Onion Seeds  Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Seed : रब्बी कांदा बियाण्याची चढ्या दराने विक्री

Team Agrowon

Nashik News : रब्बी कांद्याची आवक कमी होऊन बाजारात मागणी वाढल्याने सध्या कांद्याच्या दरात सुधारणा आहे. त्यातच चालू वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचा रब्बी कांदा लागवडीकडे कल आहे. मात्र, कांदा बियाण्याची उपलब्धता कमी भासवून विक्रेत्यांकडून रोख स्वरूपात बिलापेक्षा जादा पैशांची आकारणी होत असल्याचा गंभीर प्रकार शेतकऱ्यांनी ‘ॲग्रोवन’कडे बोलून दाखवला आहे.

त्यामुळे कृत्रिम टंचाईसह काळाबाजार होत असल्याने कृषी विभाग नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे अपेक्षित आहे. राज्यात सिंचन सुविधांच्या उपलब्धतेनुसार ४.५ ते ६ लाख हेक्टरपर्यंत रब्बी कांदा लागवडी होत असतात. यंदा वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने कांदा बीजोत्पादन क्षेत्र कमी होते.

परिणामी, घरगुती बियाणे व कंपन्यांकडे बियाण्यांची उपलब्धता कमी असल्याचे बोलले जात आहे. सुरुवातीला कंपनीनिहाय प्रतिकिलो १,८०० पासून २,३०० रुपयांपर्यंत विक्री झाली. मात्र आता काही विक्रेते कंपन्यांकडून बियाणे उपलब्ध होत नसल्याचे सांगून कंपन्यांनी निश्चित केलेल्या दरापेक्षा चढ्या दराने विक्री करत आहेत.

बियाणे उत्पादक कंपन्यांनी ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या सप्ताहात बाजारात कांदा बियाणे विक्रीसाठी आणले. वितरकांमार्फत ते उपलब्ध करून देण्यात आले. मात्र नंतरच्या टप्प्यात झालेल्या पाऊस व वाढलेल्या कांद्याच्या दरामुळे विक्रेता स्तरावर बियाणे विक्री होताना कंपनीने जाहीर केलेल्या रकमेचे बिल देऊन जास्त पैशांची आकारणी होत आहे. ज्या वेळी शेतकरी कांदा बियाण्याची मागणी करतात.

त्या वेळी बियाणे उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते आहे. मात्र अधिक दराचा दबक्या आवाजात निरोप दिल्यानंतर तत्काळ बियाणे विक्रेत्यांकडून उपलब्ध करून दिले जात आहे, असे शेतकऱ्यांनी कळविले. बाजारात जवळपास २० ते २२ कंपन्यांच्या माध्यमातून कांदा बियाणे उपलब्ध करून दिले जात आहे. त्याची विक्री १,८०० ते २,३०० दरम्यान होती. मात्र कृत्रिम टंचाई करून पहिल्या पासूनच काही विक्रेते २,५०० ते ३,००० रुपयांपर्यंत विक्री करत आहे.

मात्र शेतकऱ्यांना त्यापोटी बिल २,२०० किंवा २,३०० चे दिले जाते. याबाबत कृषी विभागाशी संपर्क साधला असता, ‘‘आमच्याकडे तक्रारी प्राप्त नाहीत. जर छापील किमतीपेक्षा अधिक दराने विक्री झाल्यास आम्ही कारवाई करू’ असे सांगून हात झुकले जातात. मात्र ही कृत्रिम टंचाई, बिलातील काळाबाजार कुणाच्या आशीर्वादाने होतोय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र रब्बी कांदा हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाचे दुर्लक्ष असल्याने शेतकऱ्यांची लूट होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

हे कृषी विभागाचे अपयश ः दिघोळे

मागील वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांना घरचे कांदा बियाणे उत्पादन घेता आले नाही. आता अनेक कांदा बियाणे उत्पादक कंपन्या आणि कृषी सेवा केंद्रचालक यांनी चढ्या दराने कांदा बियाणे विक्री करत आहेत. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना माफक दरात भेसळ विरहित कांदा बियाणे उपलब्ध होण्यासाठी कृषी विभागाने नियोजन करायला हवे होते; परंतु कांदा बियाणे खरेदीमध्ये शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या लूट होत आहे. हे कृषी विभागाचेच अपयश आहे. कंपन्या आणि विक्रेते अव्वाच्या सव्वा दरात कांदा बियाणे विक्री करून गब्बर नफा कमावत आहेत, असा आरोप महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : एक लाखावर शेतकरी अर्थसाह्यासाठी पात्र

Crop Damage : पावसामुळे २४ हजार हेक्टरवरील पिके धोक्यात

Crop Damage : सततच्या पावसामुळे काढणीला आलेल्या सोयाबीनचे नुकसान

Rabi Season : रब्बी पेरणीसाठी ४७ हजार क्विंटल बियाण्याची मागणी

Pik Vima Bharpai : शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ८१४ कोटी रुपयांची पिकविमा भरपाई; आंबिया बहार २०२३-२४ मधील नुकसानग्रस्तांना दिलासा

SCROLL FOR NEXT