Sugarcane Labor
Sugarcane Labor Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Labor : माझ्या सिनेमाची गोष्ट

Team Agrowon

- राजकुमार तांगडे

माझ्या फेसबुकवर मी शिक्षण- घरीचं केलं, असं लिहिलंय. बरेच जणं हसले. घरी माणूस शिकतो याच्यावर भरवसाच राहीला नाही... मुलांना बाहेर टाकण्याची चढा-ओढ लागली. पूर्वी गावातली शाळा संपली की बाहेर टाकायचे. आता ते एवढं खाली घसरलंय की लेकराची नाळ तोडली कीच बाहेर शिकायला ठेवायचं फॅड आलंय. पण खरंच, बऱ्याच गोष्टी माणूस घरीच शिकतो. मी पण घरीच शिकलो. मी एक चिवटी नावाचा मराठी सिनेमा दिग्दर्शित करतोय.

शुटिंगचा पहिलाच दिवस. बिना फोटोचं, नारळं फोडून आम्ही शुटला सुरूवात केली. कारण खुद्द देवाच आमचा कॅमेरामन होता. मी शेतकरी कुटुंबातला आणि मराठवाड्यातला असल्यानं. माझ्या बुध्दीला पेलंल असंच ग्रामीण आणि दुष्काळी कथानकच निवडलं. मे महिन्यातला भर उन्हाळा. माळरान. वरून आणि खालून दोन्ही तापल्यानं टेम्परेचर पंचेचाळीसच्या वरती गेलेलं. संपूर्ण टेक्निशियन टीम मुंबईची. मी एकटाच जांबाचा.

मी जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्यात ढोराकडं जायचो, तेव्हा आई मला सकाळीच भरपूर पाणी पाजायची आणि डोक्याला रूमाल बांधून द्यायची. मी तेच केलं. सर्व टीमला सांगितलं की फक्तं फोटो काढेपर्यंतच टोप्या घाला. आणि मग सरळ डोक्याला रूमालाची टापर बांधा. भरपूर पाणी प्यायला लावलं. आईचा सल्ला उपयोगी पडला. फक्त त्यांची चेहऱ्याची कातडी करपली. (माझी अगोदरच करपलेली असल्यानं ती लक्षात नाही आली.

प्रत्यक्ष चित्रिकरणाला सुरूवात झाली. मी स्टोरी बोर्ड वगेरे काहीच बनवला नव्हता. खरं तर गवंड्यात आणि इंजिनिअर मध्ये जो फरक असतो तोच फरकं इथं जाणवतो. इंजिनिअर डोक्यातून कागदावर उतरवतो आणि गवंडी डोक्यातुन जमिनीवर. मी आपला साधा गवंडी.

आपलं डोकं फार टेक्निकल चालवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे रेल्वे रूळावरून बैलगाडी चालवल्यासारखचं होणार याचा मला अंदाज होता. माझा आदर्श होता कठूभाईचा नाझ्या. शाळेच्या ऐवजी गॅरेजमध्ये गेला, पेनाऐवजी पान्हा हातात घेतला. आज अशी एकही गाडी नाही, जी नाझ्याच्या हातून खोलली गेली नाही. म्हणून आपला भरोसा प्रॅक्टिकलवरच.

सिन डिझाईन करतानाही मी साधं टेक्निक वापरलं. ज्याची त्याची जागा निश्चित करायचो. बैलाच्या जोडीतील एखादा बैल जर हाकावं निघाला तर आपण त्याला उजव्या खांदीहाताखाली ठेवतो. तसंच एखाद्या कलाकाराचा अभिनय थोडा उन्नीस-बीस जर असेल तर त्याच्या कॅरेक्टरची किती लांबी ठेवायची, त्याचे किती क्लोज लावायचे हे ठरवून ठेवलं. आपण निवडलेल्या पैकी कोण कोण कच्चं निघालं ते शोधलं.

शुटिंगचा पहिलाचं दिवस होता. पहिल्या दिवशी मी सीन डिझाईन केला. दोन-तीन रिहर्सल झाल्या. आणि आम्ही टेक घ्यायला सज्ज झालो. सिंक-साऊंड असल्यामुळे सगळी कडे अलर्ट जारी झाला. मी रेडी, प्लीज, ऑर्डर असे शब्द पहिल्यांदा नाव घ्यायला लाजतात तसे लाजतच उच्चारले. आमच्या गावाकडल्या भाषेत सांगायचं झालं तर कोचमारल्यासारखे उच्चारले.

