अॅग्रोवन वृत्तसेवा
Solapur News : सोलापूर ः श्री सिद्धेश्वर मंदिर देवस्थानच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही २१ ते २५ डिसेंबर या कालावधीत सिद्धेश्वर कृषी प्रदर्शन भरवण्यात येत असून, चीनचा बोकड, सात किलोचा कोंबडा अन् बुटकी गाय हे यंदाच्या प्रदर्शनाचे आकर्षण आहे, अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद सोलापूर, महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या विशेष सहकार्याने हे प्रदर्शन भरविण्यात येत आहे. राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, विभागीय कृषी संशोधन केंद्र, रब्बी ज्यारी संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर या संस्थांचे सहकार्य मिळत आहे. या पत्रकार परिषदेला कृषी प्रदर्शन समितीचे अध्यक्ष गुरुराज माळगे, आत्माचे निवृत्त उपसंचालक विजयकुमार बरबडे, आर. एस. पाटील उपस्थित होते.
श्री. काडादी म्हणाले, की सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत सुरू राहणाऱ्या पाच दिवसांच्या या प्रदर्शनात रेशीम खादी ग्रामोद्योग, पशुसंवर्धन, सामाजिक वनीकरण व राष्ट्रीय बँका, नाबार्ड, कृषी महाविद्यालय, कृषी स्टार्टअप उद्योजक, नवा उद्योजक, कृषी यांत्रिकीकरण, फळ रोपवाटिकाधारक, साखर कारखाने यांच्यासह विविध संस्था सहभागी होणार आहेत.
प्रदर्शनामध्ये सोलापूरची शान असलेला खिलार बैल व गाईसह जगातील दुर्मिळ बुटकी देशी पुंगनूर जातीची गाय, म्हैस, चीनचा बोकड विशेष आकर्षण असणार आहे. तमिळनाडू बेल्लोर, रोलग तसेच सोलापूरसह नाशिक, पुणे बाएफ संस्था यांच्याकडील शेतकयांनी स्वतः तयार केलेले ५०० प्रकारचे दुर्मिळ देशी बी-बियाणेही इथे खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.
डॅाग शो ते देशी गाय, बैल प्रदर्शन
प्रदर्शनात २२ डिसेंबरला सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत कॅट शो व डॉग शो होणार असून, २३ ला राज्यस्तरीय देशी गाय, बैल प्रदर्शन आणि पुष्प प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. जिल्ह्यामधील कृषी व संलग्न, गारमेंट, टेक्सटाईल, टॉवेल आदी उत्पादित मालाचे प्रदर्शनही होणार आहे, याचदिवशी पारितोषिक वितरणही होईल.
प्रदर्शनात काय पाहाल
जगातील सर्वात दुर्मिळ बुटकी पुंगनूर गाय
भारतातील विविध कंपन्यांचे ट्रॅक्टर व शेती अवजारे
जगातील सर्वांत बुटकी म्हैस (राधा)
खास चीनमधून आणलेला बोकड
तब्बल ७ किलो वजनाचा कोंबडा
३०० हून अधिक शेतीविषयक कंपन्यांचा सहभाग
गारमेंट तसेच टेक्सटाईलची दालने
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.