Solapur News : सोलापूर जिल्ह्यात फेब्रुवारीपासूनच उष्णतेच्या झळा तीव्र झाल्या आहेत. गेल्या पंधरवड्यापासून तापमानाचा पारा तब्बल ३७-३८ अंश सेल्सिअच्या घरात पोहोचला आहे. परिणामी, उष्णतेचा मोठा फटका डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष या फळांसह भाजीपाला पिकांना बसतो आहे. उन्हाच्या तडाख्याने पिकांना पाण्याचा ताण पडतो आहेच, पण पिकांचीही होरपळ होत आहे.
सोलापूर हा कायम दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो, पण सर्वाधिक ऊन सोसणार जिल्हा म्हणूनही जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यात एप्रिल आणि मे महिन्यात दरवर्षी तब्बल ४० ते ४२ अंश सेल्सिअसच्याही पुढे तापमान जाते. पण यंदा महिना-दीड महिना आधीच फेब्रुवारीमध्येच तीव्र उन्हाच्या झळा सोसण्याची वेळ सोलापूर जिल्ह्यावर आली आहे.
विशेष म्हणजे सकाळी कडाक्याची थंडी आणि दुपारी ऊन आणि पुन्हा सायंकाळी थंडी, असे मिश्र वातावरण राहत असल्याने मानवी जीवनावरही त्याचा परिणाम होत आहे. ताप, कणकण, डोकेदुखी असे आजार सुरु झाले आहेत. लहान मुले, वृद्धांच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. गेल्या आठ दिवसात तापमानाचा पारा सातत्याने वाढतो आहे, तो ३६, ३७ आणि ३८ अंशांवर पोहोचला आहे.
जिल्ह्यात डाळिंब, द्राक्ष, केळी, आंब्याचे क्षेत्र सर्वाधिक आहे, या उन्हामुळे डाळिंबाच्या फळ अवस्थेतील बागांना सनबर्निंग होत आहे, फळांचे तडकण्याचे प्रमाण वाढले आहे. कळी निघण्याच्या अवस्थेतील डाळिंबाची कळी ड्रॉप होत आहे.
त्याशिवाय आंबा, केळी या फळपिकांवर उन्हाच्या तीव्रतेने चट्टे पडू लागले आहेत. दोन्ही प्रकारच्या तापमानात बदल होत असल्याने आंब्याचा मोहर काळा पडतो आहे, आधीच मोहराचे प्रमाण ३ ते ५ टक्के असते, त्यात तेही खराब होत आहे, शिवाय पाण्याचा मोठा ताण पडतो आहे.
केळीमध्ये केळीफूल बाहेर पडण्याच्या अवस्थेत आहे, तिथे अधिकच्या तापमानामुळे घड सटकून पडत आहेत, तर काही ठिकाणी केळीफूल परिपक्व व्हायच्या आधीच त्याचे नुकसान होत आहे. द्राक्षाचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे, पण अनेक ठिकाणी मणी कुजण्याचे प्रमाण वाढले आहे. याशिवाय कांदा, उन्हाळी भाजीपाला पिकांना पाण्याचा सर्वाधिक ताण पडतो आहे. अनेक ठिकाणी ही पीके होरपळत असल्याचे चित्र आहे. भाजीपाला पिकामध्ये विशेषतः हिरवी मिरची, टोमॅटो, या पिकांमध्ये रसशोषक किडीचा प्रादुर्भाव, चुरडा-मुरडाचे प्रमाण वाढले आहे.
सोलापुरातील गेल्या सहा दिवसातील किमान कमाल तापमान (अंश सेल्सियसमध्ये)
२५ फेबुवारी किमान १९.४, कमाल ३६
२४ फेब्रुवारी किमान १९.१, कमाल ३७.६
२३ फेब्रुवारी किमान १९.९, कमाल ३७.९
२२ फेब्रुवारी किमान २१.६, कमाल ३८
२१ फेब्रुवारी किमान ३७.६, कमाल २२
२० फेब्रुवारी किमान २०.२, कमाल ३८.१
आम्ही या हंगामात सर्वाधिक भाज्या करतो, पण वाढत्या उन्हामुळे भाज्या पिवळ्या पडत आहेत. या आधीही केवळ उन्हामुळे कोथिंबीर आणि मेथीचा प्लॅाट सोडून दिला. आताही कोथिंबीर पिवळी पडली आहे. खर्चही निघण्याची शक्यता कमीच आहे.- सौ. साऊबाई गोरख शेळके, शेतकरी, हराळवाडी, ता. मोहोळ
यंदा तापमानात एकदमच वाढ झाली आहे. शिवाय थंडी आणि ऊन असे संमिश्र वातावरण होत आहे. त्यामुळे पिकांना फटका बसतो आहे. सनबर्नची समस्या अधिक आहे, त्यासाठी पाण्याचा ताण ओळखून पाणी द्यावे, तसेच सनबर्नच्या धोक्यापासून वाचण्यासाठी पेपरकव्हरचा वापर करावा.- सूरज मिसाळ, विषय विषेशज्ञ, कृषी हवामानशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.