आमच्या डि.ओ.पी. नं सांगितलं सर, प्लीज ऑर्डर आणि सुरू झालं...रोल कॅमेरा...रोल साऊंड..साऊंड रोलींग...अॅक्शन...सिन सुरू झाला पण देवा(कॅमेरामन) गालातल्या गालात हसला. मी देवाकडं पाहिलं. देवा कानाजवळ येऊन म्हणाला- राजकुमार, तू फक्त अॅक्शनच म्हणायचं. कारण त्यातल रोल-साऊंड आणि साऊंड रोलींग हे पण मीच म्हंटलं होतं. (हे त्या त्या डिपार्टमेंटचं काम असतं). आणि तिथूनच माझी खरी शाळा सुरू झाली.

सिनेमाचा अगदीचं तोटका अनुभव. देऊळ, तुकाराम,महादु, जाऊंद्याना बाळासाहेब. यातील छोट्या-मोठ्या भूमिका आणि महादुच्या संवादातील सहभाग वगळता माझा सिनेमाचा संबंध फक्त पहाण्यापुरताच. तेही अतिशय थुकरट हिंदी सिनेमे. थोडं फार नाटकाशी नातं आणि चळवळीशी जवळीक असल्यानं वास्तवाचं येत चाललेलं भान,  काहीही करून पाहायचे बाळकडू आणि माझ्यावर निर्मात्यानं टाकलेला विश्वास... या मुळे मी काम सुरू केलं

सिनेमाचा डि.ओ.पी.आणि दिग्दर्शक म्हणजे जावा-जावाच. दोघांच पटलं तर घर अभेद्य राहातं. मी संयुक्त कुटूंबातला असल्यानं ज्याचा मान त्याला द्यायची सवय. आमचं मस्त जमत होतं. देवेंद्र गोलतकरची आणि माझी नागरिक सिनेमाच्या सेटवर भेट झाली. मी त्यात रोल करायचो. लग्नाला गेल्यावर जशी एखादी वऱ्हाडातली मुलगी डोक्यात ठेवून नंतर आपण आपल्या योग्य वेळी सोयरिक करतो, तसंच मी देवेंद्र गोलतकरांना गाठलं. तो खुप चोखंदळ.

त्याच्या एका डॉक्युमेंटरीला इंटरनॅशनल पुरस्कार. मी आपला साधा नट. फार तर शिवाजी अंडर ग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकाचा लेखक एवढीच माझी ओळख. मी आणि निर्माता अजिनाथ ढाकणे दोघे गेलो. अर्थात ओळख माझीच होती. मी अजिनाथला करारातच सांगितलेलं की `बिन पगारीका होईना पण मी फुल अधिकारी` असलो पाहिजे. तिथं पण आई म्हणते तसंच. चार-दोनं रूपायमुळं लोकाची ताबेदारी कशाला?

माझी पूर्ण टीम निवडायचा पूर्ण अधिकार मी घेतला होता. माझे कॅमेरामन, साऊंड, आर्ट-डिरेक्टर आणि एडीटर एफ.टी.आय.आय.चे पास आऊट. मेकपमनच्या चार सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार. कलाकारही गावातल्या पारावर नाटकं करणारांपासून ते एन.एस.डी.चे पास आऊट. आपण कसेही असू आपले साथीदार दमदार पाहिजेत.

मला हुशार माणसं हवी होती; पण शहाणी नको होती. मला हवी तशी मिळालीही. ती सर्व जण टेक्निकल भाषेतच बोलायची. अर्ध निमं इंग्रजीतूनच बोलणार तर मी त्यांनी उभ्या आयुष्यात न ऐकलेल्या मराठीत बोलायचो. मी जर दोन इंग्रजी शब्दांला अडकलो तर त्यांना एका तरी मराठी शब्दाला अडकवणारच. पण आमचं ट्युनिंग चांगलच जमलं होतं. माझा चुकलेला शब्द देवा मला हळूच दुरूस्त करून सांगायचा.

