Russia-Ukraine War
Russia-Ukraine War Agrowon
ॲग्रो विशेष

Russia-Ukraine War : रशियाच्या निर्णयाने वाढला जगाचा ताप

Team Agrowon

डॉ. संतोष डाखरे

Russia-Ukraine War Update : रशिया-यूक्रेन युद्धावरून जगात सध्या तणावाचे वातावरण आहे. वर्ष लोटून गेले तरी युद्ध संपण्याचे नाव घेत नाही. दोन्ही देश युद्धातून माघार घेण्यास तयार नसल्याने गुंता अधिकच वाढला आहे.

दोन दिवसांत युद्ध संपवू या निर्धाराने उतरलेल्या रशियाला वर्षभरानंतरही विजयश्री प्राप्त होत नाही आहे. अर्थात युक्रेनला अमेरिकेसह अन्य राष्ट्रांचे पाठबळ असल्याने हे युद्ध लांबत चालले यात दुमत नाही.

प्रत्यक्षात युक्रेनला बेचिराख करणे हा रशियाचा उद्देश मुळीच नव्हता. युक्रेनने नाटो समूहात समाविष्ट होऊ नये याकरिता निव्वळ धमकी देण्याच्या उद्देशाने रशियाने हा युद्धाचा डाव रचला होता.

सोव्हिएट संघाच्या पतनानंतर स्वतंत्र देश म्हणून उदयास आलेला अण्वस्त्रहीन युक्रेन युद्धाचे परिणाम बघू जाता आम्ही नाटोमध्ये सहभागी होणार नाही, अशी ग्वाही देईल आणि युद्धाला विराम लागेल असा ठोकताळा रशियाने बांधला होता.

मात्र संकटात संधी शोधत असलेल्या अमेरिकेने रशियाच्या मनसुब्यावर पाणी फेरले. अमेरिका रशियाला अजूनही पाण्यातच पाहत असतो. रशिया हाच आपला प्रतिस्पर्धी आहे, असे अमेरिकेला सतत वाटत असते.

द्वितीय महायुद्धानंतर तब्बल तीन ते चार दशके या दोन देशात शीतयुद्धाची परिस्थिती होती. मात्र नव्वदच्या दशकात सोव्हिएट रशियाचे विघटन झाले आणि बलाढ्य अशा रशियातून अनेक छोट्या देशांची निर्मिती झाली. त्यामुळे साहजिकच रशियाचे बळ कमी झाले.

तत्पूर्वी सर्वच पातळीवर अमेरिकेशी टक्कर घेणारा रशिया आता कमजोर झाला होता. वर्तमानात तर अमेरिकेशी बरोबरी करणे रशियाला शक्य नाही हे जगाला ठाऊक आहे. तरीसुद्धा अमेरिका रशियाबाबत पराकोटीचा द्वेष बाळगून आहे.

रशिया कसा कमकुवत होईल या संधीच्या शोधात असलेल्या अमेरिकेला युक्रेन-रशिया युद्धाच्या बहाण्याने आयतेच कोलीत हाती लागले आहे. त्यामुळेच युक्रेनच्या खांद्यावर बंदूक ठेवून युक्रेनला शस्त्रांची रसद पुरवून रशियाला कमकुवत करण्याचे मनसुबे अमेरिका आखत आहे.

मात्र यामुळे अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये कमालीचे वितुष्ट येत आहे. रशियाने नुकतेच हेरगिरीच्या संशयावरून अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र ‘द वॉलस्ट्रीट जर्नलच्या’ पत्रकारास रशियातून अटक केली आहे. रशियन सुरक्षा दलाने असा दावा केला आहे की, हा पत्रकार अमेरिकेसाठी हेरगिरी करत आहे.

रशियन शस्त्रनिर्मिती कारखान्यांची हेरगिरी करून ती माहिती अमेरिकेला पुरवीत असल्याच्या संशयावरून या पत्रकाराला अटक केल्याचे रशियाने सांगितले. या माध्यमातून रशियाने अमेरिकेला आमच्या प्रकरणात अधिकची लुडबुड करू नये, असा संदेश दिला आहे. मात्र रशियाच्या या कृतीवरून आणखी राजकारण तापू शकते, हे मात्र निश्चित आहे.

अशातच यापुढे रशियामध्ये निर्माण होणाऱ्या कोणत्याही परमाणू शस्त्रांची, चाचण्यांची माहिती रशिया अमेरिकेला पुरविणार नाही, असा आणखी एक मोठा निर्णय रशियाने घेतला आहे.

रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या वाढत्या हस्तक्षेपावरून रशियाने हा निर्णय घेतला आहे. मागच्याच महिन्यात रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये झालेला ‘न्यू स्टार्ट करार’ मोडीत काढत असल्याची घोषणा केली होती.

