Buldana News : केंद्र शासनाच्या माध्यमातून विविध विकासकामे राबविताना यामधून शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याची आवश्यकता आहे. त्यांनी उत्पादित केलेल्या पिकांना भाव मिळावा, त्यातून उद्योग निर्माण व्हावे, तरुणांना रोजगार मिळावा, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
खामगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर रविवारी (ता. ११) शेळद ते नांदुरा या रस्त्याच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.
श्री. गडकरी म्हणाले, मुबलक पाणी उपलब्ध असलेल्या भागाचे भविष्य उज्ज्वल असते. ज्यांच्याकडे पाणीसाठा नाही, ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यातील पाणीसाठ्यासाठी जिगाव प्रकल्पाला पाच हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. यातून जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र ५० टक्क्यांहून अधिक वाढविण्यात येणार आहे.
त्यासोबतच पाण्याचा खारेपणा कमी करण्यासाठी खारपाणपट्ट्यात ९०० प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या ठिकाणावरील खारेपाणी गोड्या पाण्याखाली आणण्यात येणार आहे. हा प्रकल्प ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येईल.
तसेच खारपाणपट्ट्यात झिंगा उत्पादनाला वाव असल्याने यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येईल. खारपाणपट्ट्यात असलेल्या खडकपूर्णा धरणामध्ये झिंगा उत्पादनासाठी प्रयत्न करण्यात येतील.
शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी पाण्याचा अभाव, कापूस उत्पादन आणि अधिक खर्चात असलेली शेती ही कारणे असल्याने याबाबतही उपाययोजना गरजेच्या आहे.
शेतकऱ्यांना समृद्ध जीवन जगण्यासाठी पाणी, रोजगार, शाळा, स्वच्छता, मालाला भाव, मैदान, हॉस्पिटल अशा सुविधा निर्माण झाल्यास समृद्ध जीवन जगतील. शेतीचा शाश्वत विकास करताना तलाव, नदी, नाल्यांचे खोलीकरण करण्यासोबत वाहत्या पाण्याला थांबविणे आणि थांबलेले पाणी जमिनीत मुरवण्यासाठी प्रयत्न झाल्यास पाण्याची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
स्त्यांसाठी भरीव निधीची घोषणा
श्री. गडकरी यांनी जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेल्या मलकापूर-बुलडाणा रस्ता विकासासाठी १२०० कोटी, बाळापूर -शेगाव रस्त्यासाठी ३५० कोटी, शेगाव-संग्रामपूर रस्त्यासाठी ३००, संग्रामपूर ते सीमेपर्यंत रस्त्यासाठी ३८५ कोटी रुपये विकासकामांची घोषणा यावेळी केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.