मी एक सीन सांगत होतो. बोलता बोलता मी देवाला म्हंटलं की, मला ना, तो खालून येताना झाडावरून दिसतो. देवा मला पटकन म्हणाला, पण मी झाडावर नाही चढणार. आम्ही दोघंही हसलो. नंतर त्यानं सांगितलं की, आपण त्यासाठी जीमी-जीब वापरूया. खरं तर सिनेमाचं तंत्र असतं. त्याची एक भाषा असते. ते शिकायचं पण असतं. पण शिकायला नाही भेटलं म्हणून करूनच पाहायचं नाही, तर मग शिकायला कसं मिळणार? आई मला लहानपणापासून म्हणते काहीही करून पाहीलं पाहिजे. म्हणजे काहीही नाही बरंका. योग्य आणि योग्यतेचं असेल तेच करायचं.

खर तर सिनेमा शिकून करायची गोष्ट. शिकायचं असेल तर एखाद्या नामांकीत संस्थेत ॲडमिशन घ्यावं लागतं. त्याला डोनेशन द्यावं लागतं. आपलं तिथंच अडतं. दरवर्षी ऐन पेरणीत जूनमध्येच शाळा सुरू व्हायच्या. कापसाची बॅग आणायची का आमच्या शाळेची, अशा धर्मसंकटात सापडलेल्या बापाला तुकोबाचा आधार मिळायचा.

मढे झाकुनी पेरणी करायची असते...आणि म्हणून प्रत्येक वर्षी आमच्या वह्या-पुस्तकाला उशीर व्हायचा. आपण पाश्चिमात्यांचं सोईनं अनुकरण करतो. म्हणजे पाश्चिमात्यांचे हिवाळ्यात घालायचे कपडे आपण उन्हाळ्यात घालतो. त्यांची जॉनी..जॉनी कविता पण उचलतो. आणि नेमके अमेरिकेच्या शाळा ज्या सप्टेबर मधे सुरू होतात त्या आपण जून मधे सुरू करत

...कृषिप्रधान देश धोरणावर नसल्याचं उत्तम उदाहरण दिसून येतं. आपण नेमकं शिकतो कशासाठी आणि का, हे मी जागोजाग अनुभवलं. मी एका वयस्कर म्हातारीच्या शोधात होतो. कॅरेक्टर जरा अवघड होतं. बसवलेल्या प्रेताचं. म्हाताऱ्यांना आधीच मरणाची जास्तं भिती. काय करावं? रोल अाधीच सांगावा तर कोण तयार होणार?

ऐन वेळी सांगावा तर नाही म्हणली तर कसं? असा विचार करता करता जवळच्या जवळच्या कोण-कोण म्हाताऱ्या आहेत, ते चाचपडत असतानाच शिवा आठवला. त्याची आज्जी. कॅरेक्टरला जाण्यासारखी होती. शिवाला फोन लावला. गावात आलोय. घरी असशील तर चहा घ्यायला येतो. शिवानं लगेच म्हणलं, घरीचं हाई. ईना मंग चहा घ्यायला. म्हणून त्याच्या घराकडं निघालो. शिंग्याच्या आळीने येताना शिवाच्या दारापुढंच त्र्यंबकआप्पा बोलत उभा राहीले.

तोच ओट्यावर बसलेल्या समाआजीनं कान टवकारत विचारलं, कोणं हे? ``मी,आजी. लक्ष्मणबप्पाचा राजु हे...`` म्हातारीनं जवळ बोलाऊन घेतलं. कामानं झिजून-झिजून झुरझुरीत झालेले हात तोंडाहून फिरवत म्हणाली, ``लई दिसानं दिसला रे. आता ते बंद केलंस का नाही नाटक न् शिनमा. आपल्या लोकायचे धंदे हाईत व्हय? आता असं कितीक दिवस  फिरायचं? लेकरं मोठाले व्हायलेत.

तेव ईसनू बघना कसा का होईना शाळा मास्तर म्हणून चिटकला. आज ना ऊद्या पगार बी भेटंन. तसं करना काही.`` मी तर आर्धा गारच पडलो. त्यावर मी म्हणलं, ``पण आजी मी तेवढा शिकलेलो नाहीना.`` म्हातारीचा आवाजच वाढला. ``पण त्या माठ्यापेक्षा हुशार हाईस ना...`` मी आपलं आजीच्या तळमळीला दाद म्हणून म्हणलं, ``ऊद्या शाळावाल्यांना जाऊन विचारून बघतो, मला तुमच्या इथं शिकवायला ठेवता का...?`` ज्या आजीन माझ्या नाटक-सिनेमात काम करण्यालाच नाकं मोडलं, तिला सिनेमात रोल करती का, तो ही मढ्याचा, हे विचारायला जीभच धजेना. आजीला कट मारून शिवाच्या घरात गेलो.

