Sericulture Production : जळगाव जिल्ह्यात किनगाव बुद्रुक (ता. यावल) हे परिसरातील महत्त्वाचे व बाजारपेठ असलेले गाव आहे. शिवाराला निंबादेवी धरणाच्या पाण्याचा काहीसा लाभ होते.
त्यामुळे केळी, कापूस, मका, कांदा, गहू, कारली, टोमॅटो, कलिंगड, ऊस आदींनी भरलेले हिरवेगार शिवार दिसते. जमीन काळी कसदार, उत्पादनक्षम आहे. येथील गावकऱ्यांनी पाणी अडवा, पाणी जिरवा असे प्रयोगही राबविले आहेत.
रेशीम शेतीतील वराडे
गावच्या शिवारात कैलास वराडे यांची तीन एकर शेती आहे. कापूस, कांदा, मका, टोमॅटो ही त्यांची मुख्य पिके असून, त्यात हातखंडा तयार झाला आहे. शेतीतील जोखीम टाळण्यासाठी एका पिकावर अवलंबून न राहता त्यात ते विविधता ठेवतात. पाच एकर क्षेत्र ‘लीज’ वर घेतले आहे.
विहीर, दोन सालगडी आहेत. अलीकडील काळात शेतीला जोडधंदा असणे गरजेचे
झाले आहे.
त्यासाठी विविध व्यवसायांमधून रेशीम शेतीचा पर्याय वराडे यांना योग्य वाटला.
गावातील प्रमोद रामराव पाटील, विनय पाटील, सुनसगाव (ता. जामनेर) येथील मधुकर पाटील यांच्याकडून त्यांना रेशीम शेतीसंबंधी प्रेरणा मिळाली. बुलडाणा, छत्रपती संभाजीनगर आदी विविध भागांत जाऊन त्यांनी प्रत्यक्ष शेती व त्यातील बारकावे अभ्यासले. गावात वसुंधरा रेशीम शेती गटाची स्थापना झाली. त्यात वराडे सहभागी झाले आणि रेशीम शेतीला २०१८ मध्ये सुरुवात झाली.
रेशीम संगोपन गृहाची बांधणी
वडिलोपार्जित किनगाव बुद्रुक येथील शेतात ५० बाय २२ फूट लांबी, रुंदीचे रेशीम कीटक संगोपन गृह उभारले आहे. मध्यभागी १५ फूट तर आजूबाजूला १२ फूट उंची आहे. आतील भागात काँक्रिटीकरण आहे.
शेडमध्ये प्रत्येकी ४० बाय सहा फूट आकाराचे पाच मजली दोन रॅक्स आहेत. व्यवस्थापन सांभाळण्यासाठी एक कायमस्वरूपी मजूर आहे. कोष काढणीवेळी अतिरिक्त मजुरांचीही मदत घेतली जाते.
तापमान नियंत्रण
रेशीम कीटकांच्या संगोपनात आर्द्रता व तापमानासंबंधी काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात आर्द्रता अधिक वाढते. या काळात संगोपनगृहात हवा खेळती राहील याची दक्षता घेण्यात येते.
गरज भासल्यास कृत्रिम पद्धतीने उष्णता तयार केली जाते. जळगाव भागात उन्हाळ्यात तापमान ४२ अंशांच्याही पुढे जाते.
त्यासाठी संगोपनगृहाच्या आजूबाजूला हिरवी नेट लावली आहे.
त्यावर ठिबकच्या नळीद्वारे कायम ओलावा तयार केला जातो. सौरऊर्जेवरील ‘फॉगर्स’ही लावले आहेत. हिवाळ्यात छतावर ताडपत्री अंथरून संगोपनगृह अधिक बंदिस्त ठेवले जाते. कीटकांच्या रॅकभोवती प्लॅस्टिक पेपर लावून थंड वारे रोखले जातात.
रेशीम शेतीतील व्यवस्थापन
उन्हाळ्यात सुमारे २५ दिवस, हिवाळ्यात ३५, तर पावसाळ्यात २२ ते २३ दिवसांत रेशीम कोष उत्पादनाची बॅच. प्रति बॅच २०० अंडीपुंजांची.
चॉकी कीटक जालना येथून मागवतात. त्यातून बॅचचा कालावधी १० दिवसांनी कमी केला जातो.
त्यामुळे वर्षभरातील बॅचची संख्या वाढते. वर्षात ८ ते ९ बॅचेस होतात.
प्रति बॅच दोनशे अंडीपुंजांमागे १३५ पासून १६० किलोच्या दरम्यान उत्पादन साध्य.
बॅच आटोपल्यानंतर संगोपनगृहाची स्वच्छता, सफाई. शिफारशीत रसायनांच्या मदतीने
निर्जंतुकीकरण होते. या कार्यवाहीसाठी पाच ते सात दिवस लागतात. त्यानंतर पुढील बॅच सुरू होते.
व्ही वन जातीच्या तुतीची तीन एकरांत लागवड. पुरेसे व लवकर फुटवे येण्यासाठी छाटणी व्यवस्थापन केले जाते. तुतीचे वेगवेगळे प्लॉट तयार केले असून एका प्लॉटमध्ये छाटणी, कापणी झाल्यानंतर अन्य प्लॉटमध्ये ही प्रक्रिया साखळी पद्धतीने सुरू असते.
अर्थकारण
किनगाव परिसरातील रेशीम उत्पादक एकत्र येऊन सामाईकरीत्या वाहनातून रेशीम कोषांची पाठवणूक जालना बाजारपेठेत करतात. तेथे लिलाव झाल्यानंतर पैसे मिळतात. गुणवत्तेमुळे येथील बाजारात किनगावच्या रेशीम कोषांना उठाव आहे. प्रति किलो ४००, ५०० रुपयांपासून ९०० रुपयांपर्यंत दर मिळतो. वराडे सांगतात, की निविष्ठांचा तसेच वाढता उत्पादन खर्च, पाणी असा सर्वांगीण विचार करता पिकांच्या तुलनेत रेशीम शेतीत जोखीम कमी आहे. प्रति बॅच ५० ते ६० टक्क्यांपर्यंत नफा मिळतो.
महिन्याला नोकरीप्रमाणे कुटुंबाला मोठा आधार देणारे नियमित उत्पन्न मिळते. त्यामुळेच तीनही मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांना मोठे करणे शक्य झाले. याच उत्पन्नातून भाजीपाला शेतीतही अधिकची गुंतवणूक करता येते. मक्याचे एकरी २८ क्विंटलपर्यंत उत्पादन ते घेतात. त्यांचे शेत सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असून या भागात दरवर्षी वादळी पाऊस, गारपीट अशा समस्या येतात. त्यामुळे केळीची लागवड त्यांनी थांबविली आहे. त्यांच्यासह सात जणांनी यंदा टोमॅटोची गटशेती केली आहे.
सहकार्य
रेशीम शेतीसाठी प्रमोद पाटील, तत्कालीन रेशीम अधिकारी रवींद्र सांगळे, यावल तालुका कृषी विभाग, विनय पाटील, समाधान पाटील आदींचे मार्गदर्शन मिळाले. गावातील रेशीम उत्पादक प्रमोद नथ्थू पाटील, सुरेश महाजन, विलास पाटील, श्यामराव महाजन, गजानन इंगळे, देविदास कोळी आदींच्या संपर्कात वराडे असतात. एकमेकांचे अनुभव, माहितीचे आदानप्रदान होते.
कैलास वराडे, ९९२१२६४४३१
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.