Animal Care Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Care : संतुलित आहार, गोठा स्वच्छतेवर भर

Indigenous cow husbandry : पुणे जिल्ह्यातील पाटे खैरे मळा, नारायणगाव (ता. जुन्नर) येथील जितेंद्र दत्तात्रय पाटे यांनी एका खिलार गाईपासून सुरू केलेले देशी गोवंश संगोपन आज १९ गाईंपर्यंत पोचले आहे.

Team Agrowon

शेतकरी नियोजन ः देशी गोपालन

शेतकरी ः जितेंद्र दत्तात्रय पाटे
गाव ः नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे
एकूण देशी गायी ः १९
चारा पिके ः अडीच एकर

Cattle Farming : पुणे जिल्ह्यातील पाटे खैरे मळा, नारायणगाव (ता. जुन्नर) येथील जितेंद्र दत्तात्रय पाटे यांनी एका खिलार गाईपासून सुरू केलेले देशी गोवंश संगोपन आज १९ गाईंपर्यंत पोचले आहे. गोसंगोपनातून दूध, तुपाच्या उत्पादनासह उपलब्ध शेणापासून गोवऱ्यांची निर्मिती करून त्यांची विक्री करत आहेत. देशी गोवंश उत्पादनांना ग्राहकांकडूनही चांगली मागणी असते. त्यामुळे अतिरिक्त उत्पन्नाचा शाश्‍वत स्रोत त्यांना उपलब्ध झाला आहे. वसुबारसेच्या निमित्ताने इस्कॉनद्वारे गोठ्यावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गोपूजन, प्रवचन आदी कार्यक्रमांचा समावेश असल्याचे जितेंद्र पाटे यांनी सांगितले.

जितेंद्र यांनी ८ वर्षांपूर्वी एका खिलार गाईंपासून देशी गोवंश संगोपनास सुरुवात केली. सध्या गोठ्यामध्ये लहान मोठ्या मिळून सुमारे १९ गाई आहेत. त्यात गीर ५, साहिवाल ५, खिलार १ आणि उर्वरित वासरांचा समावेश आहे. गाईंसाठी मुक्त आणि बंदिस्त अशा दोन्ही पद्धतीच्या गोठ्यांची उभारणी केली आहे. साधारणपणे ३० बाय ३२ चौरस फुटांचा बंदिस्त गोठा, तर तेवढ्याच आकाराचा मुक्त गोठा उभारला आहे. सध्या तीन गाईंपासून प्रतिदिन २५ ते ३० लिटर दूध संकलन सुरू आहे.

व्यवस्थापनातील बाबी ः
- दररोज सकाळी साडेपाच वाजता गोठ्यातील कामांना सुरुवात होते.
- सकाळी साडेपाच ते आठ या दरम्यान गोठा स्वच्छता, दूध काढणे, चारा देणे इत्यादी कामे केली जातात.
- त्यानंतर साधारणतः ८ वाजता गाईंना बंदिस्त गोठ्यातून मुक्त संचार गोठ्यात सोडले जाते.
- दिवसभर गाई मुक्त संचार गोठ्यातच ठेवल्या जातात. तेथे त्यांना मुबलक चारा आणि पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सोय केली आहे.
- सायंकाळी ५ वाजता पुन्हा गाईंनी बंदिस्त गोठ्यात आणून चारा आणि पाणी दिले जाते. बंदिस्त गोठ्यामध्ये प्रत्येक गाईला खाद्य खाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे.
- सायंकाळी सात वाजता पुन्हा दूध काढले जाते.

खाद्य व्यवस्थापन ः
गाईंसाठी संपूर्ण अडीच एकरांमध्ये चारा पिकांची लागवड केली आहे. त्यात नेपिअर, मका, ज्वारी, बाजरी इत्यादी पिकांची लागवड केली आहे. ओल्या चाऱ्यामध्ये नेपिअर, ज्वारी, मका, तर सुक्या चाऱ्यामध्ये सोयाबीन भुस्सा, भाताचा पेंढा यांची कुट्टी करून दिली जाते. तसेच खनिज मिश्रणे, गोळी पेंड आणि पशुखाद्य दिले जाते.
गाईंच्या वयानुसार प्रतिदिन साधारण १५ ते २० किलो चारा दिला जातो.

