आई. गावातल्या भुकेल्या कष्टल्या जिवांची आई ती! बंद्या रुपयासारखं गोल गरगरीत मोठंलठ कुंकू कपाळी लेणारी वयनीबाय मग आपल्या पतीकडे पाही. तिचा इशारा होणार हे ठाऊक असलेल्या जगन्नाथ रोकड्यांचा हात तोपर्यंत ज्वारीच्या पोत्यात गेलेला असे.

लखलखत्या पितळी शेरात गच्च भरलेलं ते काळ्या मातीच्या पोटातलं पिवळं सोनं त्या माउलीच्या पदरात ओतताना तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असे आणि वयनीबायचा हात तिच्या गालावर मायेने फिरत असे, तर जगन्नाथाच्या मुखी ‘पांडुरंगाची कृपा’ इतकेच किमान शब्द येत.

जगन्नाथ रोकड्यांच्या याच स्वभावाने त्यांच्या घरात नवी भिंत झाली. वयनीबायला गावात मिळणारा मान बघून तिच्या जावांचा चडफडाट होऊ लागलेला. घरात खाणारी तोंडंही वाढली. पोराबाळांनी घर भरलं तसं बाहेरून पदर पसरणाऱ्या बायाबापड्यांना घरातली अन्य माणसं ठीसफीस करू लागली. त्यावरून खटके उडू लागले.

वारकरी त्याग वृत्ती रोमरोमात भिनलेल्या त्या दांपत्याने पडती बाजू घेतली, तिथंच त्यांच्या दुर्दैवाची मेढ रोवली. घर तुटलं. शेतशिवाराच्या वाटण्या झाल्या. जगन्नाथ रोकड्यांचा स्वभाव, व्यवहार पाहू जाता त्यांना सगळे फसवणारेच भेटले. त्यांच्यावर जळणारे गावातले म्होरके आतून खुश झाले.

जगन्नाथांना चार मुले होती. भानुदास थोरला. त्याचा स्वभाव आधीपासूनच कुऱ्हाडीच्या पात्यासारखा लखलखीत असल्याने त्याला भावकीला वठणीवर आणायला फारसा वेळ लागला नाही. हत्तीच्या बळाचे त्याचे भाऊ रान कसायचे, त्यात त्यांना यशही होतं. भानातात्याने त्याच्या कळत्या वयात आई-वडिलांचे अपमान पाहिलेले. तेव्हापासून मनात भावकीची तिडीक बसलेली.

आई-बापाने गावासाठी घर तुटू दिलं, पण गावानं काहीच केलं नाही यामुळे गावकीवरही त्याचा राग. त्यातूनच त्याच्या मनाने जगावेगळी उचल खाल्ली. गावातल्या प्रत्येकास ‘पोचवायचेच,’ हा त्याचा निर्धार. अर्थात, सुरुवातीस क्रोधापायी यात ओढला गेलेला भानातात्या या विधीचं एक अंग कसा होऊन गेला हे त्यालाच कळलं नाही. नंतरच्या काळात त्याच्या मनात आपुलकी माया येत गेली.

कुणाच्याही घरची मृत्यूची बातमी कळताच त्याचं ‘गुत्तं’ आपल्याला वतनात मिळालं असावं असा त्याचा अविर्भाव असे. कंबरेचा कासोटा आवळत खांद्यावर उपरणं टाकून स्वारी ढांगा टाकत निघे. ज्या घरात मयत झालेली असे तिथली सगळी माहिती गोळा करून तो तिथे जाई. सगळ्यांच्या कुंडल्या हाती आल्यावर तो प्रत्येकाचे ग्रह स्वतःच्या हाताने ठोकून काढी.

मयताच्या घरी जाताच त्याचं पहिलं काम असे, मयताचे हातपाय दुमडून ठेवणं. जर मयत होऊन खूप वेळ झालेला असेल, मयताचे हातपाय थिजून गेले असले, की त्या घरातील लोक भानातात्याच्या शिव्यांचे धनी होत. मग बऱ्याचदा मयताचे गुडघेखांदे चक्क निखळतील अशा बेतानेच तो मुडपून टाकायचा.

