Pune News : गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यानंतर आतापर्यंत कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे. यावरून राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वक्तव्य केलं आहे. कांद्याच्या दर घसरणीला आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या या अवस्थेला कांदा व्यापारीच जबाबदार असल्याचे मंत्री विखे यांनी म्हटले आहे.
विखे म्हणाले, भारतीय कांद्याला जगभरात मागणी असून आजही ५ लाख टन कांद्याची मागणी बाहेर आहे. तर कांदा शेतकऱ्यांकडे साठवणूक करता येत नसल्याने त्याची नासाडी होत आहे. तसेच कांद्याचा दरही घसरत आहे. तर कांदा व्यापाऱ्यांनी निर्यात मूल्याच्या मुद्द्यावर कांदा अडवून ठेवला आहे. व्यापाऱ्यांच्या याच धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आल्याचे मत मंत्री विखे यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कांदा निर्यात बंदी लादण्यात आल्यानंतर ती बंदी उठवण्यात आल्याचा दावा सरकारने केला. मात्र निर्यातीवर ४० शुल्क लावत सरकारने पाचर मारून ठेवली. त्यामुळे कांद्याला मागणी असूनही फक्त सरकारच्या जाचक अटींमुळे निर्यात थांबली आहे. तसेच कंटेनर आणि अतिरिक्त शुल्कामुळे व्यापाऱ्यांनी देखील हात अखडता घेतला आहे. त्यामुळे निर्यात पूर्णतः खुली होण्याची अपेक्षा शेतकरी, व्यापारी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.
याआधी देखील विखे यांनी कांद्याच्या दरावरून आपले मत स्पष्ट केले होते. कांद्याच्या दराबाबतच शेतकरी आणि व्यापारी असे दोन मतप्रवाह असून यामुळेच शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे विखे यांनी म्हटले होते. तसेच निर्यातीसाठी कांदा मिळत नाही, ही वस्तुस्थिती असून निर्यातमूल्य कमी करण्यासाठी पीयूष गोयल यांच्याकडे मागणी आहे. त्यावरून लवकरच निर्णय होईल असे विखे यांनी सांगितले होते. त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह कांदा व्यापाऱ्यांचा होणाऱ्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.