Sugarcane Farming Management :
शेतकरी नियोजन
पीक : ऊस
शेतकरी : रणजित गणपती कदम
गाव : चिंचवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर
एकूण शेती : साडेपाच एकर
लागण ऊस : साडेतीन एकर
खोडवा ऊस क्षेत्र : दोन एकर
चिंचवाड येथे कदम यांची वडिलोपार्जित शेती आहे. मागील अनेक वर्षांपासून वडील गणपती यांच्या सहकार्याने रणजित कदम ऊस शेतीत आहे. लागण व खोडवा अशी पीक पद्धती घेतली जाते.
ऊस शेतीमध्ये जमीन सुपीकतेला प्राधान्य दिले जाते. लागण करण्याअगोदर रोटर व पल्टीच्या साहाय्याने जमीन नांगरून घेतली जाते. त्यानंतर एकरी आठ ते दहा ट्रॉली प्रमाणे चांगले कुजलेले शेणखत शेतात पसरून दिले जाते.
वाण बदलाला प्राधान्य
मागील पाच वर्षांपासून उसाच्या ‘को २६५’ या वाणाची लागवड करत आहेत. एखाद्या वर्षी वाण बदल म्हणून ८६०३२ हे ऊस वाण वापरले जाते.
संपूर्ण लागण ही रोप पद्धतीने केली जाते. लागणीसाठी खासगी रोपवाटिकेतून रोपांची खरेदी आगाऊ मागणी नोंदविली जाते. त्यानुसार रोपांची उपलब्धता केली जाते.
एकरी सहा हजार रोपे लावली जातात. लागण उसापासून एकरी ९० टनांपर्यंत उत्पादन मिळते असल्याचे श्री. कदम सांगतात.
खोडवा उत्पादनातही त्यांनी सातत्य राखले आहे. खोडव्यामधून एकरी ६० टनांच्या
वर उत्पादन घेण्याची हातोटी त्यांनी साधली आहे.
खोडव्याला लावणीच्या तुलनेत व्यवस्थापन खर्च कमी असल्याने प्रत्येक वर्षी खोडव्याला अधिक पसंती देत असल्याचे रणजित कदम सांगतात.
खोडवा नियोजन
लागण उसाची तोडणी झाल्यानंतर बुडके
छाटले जातात. पाला पेटवला जात नाही. पाल्याची कुट्टी करून एक सरी आड दाबला जातो.
त्यानंतर कुट्टी केलेल्या पाल्यावर शिफारशीत बुरशीनाशकांची फवारणी केली जाते.
पुढे दीड महिन्यापर्यंत तीन वेळा ठराविक दिवसाच्या अंतराने ६ः५२ः३४, १९ः१९ः१९, १३ः४०ः१३ यांची फवारणी केली जाते.
त्यापुढील दीड महिन्यानंतर प्रति एकरी डीएपी, पोटॅश, युरिया या रासायनिक खतांसह सूक्ष्म अन्नद्रव्ये असा रासायनिक खतांचा एकत्रित डोस दिला जातो.
भरणी वेळी खतांत वाढ
भरणीच्या वेळी रासायनिक खतांचा अधिक डोस दिला जातो. यावेळी डीएपी ४ पोती, तर पोटॅश दोन पोती दिले जाते. यावेळी युरिया खताची मात्रा दिली जात नाही. डीएपी आणि पोटॅश या खतांव्यतििरक्त अन्य खते पहिल्या डोस प्रमाणेच दिली जातात.
उपलब्धतेनुसार ट्रॅक्टर व बैलांच्या साहाय्याने भरणी करून घेतली जाते.
भरणी केल्यानंतर पाट पाण्याने जमिनीवरील पाला कुजविण्याला प्राधान्य दिले जाते. त्यासाठी योग्य उपाय केले जातात. जेणेकरून त्याचा जमिनीला फायदा होईल.
तण नियंत्रण
तण नियंत्रणासाठी ऊस पिकामध्ये कोणत्याही रासायनिक तणनाशकांचा वापर केला जात नाही. त्याऐवजी मजूर लावून तण नियंत्रण करण्यास प्राधान्य दिले जाते.
खोडव्याची तोडणी होईपर्यंत पाच वेळा मजुरांकरवी तण नियंत्रण केले जाते. तण नियंत्रणासाठी मजूर लावणे खर्चिक असले तरी त्यास प्राधान्य दिले जाते. कारण रासायनिक तणनाशकांचा वापर केल्यास त्याचा प्रतिकूल परिणाम उसाच्या वाढीवर होतो. शिवाय जमिनीचे आरोग्य देखील धोक्यात येते असे श्री. कदम सांगतात.
आगामी नियोजन
सध्या शेतातील खोडवा तोडणीस तयार झाला आहे. पहिल्या टप्प्यात कारखान्याद्वारे लागण उसाच्या तोडीस प्राधान्य दिले जाते. त्यामुळे कारखान्यांच्या तोडणीचे वेळापत्रकाचा अंदाज घेऊन उसाला सिंचन करण्याचे नियोजन आगामी काळात आहे.
आतापर्यंत उसाच्या पंचवीस कांड्या तयार झाल्या आहेत. कारखान्याच्या क्रमपाळीनुसार उसाला पाणी देण्याचे नियोजन केले जाते.
सध्या पिकास पाणी दिल्यास जानेवारी महिन्यात वाफसा येऊ शकतो. जानेवारी महिन्यामध्येच ऊस तोडणीचे नियोजन आहे. त्यामुळे सध्या सिंचनावर भर देण्यात येणार आहे. या पाण्यामुळे शेवटच्या टप्प्यात उसाची चांगली वाढ होते.
यावर्षी एकरी सुमारे ६० ते ६५ टनांपर्यंत खोडव्याचे उत्पादन अपेक्षित आहे, असे रणजित कदम सांगतात.
पाला काढण्याला प्राधान्य
ऊस दहा ते बारा कांड्याचा झाल्यानंतर उसाचा पाला काढला जातो. यावेळी उसाची जोमदार वाढ सुरू असते.
पाला काढल्यास उसाचे शिवार खेळते राहून पिकाच्या वाढीला चांगला वाव मिळत असल्याचा त्यांचा अनुभव आहे. यामुळे उसाच्या कांड्यांची जाडीही वाढते.
पावसाळा सुरू झाल्यानंतर साधारणपणे जून ते ऑगस्ट पर्यंत पावसाचे प्रमाण अधिक असते. या काळात पुन्हा एकदा रासायनिक खतांचे डोस दिला जातात. भरणीच्या वेळी दिलेली रासायनिक खतांची मात्रा काहीसे प्रमाण वाढवून दिली जाते. यामध्ये अमोनिअम सल्फेट हे खत पावसाळ्यात दिले जाते. एकरी चार पोती या प्रमाणात हे खत देण्यात येते.
रणजित कदम, ९९२१८१८९३०
(शब्दांकन : राजकुमार चौगुले)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.