मयताला निलगिरी तेल चोपडण्यापासून, उदबत्तीचा अख्खा पुडा लावण्यापर्यंतची कामं करताना त्याच्या तोंडाची टकळी सुरू असे. प्रश्‍नांची सरबत्ती होई. “कधी मेला, कसा मेला, त्याला दवापाणी केलं नाही का, खाऊ घातलं की नाही, सेवा केली की नाही, शेवटचे नवे कपडेलत्ते कधी दिले, लाडकोड पुरवले का, शेवटची इच्छा काही होती का, घरात सगळ्यात जास्त जीव कुणावर होता, मयत कधी करायची, सगळ्या नातलगांना कळवले का” अशा फैरी झडत असत. मयताविषयी तो लिंगभेद कधीच करत नसे. अपवाद अखेरची अंघोळ घालतानाच्या वेळचा असे.

मयताच्या अंत्यविधीचं सामान घराबाहेर येऊन पडलं, की भानातात्याला आवरणं आणखी कठीण होई. हे सामान आणायला देखील त्यानंच कुणाला तरी घाई करून पाठवलेलं असे. बांबू आणि कामठ्या यांची तिरडी बांधणी करताना कुणी फालतू सूचना केल्या तर त्याचा शालजोडीतला उद्धार होई. तिरडीवर कडबा रचून झाला की त्याची घाई वाढे.

अशा वेळी मयतापाशी कुणी हेल काढून रडत असलं, की तो वस्सकन अंगावर जाई आणि अब्रूचं खोबरं होईल असं बोले. ‘जितं पणी नव्हती गोडी अन् मेल्यावरती आतडी तोडी’चा नेमका वापर करे. मयताची अंघोळ उरकल्यावर त्याची पूजा-आरती झाली की मयताचे कलेवर अक्षरशः भानातात्याच्या ‘ताब्यात’ असे.

सुतळ्या करकचून आवळायचा, कपाळावर रुपयाचं नाणं खोचायचा, विड्याची पाने बांधायचा, पूर्ण ताकदीनिशी तुळशीचं पान जबडा खोलून आत कोंबायचा तो. मयताने काही ‘कारभार’ करून ठेवलेला असला, की त्याचा शेलक्या भाषेत ‘उद्धार’ दरम्यानच्या काळात होई. बांधाबांधी करून झाली की खांदेकऱ्यांची तो झाडाझडती घ्यायचा. या निमित्ताने मयताच्या घरातल्या पाव्हण्यारावळ्यांना झोडून काढायची संधी त्याला मिळे.

जिथं अग्नी दिला जायचा तिथं ‘पुढची तयारी’ भानातात्याच्या खाक्यानुसार झालेली असे. ‘लाकडं की गवऱ्या’, ‘त्यांची चळत कशी रचायची’ यावर काही लोक अक्कल पाजळायला पुढे आले, की भानातात्या त्याचा पाणउतारा करी. “लईच मरतुकडा होता कंबरेत पार आरलेला बा” असं म्हणत तो खोचक हसायचा तर कधी “रेड्यागत कंबारडं हुतं बाबाचं काय खाऊन पैदा केल्ता क्वाण जाणो !” अशी टवाळकीही करायचा.

त्याला अडवायची कुणाची बिशाद नव्हती. त्याच्या जोडीला चार-पाच मदतनिसांची टोळी होती. भानातात्या कितीही आजारी असला तरी हे उद्योग करायचा आणि त्याचा कंपू त्याला ‘खाद्य’ पुरवत राहायचा. मयताचं डोकं कुणीकडे करावं इथंपासून ते लाकडं नीट रचा याची फर्माने तो सोडी. “अमक्यातमक्याच्या दहनात पाय तसेच राहिले होते” असं तंबाखूचे बार भरत सहजतेने तो हसत सांगायचा.