दोन्ही देशांमधील हा करार संपुष्टात येणे जगावरील नवीन संकटांची नांदी असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

शीतयुद्धाच्या कालावधीत अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये परस्पर शत्रुत्वातून परमाणू शस्त्रनिर्मितीची स्पर्धा लागली होती. यातूनच दोन्ही देशांकडे मोठ्या प्रमाणात विनाशकारी शस्त्रसाठा तयार झाला होता.

शस्त्रास्त्रांची वाढती संख्या लक्षात घेता यावर बंधने म्हणून दोन्ही देशांनी एक करार करण्याचे ठरविले त्यालाच ‘न्यू स्टार्ट (Strategic Arms Reduction Treaty) करार’ असे म्हटल्या गेले. हा करार ५ फेब्रुवारी २०११ रोजी अमलात आला. त्याचा कालावधी दहा वर्षे म्हणजे सन २०२१ पर्यंत होता, जो २०२६ पर्यंत आणखी पाच वर्षे वाढवण्यात आला.

जोपर्यंत हा करार लागू आहे तोपर्यंत दोन्ही देश अण्वस्त्रांचा साठा मर्यादित ठेवतील, असे त्यात म्हटले आहे. या करारांतर्गत, दोन्ही देशांनी ७०० सामरिक शस्त्रे प्रक्षेपक तैनात करण्यास सहमती दर्शविली होती.

यामध्ये आंतरखंडीय क्षेपणास्त्रे, पाणबुडीपासून प्रक्षेपित होणारी क्षेपणास्त्रे आणि अण्वस्त्रांनी सज्ज अशा बॉम्बवर्षाव करणाऱ्या विमानांचा समावेश होता. यासोबतच परमाणू अस्त्रांची संख्या १५५० पर्यंत सीमित करण्याचेही मान्य करण्यात आले होते. या करारानुसार अणुचाचणीपूर्वी अमेरिकेला अवगत करणे रशियाला बंधनकारक होते.

आजवर सगळं आलबेल होतं, मात्र आता हा करार संपुष्टात आल्याने रशियाची अमेरिकेसोबत अण्वस्त्रांची शर्यत पुन्हा सुरू होऊ शकते. रशिया स्वतःच्या संरक्षणासाठी अण्वस्त्रे विकसित करणार असल्याची घोषणा खुद्द पुतीन यांनी केली आहे.

‘अमेरिका आणि त्यांचे नाटो सहकारी युक्रेनमध्ये रशियाचा पराजय व्हावा याकरिता प्रार्थना करीत असून या पार्श्वभूमीवर आमच्या शस्त्र निर्मितीवर असलेले अमेरिकेचे नियंत्रण आता आम्ही धुडकावून लावत आहो,’ अशी घोषणा पुतीन यांनी केली आहे.

रशियाकडे जगातील सर्वांत जास्त अण्वस्त्रे आहेत. सामर्थ्याच्या बाबतीत रशियाची अण्वस्त्रे देखील जगातील सर्वांत शक्तिशाली आहेत. अशा परिस्थितीत रशिया नवीन शस्त्रे बनवण्यासाठी अणुचाचणीही करू शकतो.

रशियाचा मुकाबला करण्यासाठी अमेरिकाही अण्वस्त्रांच्या मागे धावू शकते. त्या पाठोपाठ अन्य राष्ट्र सुद्धा अण्वस्त्रनिर्मिती नव्याने सुरू करू शकतात. त्यामुळे जगात पुन्हा अण्वस्त्रांची शर्यत सुरू होऊ शकते.

युक्रेनच्या समर्थनार्थ अमेरिका आणि नाटो राष्ट्र स्पष्टपणे समोर येत असल्याने आता रशियाने सुद्धा त्यांच्यावर दबाव वाढविण्याची रणनीती आखली आहे. रशियाचा सच्चा सहकारी असलेला बेलारुसमध्ये क्षेपणास्त्रे तैनात करणार असल्याची घोषणा रशियाने नुकतीच केली आहे.

याच बरोबर सायबेरियामध्ये परमाणू शस्त्रांसह युद्धसराव सुरू केला आहे. यामध्ये तब्बल तीन हजार सैन्य आणि तीनशेच्यावर वाहनांचा समावेश आहे. यामध्ये अकरा हजार किलोमीटर मारक क्षमता असलेल्या बेलेस्टिक मिसाईलचा सुद्धा समावेश आहे.

या माध्यमातून रशिया युक्रेनला मदत करू पाहणाऱ्या अमेरिका आणि नाटो देशांना आपली परमाणू ताकद दाखवीत असल्याचे बोलले जाते. अशातच चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी रशियाचा दौरा करून आम्ही या मुद्यावर रशियाच्या सोबत असल्याचा अप्रत्यक्ष इशारा अमेरिकेला दिला आहे.

एकंदरीत या सर्व घडामोडींनी आंतरराष्ट्रीय राजकारण तापू लागले असून नजीकच्या भविष्यात जागतिक शांततेची वाट अधिकच बिकट होणार असल्याचे चिन्ह आहे.

(लेखक आंतरराष्ट्रीय घडामोडीचे जाणकार आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT