Sameer Gaikwad : त्याने तटतटलेल्या पोटावर हात फिरवला की व्यायला अडलेली गाय, म्हैस लगेच मोकळी होई...

अन्याबाच्या स्पर्शात जादू होती. वस्तीच्या आसपास कुणाची गाय, म्हैस व्यायला झाली असली की तो तिथं जाऊन बसायचा. तिचं अवघडलेपण पाहून याच्याच डोळ्यात पाणी यायचं. मग तो तिच्या तटतटलेल्या पोटावरून अलगद हात फिरवत राही. त्यानं हात फिरवला की काही तासांत तो जीव मोकळा होई. वेत होऊन वार पडेपर्यंत तो तिथंच बसे.
Sameer Gaikwad
Sameer GaikwadAgrowon

समीर गायकवाड

‘‘आमच्या अन्याबाला कुटं बगितलंस का रे बाबा?’’ डोक्यावरच्या इरकली साडीचा पदर ओठात मुडपून कापऱ्या आवाजात अक्काबाई विचारत असे. समोरचा हसतच उत्तरे, ‘‘कोण पावल्या का?’’ यावरचा तिचा होकार असहायतेचा असे. मग त्या माणसानं ‘दाव’लेल्या ठिकाणाकडं अक्काबाई निघायची. हे दृश्य महिन्यातून एकदा तरी दिसे.

वाळल्या खारकेगत अंगकाठी असलेल्या अक्काबाईच्या माथ्यावरची चांदी विरळ झाली असली, तरी मस्तकावरचा पांडुरंगाचा हात टिकून होता. नव्वदीत देखील तिच्या तळव्यातली साय आणि डोळ्यातली गाय शाबित होती.

बोटांची लांबसडक पेरं चिंचेच्या आकड्यासारखी वाकडी तिकडी झाली होती, तळहातावरच्या रेषांनी हात पोखरायचा बाकी ठेवला होता. मनगट पिचून गेलं असलं तरी त्यातली ताकद टिकून होती. तिच्या दांडरलेला पाठीचा कडक कणा स्पष्ट दिसे.

टोकदार झालेली ढोपराची हाडे बाहेर डोकावत. तरातरा चालताना काष्ट्याचा सोगा वर ओढलेला असला, की लकालका हलणाऱ्या गुडघ्याच्या वाट्या लक्ष वेधून घेत. नडगीचं हाड पायातून बाहेर आल्यागत वाटे, पिंडरीचं मांस पुरं गळून गेलेलं.

पोट खपाटीला जाऊन पाठीला टेकलेलं. अक्काबाईचा चेहरा मात्र विलक्षण कनवाळू ! तिच्या हरिणडोळ्यात सदैव पाणी तरळायचं. पुढच्या दोनेक दातांनी राजीनामा दिलेला असला तरी दातवण लावून बाकीची मंडळी जागेवर शाबूत होती.

Sameer Gaikwad
Kolhapur News : कर्मवीर गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत संपर्काचे आवाहन

अक्काबाई बोलू लागली की तिच्या कानाच्या पातळ पाळ्या लुकलुकायच्या, हनुवटी लटपटायची. खोल गेलेल्या डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळातून तिची चिंता जाणवायची. बोडख्या कपाळावरच्या आठ्यांची मखमली जाळी रुखमाईसमोरच्या रांगोळीसारखी भासे.

अक्काबाईचा नवरा दादाराव निंबाळकर. त्याच्या वंशाला पाच पोरे, दोन पोरी असा भलामोठा वारसा लाभलेला. बाकी दादारावचं यापलीकडे काहीच कर्तृत्व नव्हतं. वडीलोपार्जित शेतीत त्यानं वाढ-घट काहीच केलं नाही. त्याच्या पोरींची लग्ने होऊन त्या यथावकाश सासरी गेल्या.

धाकटा अन्याबा वगळता चारही पोरांची लग्ने झाली. घरात नातवंडांची रांग लागली. घराचं गोकुळ झालं. सगळं आलबेल झालंय असं वाटत असताना मधल्या सुनेनं घरात काडी लावली. दादारावच्या डोळ्यादेखता घर तुटलं. वाड्याचे पाच भाग झाले. पण दादारावनं, अक्काबाईनं तिथं राहण्यास नकार दिला.

