Seed Industry Agrowon
ॲग्रो विशेष

Seed Industry : बियाणे उद्योगावरील जाचक नियंत्रणे हटवा

Team Agrowon

Pune News : देशाच्या अन्नधान्य व पोषण सुरक्षेत मोलाची भूमिका बजाविणाऱ्या बियाणे उद्योगावरील जाचक नियंत्रणे सरकारने हटवावीत, अशी एकमुखी मागणी बियाणे उद्योगाने केली आहे.

‘सीड इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ महाराष्ट्र’चे (सियाम) दुसरे ‘सीड कॉन्क्लेव्ह’ पुण्यात शुक्रवारी (ता. २८) उत्साहात पार पडले. राज्याचे निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक विकास पाटील, गुजरात सीड असोसिएशनचे अध्यक्ष एन. पी. पटेल, नॅशनल सीड असोसिएशनचे उपाध्यक्ष दिनेश पटेल व कार्यकारी संचालक आर. के. त्रिपाठी, सियामचे अध्यक्ष समीर मुळे, माजी अध्यक्ष सतीश कागलीवाल व कार्यकारी संचालक डॉ. शालिग्राम वानखेडे, फेडरेशन ऑफ इंडियन सीड इंडस्ट्रीजचे संपत कुमार, इंटरनेशन सीड फेडरेशनचे अध्यक्ष ऑर्थर संतोष अत्तावार, कृषी आयुक्तालयाचे मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख, राज्याचे मुख्य बियाणे निरीक्षक वैभव शिंदे तसेच उद्योजक या वेळी उपस्थित होते.

श्री. मुळे म्हणाले, ‘‘हरितक्रांतीत बियाणे उद्योगाचा वाटा मोठा होता. देशाला अन्नधान्याचे कोठार बनविणारा भारतीय बियाणे उद्योग आता पाच बिलियन डॉलर्सचा व्यवहार करीत जगात पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. बियाणे उद्योगाला उज्ज्वल भवितव्य आहे. मात्र मजूरटंचाई, पीकसंरक्षण, बदलती आहार संस्कृती अशी आव्हानेही समोर आहेत. यात पुन्हा सरकारी नियंत्रण हीदेखील मोठी समस्या बनली आहे. जाचक नियंत्रणामुळे उद्योगातील विस्तार, वाटचाल, गुंतवणुकीत अडथळे येतात.’’

श्री. कागलीवाल यांनी बियाणे उद्योगाच्या वाटचालीत डॉ. बद्रिनारायण बारवाले, डॉ. मनमोहन अत्तावार यांचे योगदान मोठे असल्याचे नमूद केले. ते म्हणाले, ‘‘बियाणे उद्योगाच्या कायदेशीर लढ्यात सियामकडून गेल्या दहा वर्षांत उत्तम काम झाले. त्यातून इतर राज्यांच्या बियाणे उद्योगासमोर आदर्श ठेवला आहे. कायदेशीर अडथळे पार करण्यासाठी यापुढे उद्योगाला लक्ष केंद्रित करावे लागेल. परंतु यापुढे वेगाने पुढे जाण्यासाठी आपल्याला व्यवसायात एकजूट व सहभागीदारी तंत्र अवलंबावे लागेल.’’

एशिया पॅसिफिक सीड असोसिएशनचे अध्यक्ष मनीष पटेल यांनी आशियायी बियाणे बाजारपेठेतील संधी स्पष्ट केल्या. तर श्री. अत्तावार यांनी संशोधन व विकास यात गुंतवणूक केल्यास चांगले भवितव्य असल्याचे नमूद केले. रितेश मिश्रा यांनी, भारतीय कृषी क्षेत्रातील बदलत्या कृषितंत्राचा आढावा घेतला. उत्पादकता, पोषण सुरक्षितता, कमी स्त्रोतात जादा प्राप्ती, हवामान बदल आणि शाश्‍वतता या मुद्द्यांभोवतीच जगाची कृषी व्यवस्था केंद्रीत होईल, असे सूतोवाच श्री.मिश्रा यांनी केले.

कृषी संचालक श्री. पाटील म्हणाले, की शेतकरी बियाणे उत्पादक कंपन्यादेखील या उद्योगात वेगाने पुढे येत आहेत. भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेड यापुढे गावागावात पोहोचण्याची शक्यता आहे. केंद्र शासनाने आता पैदासकार बियाण्यांपासून ते सत्यप्रत बियाण्यांपर्यंत माहिती मिळविणारी प्रणाली आणली आहे. त्यामुळे पारदर्शकता वाढेल.

‘सियाम’च्या अध्यक्षपदी समीर मुळे यांची फेरनिवड

यावेळी ‘सियाम’च्या अध्यक्षपदी समीर मुळे (अजित सीडस्) यांची बिनविरोध फेरनिवड झाल्याचे घोषित करण्यात आले. २०२४-२६ करीता नवी कार्यकारिणी अशी : उपाध्यक्ष - रितेश मिश्रा (महिको) व वैभव काशिकर (अंकुर सीड्‌स), सचिव - किशोर वीर (एलोरा नॅचरल सीड्‌स), खजिनदार - सचिन भालिंगे (नामदेव उमाजी अॅग्रिटेक), सहखजिनदार जितेंद्र सोळंकी (नोव्हेल सीड्‌स), सहसचिव - नाथा राऊत (नोव्होगोल्ड सीड्‌स) व अक्षय भरतीया (बसंत अॅग्रिटेक), सदस्य - अजित मुळे (ग्रीनगोल्ड सीड्‌स), प्रभाकर शिंदे (पंचगंगा सीड्‌स) व शंतनू मोगल (बूस्टर प्लॅन्ट जेनेटिक्स)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : सततच्या पावसाने भाजीपाला पिकांना फटका

PM Modi : प्लॅनिंग आणि व्हिजनचा अभावामुळेच पुण्यासह देशाचा विकास थांबला, पंतप्रधान मोदी यांची विरोधकांवर टीका

Ginger Research : आले संशोधन केंद्राच्या हालचाली सुरू

Digital Agriculture Campaign : केंद्राच्या डिजिटल कृषि मिशनला एसकेएमच्या नेत्यांकडून विरोध

Jayakawadi Dam : जायकवाडीतील विसर्गात घट-वाढ सुरूच

SCROLL FOR NEXT