औषधोपचारावर नगण्य खर्च ः
यशस्वी दुग्धोत्पादनासाठी गाईंचे आरोग्य उत्तम असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी दैनंदिन संतुलित आहार, गोठा स्वच्छता आणि मुक्त संचार पद्धतीवर लक्षकेंद्रित केले जाते. त्यामुळे गाई आजारी पडण्याचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. ग्राहकांकडून देशी गायींचे दूध प्रामुख्याने लहान मुलांसाठी विकत घेतले जाते. ग्राहकांकडून निर्भेळ दुधाची मागणी होत असल्याने गाईंवर अत्यंत कमी प्रमाणात औषधोपचार केले जातात. आयुर्वेदिक उपचारांवर अधिक भर दिला जातो, असे पाटे यांनी सांगितले.

मजुरांविना गोठा व्यवस्थापन ः
गोठ्यातील एकवीस गाईंच्या व्यवस्थापनासाठी एकही मजूर ठेवलेला नाही. गोठ्यातील सर्व कामांमध्ये जितेंद्र यांना आई कुसुम आणि पत्नी सौ. निवेदिता यांची मदत मिळते. घरातील सदस्य स्वतः गोठ्यामध्ये राबत असल्याने उत्पन्नवाढीसाठी फायदेशीर ठरत असल्याचे जितेंद्र पाटे सांगतात.

देशी तूप निर्मिती ः
देशी गायींच्या दुधाला लहान मुलांसाठी चांगली मागणी असते. निवडक आणि नियमित ग्राहक मागणीनुसार दररोज दूध खरेदी करतात. सध्या केवळ तीनच गाईंपासून दूध उत्पादन सुरू आहे. प्रतिदिन साधारण २५ ते ३० लिटर दूध संकलन होत आहे. गोठ्यातील जास्त गाई दुधावर असल्यानंतर दूध उत्पादन वाढते. त्यावेळी दूध विक्री करून शिल्लक राहिलेल्या दुधापासून तूप निर्मिती केली जाते. महिनाभरात साधारणपणे ३ ते ४ किलो तूप तयार होते. देशी गायींच्या दुधापासून तूप तयार केले असल्याने त्यास दरही चांगला मिळतो. तूप निर्मितीशिवाय सध्या धुपकांडी आणि साबण निर्मिती सुरू केली आहे. या उत्पादनांच्या विक्रीसाठी व्यवस्था तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे जितेंद्र पाटे सांगतात.

गोवऱ्यांची विक्री ः
गोठ्यातून दररोज उपलब्ध होणाऱ्या शेणापासून गोवऱ्या तयार केल्या जातात. देशी गोवंशाच्या शेणापासून बनलेल्या गोवऱ्यांना चांगली मागणी असते. गोवऱ्यांचे पॅकिंग करून विक्री केली जाते. साधारण १६ गोवऱ्यांची पॅकिंग २५ रुपये आणि ३६ गोवऱ्यांची पॅकिंग ५० रुपये दराने विक्री होते. गोवऱ्यांच्या विक्रीतून अतिरिक्त उत्पन्न मिळत असल्याचे पाटे सांगतात.

जितेंद्र पाटे, ८९९९०९२४३९
(शब्दांकन ः गणेश कोरे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement Center : कोरेगावात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू

Sugarcane Farming : शाहूवाडी परिसरात खुंटली आडसाली उसाची वाढ

Dairy Farming : दुग्ध व्यवसाय प्रत्येक शेतकऱ्याचा मोठा आधार

Water Crisis : ‘मोरणे’चे पात्र पडू लागले कोरडे

Achalpur APMC : अचलपूर बाजार समिती देणार व्यापाऱ्यांना ओळखपत्र

SCROLL FOR NEXT