पाचवा हिस्सा ज्या अन्याबाच्या वाट्याला आला होता, त्याला संगं घेऊन ते दुःखीकष्टी मनाने शेतातल्या वस्तीत राहायला गेले. गावानं त्यांच्या पोरांना शिव्यांची लाखोली वाहिली, पण पोरं बधली नाहीत की सुनांच्या मनातलं जहर सरलं नाही. गावानं दादारावच्या पोरांना या दिवसानंतर मानाचं पान कधीच दिलं नाही. दादारावच्या पोरांना सगळ्यांनी दातात धरलं त्याचं कारण अन्याबा होता. ज्याला अख्खं गाव ‘पावल्या’ म्हणायचं.

अन्याबा हा दादाराव, अक्काबाईचा धाकटा पोरगा. जन्मतःच किंचित गतिमंद असलेला पोर. तळहाताच्या फोडासारखं त्यांनी त्याला जपलेलं. मोठ्या खटल्यात त्याच्याकडं लक्ष देणारी पुष्कळ माणसं असल्यानं बालवयात त्याला वाढवणं कठीण नव्हतं.

कारण तो रखडत पाऊल टाकायचा त्यामुळे गाव त्याला ‘पावल्या’ म्हणायचं. गुडघ्याच्या खालीपर्यंत लोंबणारी ढगळ खाकी अर्धी चड्डी, अर्ध्या बाह्यांचा सदरा हा त्याचा वेष. अस्थिर नजरेचा, बाह्यांनी नाक पुसणारा, बोलताना अडखळणारा, सलग बोलल्यावर लाळेची तार गाळणारा, कुणी काही टोचून बोललं टिंगल केली, तरी त्याचा मतितार्थ न कळता निरागस हसणारा, बालपणी अक्काबाईपाशी फुग्यापासून ते लिमलेटच्या गोळीपर्यंत कशाचाही हट्ट धरणारा अन्याबा. तो वयात आल्यावर अक्काबाईवरचं दडपण वाढत गेलं.

नेमक्या त्याच काळात घराचे तुकडे झाल्याने अन्याबाला घेऊन ते वस्तीवर राहायला आले. वास्तवात त्यांना गावापासून, गावातल्या लोकांपासून दूरच जायचं होतं, त्यांच्या नजरेपासून अन्याबाची सुटका करायची होती. त्याच्या शारीरिक अवस्थेमुळे त्याचं लग्न झालं नाही. अक्काबाईच्या मनाला याची कायम टोचणी असायची.

वस्तीवर राहायला आल्यानंतर काही वर्षांनी सर्पदंशाने दादाराव मरण पावला, तेव्हा अक्काबाईच्या पोरांनी तिला गावात परतण्याचा कोरडा आग्रह केला; पण स्वाभिमानी अक्काबाई गावात परतली नाही.

दादारावच्या जाण्यानं अक्काबाईचं विश्‍व आणखी आक्रसलं. ती आपल्या पोराला बिलगून राही. जग त्याचं नवल करायचं. एका हातात खुरपं, एका हातात दावं घेऊन ती रानात काम करे. दाव्याचं एक टोक अन्याबाच्या हाताला बांधलेलं असे.

काम नसलं की अन्याबा मोकळा असे. अन्याबा मुक्त असला की फुलपाखरासारखा राही. त्याला पानाफुलांचे, मुक्या जनावरांचे विलक्षण वेड. वस्तीच्या आसपास कुणाची गाय, म्हैस व्यायला झाली असली की तो तिथं जाऊन बसायचा. तिचं अवघडलेपण पाहून याच्याच डोळ्यात पाणी यायचं.

मग तो तिच्या तटतटलेल्या पोटावरून अलगद हात फिरवत राही. त्यानं हात फिरवला की काही तासांत तो जीव मोकळा होई. वेत होऊन वार पडेपर्यंत तो तिथंच बसे. अन्याबाच्या स्पर्शातल्या जादूची माहिती कर्णोपकर्णी होत राहिली. आसपासची माणसं त्याला न्यायला येऊ लागली. तो परत येईपर्यंत अक्काबाईचा जीव टांगणीला लागायचा. कधी कधी नजर चुकवून, कुणाच्या तरी बैलगाडीत बसून तो हरवायचाच. मग अक्काबाई त्याचा माग काढत फिरत राही. तो दिसला की संतापाच्या लाव्ह्याचं रूपांतर साखरपाकात कसे होई ते तिला कधीच उमगलं नाही.

