Village Story : आपल्याकडे कृषिसंस्कृतीत राबण्यासाठी अजूनही मोठ्या प्रमाणात माणसांची गरज असते. पूर्वी तर ती अधिकच होती. शेती सोबतच शेतकऱ्यांकडे पशुधनही मोठ्या प्रमाणावर असे. शिवाय हे पशुधन देशी वाणाचे असल्यामुळे त्यांना माळावर, कुरणावर अथवा डोंगरावर चारण्यासाठी न्यावे लागे. त्यासाठी माणसे लागत आणि शेतीच्या कामासाठीही माणसे लागत. हे करत असतानाच घरची कामे देखील सुरूच असत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबात कितीही माणसे असली, तरी त्या माणसांना पुरेल एवढे काम नक्की असे आणि जर नसलेच तरीसुद्धा अशी कामे काढली जात. साहजिकच कुटुंबातील सदस्यांना सहसा परगावी जाण्यास मिळत नसे. जी गोष्ट आपल्या वाट्याला येत नाही त्या गोष्टी बद्दल आकर्षण वाढते. आपले मूल शिक्षणाच्या निमित्ताने म्हणा किंवा कामधंद्याच्या निमित्ताने म्हणा परगावी जाईल, असे मनसुबे देखील काही आईच्या मनात येत असणार.
मूल अगदी लहान वयात असताना ते हट्ट धरून आई सोबत चालायला लागते. तेव्हा अगदी ते उन्हाचीही पर्वा करत नाही. आपल्या बाळाचे असे उन्हात चालणे तिला त्रासदायक ठरते. एका जात्यावरील ओवीत ही मातृभावना सुंदररीत्या व्यक्त केली.
‘‘माझ्या ना जीवामंदी तुझा जीव तरी घाल
राजस बाळा माझ्या रे, माझ्या सावलीला चाल.’’
अशी मातृप्रीतीची आणि वात्सल्याची छाया लाभलेला पुत्र भाग्यवानच म्हटला पाहिजे. पुढे जेव्हा थोडा मोठा झाल्यावर हा पुत्र गावाला जाई तेव्हा त्याची माउली त्याच्या घरी परतण्याची वाट पाहत राही. तशातच उशीर झाला आणि जेवणाची वेळ झाली तरी त्या माउलीला जेवण गोड लागत नसे. आपला लेक आता येईलच, त्याला काही अडथळा आला असेल का? तो लवकरच दूर होऊन लेकरू लवकर आले पाहिजे. याची ती काळजी करत राही. ती गाण्यातून...
‘‘गावाला गेला माझ्या मनीचा मोहन
बाळाच्या वाचून गोड लागाना जेवण.’’
पूर्वी गावाला जाणे आजच्या इतके सोपे नव्हते. प्रवासाची साधने उपलब्ध नसत. अनेक ठिकाणी तर पायीच जावे लागे. पायी प्रवास किंवा बैलगाडीतील प्रवास म्हटले की मग ऊन- वारा, पाऊस यांचा सामना करणे आलेच. ज्या कारणासाठी किंवा कामासाठी गावी जायचे ते कामही पूर्ण व्हायला हवे. एखाद्या अलंकाराहून प्रिय आणि आवडत्या आपल्या लेकराच्या वाटेकडे डोळे लावून बसण्याची वेळ स्त्रियांच्या एका ओवीतून स्वाभाविक प्रकट झालेली आहे. जात्यावरील ओव्यात असे कुटुंबवत्सलतेचे विविधांगी भावविश्व अवतरले. एका ओवीत लेकाची वाट पाहणारी स्त्री व्यक्त होते ती अशी...
‘‘गावाला गेला माझ्या मुरणीचा दांडा
सावळ्या बाळाच्या ऊन लागन गोऱ्या तोंडा.’’
सभागती म्हणजे सहजपणे, नकळतपणे जाता येता उन्हाचा फटकारा लागू शकतो. त्यासाठी डोक्याला रुमाल बांधायला हवा, पिण्यासाठी पाणी किंवा पोहरा जवळ हवा. ‘गुजे विन हित कोण सांगणार?’ आई शिवाय इतकी काळजी कोण करणार? तीच आई ओवीतून व्यक्त होई...
‘‘गावाला गेला माझ्या मुरणीचा मोती
सांगते बाळा ऊन लागन सभागती.’’
काळ कोणताही असो जुना असो की नवा, माणसांचा सतत संघर्ष सुरूच असतो. सामाजिक संघर्ष असतो तसाच कौटुंबिक संघर्षही असतोच. कधी कधी अचानक समोर येणारी संकटेही असतात. या अडथळ्यांना तोंड देत मार्गक्रमण करायचे असते. वडील म्हणजे घराचे छत्र. काही वेळा दुर्दैवाने ते हरवते मग घरातील स्त्रीला घराचे पालकत्व सांभाळावे लागते. वडील असतील तर मुलांचे लाड अधिक केले जातात, त्यांचे छंद पुरवले जातात. त्यांच्या पश्चात स्वतःला भक्कम करत, घराला आधार देत असताना देखील त्या स्त्रीला चिंता असते ती
स्वतःच्या लेकरांची! गावावरून आलेले आपले लेकरू सुकलेले पाहून लोकगीतातील स्त्री ओवीतून व्यक्त होते.
‘‘कम्हुन सूकलास रे मह्या मखमालीच्या गेंदा
राजस बाळा मह्या रे, पिता नाही तुह्या छंदा.’’
परिस्थिती कशीही असो त्यातून उत्कर्षाचा मार्ग शोधावयाचा असतो. त्यासाठी कणखर शरीर आणि मनःस्थिती आवश्यक असते. आधी शरीराला मजबूत बनवायचे तर आईलाच मुलाला खाण्याविषयी समजावे लागते. भाजीपाला खाणे अत्यंत गरजेचे असते. त्यातून शरीराला आवश्यक असणारी खनिजे आणि जीवनसत्त्वे मिळतात. भाजीपाला खाल्ला तरच अंगावर मांस येईल आणि मग अंगातील ताकद बघून भांडणारे लोकही शरण येतील. लहान लेकरांना खाण्याविषयक समजून सांगणारी स्त्री लोकसाहित्यात भेटते. ती गाते...
‘‘आधी खावा भाजीपाला मग येईन देवदया
राजस बाळा मह्या ना कैक पडतेन पाया.’’
आज मुलाने घरापासून दूर जावे आणि त्याने काहीतरी कामधंदा करावा अशी गावखेड्यातील आईची इच्छा असते. आता त्याला पाठविण्यासाठी आणि परत बोलावण्यासाठी काही गाणी नाहीत पण वात्सल्य तेच आहे.
(लेखक ग्रामीण कवी व कादंबरीकार आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.