Flood  Agrowon
ॲग्रो विशेष

Flood : लोकसहभागातून पूरमुक्तीचा ‘साखरपा पॅटर्न’

संगमेश्‍वर तालुक्यातील (जि. रत्नागिरी) कोंडगाव- साखरपा या गावाने लोकसहभागातून नदीच्या पूर परिस्थितीवर कायम स्वरूपी मात केली आहे. या गावात लोकसहभागातून ‘काजळी नदी जलसंवर्धन अभियान’ ही लोक चळवळ सुरू झाली. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून नदीतील गाळ काढण्यात आला.‘साखरपा पॅटर्न’ने गावाला पुरापासून वाचवले आहे. कोकणातील सर्वच नद्यांवर अशापद्धतीने काम करणे आवश्यक आहे.

टीम ॲग्रोवन

डॉ. सुमंत पांडे

निसर्गात होणारे बदल (Climate Change) आणि मानवी हस्तक्षेप यामुळे अलीकडल्या काळात नदीचे स्वरूप आणि रूप बदलत आहे. वातावरणीय बदलांमुळे तापमान (Global warming) आणि पर्जन्यामध्ये (Rainfall) वाढ होत आहे आणि तसे निसर्गाचे रूपच बदलत आहे. कधी भरपूर पाऊस त्यानंतर भरपूर थंडी आणि प्रचंड उन्हाळा हे तीनही ऋतू तीव्रतेने जाणवतात.तसेच मानवी हस्तक्षेपदेखील तेवढाच कारणीभूत आहे, असेही तज्ज्ञांचे मत आहे.

याचा परिणाम नद्यांना पूर येऊन होणारी जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणावर असते. पुरानंतर लगेचच येणारा दुष्काळ हेही एक अलीकडच्या काळातील वास्तव आहे. यावर लोकसहभागातून मार्ग निघू शकतो. काही बाबी अंगी बाणवल्या आणि व्यवस्थित समजून नियोजन केले, तर पूर आणि दुष्काळासारख्या संकटावर नक्कीच मात करता येऊ शकते.

कोकणातील नद्यांची स्थिती ः

कोकण हा पश्‍चिम वाहिन्या नद्यांचा प्रदेश. कोकणात सुमारे २२ उपनदी खोरे आहेत. राज्यातील एकूण पर्जन्यमानाच्या ११ टक्के पाऊस एकट्या कोकणात पडतो. कोकणातील नद्यांची लांबी ही अत्यंत कमी आहे. तुलनेने घाटावरील नद्या या हजारो किलोमीटर वाहतात. तथापि, कोकणातील नद्या समुद्राला मिळण्यापूर्वी काही किलोमीटर म्हणजेच जास्तीत जास्त शंभर किलोमीटर एवढी त्यांची लांबी आहे.

पश्‍चिम घाटाच्या भागात सह्याद्रीच्या माथ्यावर पडणारा पाऊस (२००० ते ६००० मिलिमीटर) इतका असतो. या पावसाचे पाणी पश्‍चिम वाहिनी नद्यांमध्ये वेगाने येते आणि समुद्रास मिळते. या वेगामुळे कोकमातील नद्या जुलै आणि ऑगस्टमध्ये मोठा पूर आणतात. सोबत गाळ, मोठे गोटे वाहून येतात. महापूर ओसरला, की हा आलेला गाळ जेथपर्यंत आला तिथेच थांबतो. पुढच्या पावसाळ्यात हीच प्रक्रिया पुन्हा घडते. यामुळे अनेक ठिकाणी नद्यांचे पात्र सखल झाले आहे.

नदीने आपला प्रवाह अनेक ठिकाणी बदललेला दिसतो. याबद्दल निसर्ग आणि मानवी हस्तक्षेप या दोघांच्या आघातामुळे पूर मानवी वस्तीमध्ये शिरत असल्याचे अनेक उदाहरणे अलीकडल्या काळात स्पष्टपणे दिसतात. २००५ चा महापूर महत्त्वाचा आहे. या काळात एका दिवसात सुमारे नऊशे मिलिमीटर पाऊस पडला आणि त्यामुळे झालेले नुकसान हे अपरिमित होते, हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. मुंबईमध्ये झालेला प्रलय आणि त्याच कालावधीमध्ये कोकणामध्ये देखील अनेक ठिकाणी पुराचे पाणी गावामध्ये बाजारपेठांमध्ये शिरले होते. यातून अनेक गावांनी धडा घेतला आहे.

...असा आहे साखरपा पॅटर्न

कोंडगाव- साखरपा (ता. संगमेश्‍वर, जि. रत्नागिरी) या गावाने लोकसहभागातून पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी राबविलेला उपक्रम दिशादर्शक ठरणारा आहे. साधारणपणे मे, जून या कालावधीमध्ये वादळे येतात. तसेच पुढे अतिपावसामुळे उथळ नद्यांना पूर येतात.

रत्नागिरी ते कोल्हापूर महामार्गावर काजळी नदीच्या तीरावर साखरपा हे गाव आहे. विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या देवडे गावापासून काजळी नदीचा उगम होतो. ही नदी रत्नागिरीच्या भाट्ये खाडीपर्यंत वाहते. ही नदी एकूण ७२ किलोमीटर वाहते. सुमारे ७२ ते ७५ गावे या नदीच्या दोन्ही तीरांवर वसलेली आहेत.

विशाळगडाच्या पायथ्यापासून निघणाऱ्या काजळी नदीस आंबा घाटातून येणारी केव नदी मिळते. दोन्ही नद्यांचा संगम कोंडगावच्या पूर्वेस होतो. या ठिकाणी मोठा जलप्रपात निर्माण होतो. गावाला वळसा घालून जात असताना या पुरामुळे नदी आपला प्रवाह बदलते. साखरपा बाजारपेठेमध्ये गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पूर येत आहे. यामुळे होणारे नुकसान अपरिमित आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यांमध्ये येथील सर्व जनता सतर्क असते.

तथापि अचानक आलेला पूर हानी करून जातोच. सातत्याने येणाऱ्या पुरापासून गावाचे होणारे नुकसान टाळणे हा प्राधान्यक्रम ठरवून ग्रामस्थांनी पाठपुरावा केला. तथापि, त्यांना नेमकी उपाययोजना काय करावी? आणि त्यासाठी निधी कसा उभारावा याची स्पष्ट कल्पना नव्हती. लोकसहभागातून ‘काजळी नदी जलसंवर्धन अभियान’ ही लोक चळवळ सुरू झाली. या उपक्रमाला ग्रामपंचायत, दत्त देवस्थान, कोंडगाव- साखरपा यांची साथ मिळाली.

२००५ ते २०१९ या कालावधीमध्ये पुरापासून मुक्तीचा मार्ग काढण्याची चर्चा सुरू झाली. २०१९ मध्ये ‘नाम फाउंडेशन'ची या लोकचळवळीला साथ मिळाली. नाना पाटेकर, मल्हार पाटेकर, मकरंद अनासपुरे आणि समीर जानवळकर, गणेश थोरात यांनी नदी स्वच्छतेसाठी मार्गदर्शन तसेच मोफत यंत्रे पुरवण्यासाठी होकार दर्शविला. इंधन आणि आनुषंगिक खर्चाची तजवीज गावकऱ्यांना करणे गरजेचे होते.

कामाचे नियोजन आणि आराखडा :

नदीचा अभ्यास करणे हा पहिला टप्पा होता. गावाला पूरमुक्त करण्यासाठी डॉ. अजित गोखले (जलनायक आणि नॅचरल सोल्यूशनचे संस्थापक) यांनी या नदीचा काटेकोरपणे शास्त्रीय अभ्यास केला. नदीचा उगमाची समुद्र सपाटीपासूनची उंची सुमारे ८१० मीटर आहे आणि कोंडगाव-साखरपामध्ये नदी आल्यावर समुद्र सपाटीपासूनची उंची ७० मीटर आहे. या दोन्हींमध्ये तफावत सुमारे सातशे मीटर एवढी आहे. त्यानुसार त्यांनी नेमके काम कसे करावे हे सुचविले. पुराचा गाळ साचल्यामुळे नद्या उथळ होतात आणि पर्यायाने रुंद देखील होतात, हे डॉ. गोखले यांनी समजावून सांगितले. नदीतील गाळ काढण्याबाबत मार्गदर्शन केले.

नदीच्या एक किलोमीटर क्षेत्रातील गाळ हटवून बाहेर टाकण्यासाठीचा खर्च सुमारे ३५ ते ४० लाख रुपये होता. दत्त देवस्थान, कोंडगाव-साखरपा येथील नागरिक गिरीश सरदेशपांडे, प्रसाद सरदेशपांडे, मुग्धा सरदेशपांडे यांनी श्रीधर कबनूरकर यांच्यासोबत नियोजन केले. प्रत्येकाने स्वतःचा काही आर्थिक सहभाग निश्‍चित केला. गावातील व्यापाऱ्यांकडून निधी गोळा करण्यास सुरुवात केली. तथापि, त्याला मिळालेला प्रतिसाद अत्यल्प होता. त्यानंतर कोंडगाव-साखरपा येथील दत्त देवस्थान ट्रस्टने आपल्या निधीतून काही रक्कम द्यायचे ठरविले. प्रत्यक्ष कामाला ८ फेब्रुवारी, २०२१ पासून सुरुवात झाली.

नदीतील गाळ काढण्यासाठी नाम फाउंडेशनने दोन यंत्रे पुरविले. यासाठी लागणारे इंधन आणि गाळ नदीपासून लांब नेऊन टाकण्यासाठीची वाहतूक व्यवस्था यासाठीचा खर्च गावकऱ्यांना करावयाचा होता. याची तजवीज करून काम सुरू केले. दररोजचा खर्च सुमारे ३० ते ३५,००० रुपये होता. नदीतील गाळ काढण्याचे काम २५ मे २०१९ पर्यंत चालले. यामध्ये एक आठवडा तोक्ते वादळामुळे काम थांबवावे लागले होते.

यामध्ये नदीच्या एक किलोमीटर क्षेत्रामध्ये साठ मीटर रुंद आणि चार मीटर खोल या पद्धतीने काम करण्यात आले. कोकणातील नदीतील गाळ हा दगड गोटे, मोठ्या कातळांच्या स्वरूपामध्ये असतो. हा गाळ तांत्रिक अधिकारी आणि डॉ. अजित गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली नदीच्या तीरावर किमान तीन ते चार थर टाकून ठेवण्यात आला. यामुळे नदी गावात येण्यासाठीचा मार्ग खोल झाला. नदी प्रवाहित झाली. नदीतून निघालेल्या गाळ हा दोन्ही बांधावर टाकल्यामुळे पाणी बाहेर पडले नाही.

पुरापासून गाव वाचले ः

२३ आणि २४ जुलै २०२१ रोजी मोठ्या पावसामुळे नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले. सर्व गावकरी जीव मुठीत धरून नदीकडे पाहत होते. रात्री अकराच्या सुमारास नदीमध्ये आलेले पाणी दोन्ही काठांना भिडले परंतु गाळ काढल्यामुळे हे पाणी वेगाने अरबी समुद्राकडे गेले. दोन दिवसांच्या अति पावसाने देखील नदीचे पाणी गावात आले नाही हे सर्वांनी पाहिले. थोडक्यात, लोकसहभागातून गावाचे पुरापासून संरक्षण झाले.‘साखरपा पॅटर्न’ने गावाला पुरापासून वाचवता येईल हे सिद्ध केले. थोड्याफार फरकाने कोकणातील सर्व नद्यांची हीच स्थिती आहे. साखरपा गावासारखे काम प्रत्येक नद्यांवर होणे गरजेचे आहे. छोट्या नद्या, ओढे-नाल्यांवर देखील अशाच प्रकारचे काम गरजेचे आहे.

संपर्क ः चैतन्य सरदेशपांडे, ९१३०३७६७१०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhansabha 2024 Live Result : राज्यातील पहिला निकाल जाहीर; वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कोळंबकर विजयी

Satara Assembly Election 2024 : साताऱ्यातील जनतेचा महायुतीकडे कल, सर्वच मतदारसंघात भाजप महायुतीची आघाडी

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 : आदिती तटकरेंचा विजय निश्चित; कोकणातील पहिला निकाल स्पष्ट

Eknath Shinde On Maharashtra Assembly Election 2024 : लाडकी बहीण, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांच्यामुळे आमचा विजय, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

Poultry Processing Product : अबब! कडकनाथच्या अंड्यांपासून एवढी उत्पादने?

SCROLL FOR NEXT