कवटीपाशी ठेवायच्या खोबऱ्याच्या वाट्या तो हुंगून बघायचा, खऊट वास आला की वाण्याच्या नावाने शिव्याची लाखोली वाहायचा. मयत स्त्री असली, की माहेरच्या लोकांना ‘लवकर आवरा’ची घाई उडवून द्यायचा. “शांती, पंचक असलं काही निघालं का” असं कुणी चुकून जरी विचारलं, की भानातात्याच्या मेंदूच्या बत्तीतलं मेंटल भक्कन पेटून उठे.

त्यामुळे तसलं काही केलेलं असलं तरी त्याचा राग अंगावर घेत लोक ते विधी करत. अग्नी देताना तो जवळ उभा राही. अग्नी देणारा कोवळा पोर असला, की त्याच्या खांद्यावर हात ठेवी आणि त्याला धीर देई. इतकाच काय तो त्याच्यातला संवेदनशीलपणा जाणवे. बाकी सगळा कामालीचा रासवटपणा होता.

तीन फेऱ्या मारताना मडक्याला छिद्र पाडणारा माणूस भानातात्याच्या हमखास शिव्या खाई. अशा वेळी लोकदेखील शंभर सूचना करून आणखी गोंधळ उडवून देत. कुणी काय सांगे तर कुणी काय ! मग भानातात्या गप्प राहून सगळं ऐकत राही आणि वेळ बघून खस्सकन बोले, “तुझं सरण रचताना तुझ्या पद्धतीने करू बाबा. हिथं तू गुमान राहा.” हा डोस कामी येई. दहन देऊन झाल्यावर चितेत खडामीठ टाकणे, घासलेट फेकणे, गवऱ्यात लाकडात कोंबलेले बोळे ‘अल्लाद’ पेटवणे हे कार्य सुरू होई.

भानातात्या आता अंथरुणाला खिळून आहे. नव्वदी कधीच पार केलीय त्यानं. क्वचित कुणाच्या मयतीला जातो. गेला तरी शांत बसून असतो. त्याची गात्रं शिथिल झालीत. कानाच्या पाळ्या लोंबू लागल्यात. गालफडे खोल गेलीत. डोळ्यांतल्या आडाचं पाणी आटून कोरडं ठाक झालंय. कपाळावर आठ्यांच्या नक्षीने जोर धरलाय.

चेहरा रापून निघालाय, केस शुष्क झालेत, हातापायांवरचं कातडं ढिलं झालंय. हनुवटी लकालका हलते, मान थरथरते. जुनाट लिंबाची काठी टेकवत कुणाचा तरी हात धरून तो मसणवटीत येतो. गावाबाहेरच्या ओढ्याजवळ आता मसणवट आहे, तिथल्या चिवट चिखलात उगवलेल्या रानवेलींचा तीव्र वास येतो.

हवेत उडणारे राखेचे कण भानातात्याच्या फेट्यात जाऊन स्थिरावतात. तो ते झटकत नाही. त्याला अंतिम सत्य ठाऊक आहे. आता मयतीचे खूप शॉर्टकट झालेत, यावर तो काही बोलत नाही. धडाडून पेटलेल्या चितेतल्या अग्नीकडे एकटक पाहत राहतो. तो असा शांत, म्लान बसलेला पाहून तो अग्नीदेखील कासावीस होत असावा. आकसत चाललेल्या मरणाची भानातात्याला भीती नाही, पण पैलतीरावर जाण्याची घाईही नाही. तो खऱ्या अर्थाने स्थितप्रज्ञ झालाय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farming: शेतकरी : वर्णव्यवस्थेतला तळाचा घटक

Tomato Disease Management: टोमॅटोवरील विषाणूजन्य रोगांचे नियंत्रण

Wine Industry: ‘वाइन’ भूमी: कॅलिफोर्नियातील नापा व्हॅली

Weekly Weather: राज्यात ईशान्य मॉन्सूनचे आगमन

Tribal Women Empowerment: आदिवासी महिला योजनेच्या माध्यमातून होणार सक्षम

SCROLL FOR NEXT