दादाराव गेल्याला तीन दशके उलटली. अन्याबा पन्नाशीत आला होता. केसातली सफेदी जाणवत होती. अक्काबाईला त्याच्या मागं फिरणं जमत नव्हतं. तोही जरासा शांत झाला होता. गावातलं कुणी मरण पावलं, की त्याच्या सरणापाशी बसून राहायला त्याला आवडायचं. अन्याबाने कुणाच्या देहात प्राण फुंकला नाही पण काहींचे अडकलेले श्‍वास मोकळे केले.

त्याच्यावर जीव लावणारी माणसं आता वाढत चालली होती. तरीदेखील आपल्या पाठीमागे अन्याबाचा निभाव कसा लागणार या एकाच विचाराने ती जगण्यास मजबूर होती. रोजच्या सांजेला तुळशीपाशी दिवा लावताना ती प्रार्थना करायची, ‘‘अन्याबाच्या आधी मला मरण देऊ नको !’’

Sameer Gaikwad
Salokha Yojana : कारलीच्या शेतकरी कुटे कुटुंबाला मिळाला सलोखा योजनेचा लाभ

अक्काबाईचं गाऱ्हाणं देवानं ऐकलं देखील. साथीच्या तापात अन्याबा दगावला. त्याचं अचेतन कलेवर घरी आणलं तेव्हा अक्काबाईच्या डोळ्यांच्या बाहुल्या गोठलेल्या होत्या. आपणच तर पोराचं मरण मागितलं नाही ना, असं तिला राहून राहून वाटू लागलं. अन्याबाच्या मृत्यूनंतरही तिने वस्ती सोडली नाही. तो जिथं जाऊन बसायचा तिथं ती बसून राहू लागली.

लोक म्हणू लागले, म्हातारीला लागिर झालं ! अक्काबाईनं अंथरूण धरल्यावर तिची थोराड पोरं शेतात येऊन राहिली, कशातच इच्छा उरली नसूनही तिची सुटका होत नव्हती. बऱ्याच संघर्षानंतर वैशाख पुनवेच्या रात्रीस तिची सुटका झाली.

वस्तीपासून तीसेक कोस अंतरावरील गोरखनाथाच्या वस्तीवरच्या एका अडलेल्या गायीचं वेत अन्याबाच्या अखेरच्या स्पर्शाने पार पडलं होतं. त्यात जन्मलेल्या गायीचं आता वय होऊनदेखील दावणीचं दावं तोडून आठवड्यापासून भिरभिरत होती.

अनेक वस्त्या, वाड्या, वेशी, गावं ओलांडून आडवाटेने अखंड चालून थकलेली ती बरोबर अक्काबाईच्या वस्तीवर आली. लख्ख चंद्रप्रकाशात अंगणातल्या बाजेवर पडलेल्या अक्काबाईपाशी ती कशीबशी पोहोचली. तिने आपल्या खरमरीत काटेरी जिभेने तिला चाटलं. निमिषार्धात अक्काबाईने ‘तो’ स्पर्श ओळखला, तिच्या तोंडून अस्पष्ट शब्द बाहेर पडले, ‘‘अन्याबा.. माझ्या बाळा...’’ इतकंच पुटपुटून तिचा देह शांत झाला.

रोज तिच्या मरणाची वाट बघणारे गाढ झोपी गेले होते, अक्काबाई चिरनिद्रेत गेली होती. बाजेला खेटून बसलेल्या गायीच्या डोळ्यातून अमृत पाझरू लागले. त्याचे थेंब मातीत ज्या पडले त्या मातीचेही पांग फिटले. उधळलेलं कोणतंही जित्राब त्या जागी आल्यास शांत होते.

तिथल्या मातीत असं काय होतं हे कुणालाच उमगलं नाही. दर साली वैशाख पुनवेच्या रात्री आभाळातून खाली उतरणाऱ्या लागिर झालेल्या चांदण्यांना मात्र सारं ठाऊक आहे. तिथं येताच त्या तृप्त होतात !

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com