कुठं टेकतो न टेकतो कीच घरातल्या आळे-पिळे देत लाजणाऱ्या लेकराला फर्मान सोडलं गेलं...चल काकाला तुझं नाव सांग..तुला काय व्हायचं ते सांग...ते बिचारं लेकरू पढील्यासारखं सांगतं होतं- इंजिनीअर. ``आणि आता जा. आईला चहा सांगून ये...`` मला आठवलं. माझ्या लहानपणी मला विचारलं की मी ही सांगायचो कलेक्टर... आज आठवलं की हसू येतं.

खरंच जर ज्यांनी ज्यांनी कलेक्टर होण्याची इच्छा व्यक्त केली किंवा सांगितलं तेवढेच्या तेवढे कलेक्टर झाले असते तर दारात भंगार गोळा करत येणाराही कलेक्टर दिसला असता. खरं तर माझ्या घरात साधं कुणी कोतवालही नव्हतं. कुणी तरी माझ्याकडून पाठ करून घेतलं असावं. ही घोकंमपट्टी मला चांगलं कळेपर्यंत चालू होती.

नंतर मलाच लाज वाटायली की आपण काहीतरी चुकीचं सांगतोय. खरं तर या मुलांना ठरवू दिलं तर ते स्वतःच त्यांचे मार्ग शोधतात. लादलेल्या ओझ्यापेक्षा उचललेले ओझे माणूस न डगमगता चांगलं वाहू शकतो हे मला नाटक-सिनेमा करताना चांगलं जाणवत होतं. मनात आलं आणि झालं, हे फक्त कल्पवृक्षाखालीच होऊ शकतं आणि तो कल्पवृक्ष पुराणात जरी असला तरी वास्तवात भूतलावर नाही हे कळायला अक्कलदाढही येऊन जाते.

संभाजी तांगडे मला ऑडीशन घ्यायला मदत करत होता. पण ती म्हातारी अजूनही आम्हाला सापडत नव्हती. कमर्शियल आर्टीस्ट शक्यतो टाळायचे असं संभाचं आणि माझं पक्क ठरलं होतं. सगळी कास्टिंग झाली होती. मी शक्यतो खोटं बोलणं टाळतो. बोललो तर माझ्या अंगलट येतं. शुट अगदी दोन दिवसावरच आलं होतं तरी पण म्हातारीचं कास्टिंग बाकी होतं.

जवळ पास अडीचशे कॅरेक्टर आम्ही ऑडिशन घेऊन, डेट देऊन निवडले होते. उगीच थोड्यासाठी आपल्याला तडजोड करावी लागणार म्हणून मी जरा उदासच होतो. कैलास सानप तिथे आला. कैलास हा मला मदत करणारा एक विस-बावीशीतला चुनचुनीत मुलगा. पडेल ते काम करणारा (पण तो निर्माता होता हे मलाच शुट संपत आल्यावर कळलं.

अंगभर सोनं घालून, गाड्या-घोड्या उडवून, आहे नाही त्याच्या हीडीस प्रदर्शनाची लत लागलेल्या समाजात कैलास सारख्या मुलानं निर्माता नावाची झुल, त्या पदाचा तोरा बाजूला काढूनं राहणं आश्चर्याचं वाटलं.) कैलास जवळ आला नि म्हणला, सर, काय मेळं..जरा नाराज नाराजच दिसायले. मी त्याला सांगितलं...म्हातारी मिळत नाही..

``सर, म्हाताऱ्या दोन आहेत राव. माझ्या आज्याच आहेत. एक माय-आजी आणि दुसरी बाप-आजी. बघा तुम्हाला कुठली जमती तर. पण इथून साठ किलोमीटर जावं लागेल.`` मी तटकन् उठलो. म्हणलं, खात्रीनं मिळणार असेल तर मी साठ हजार किलोमीटर येतो. ``सर, चला मग. पण जरा खोटं बोलावं लागेल.

मला खात्री हे, एक तर नक्की होच म्हणीन,`` तो म्हणला. मी विचारलं, पण काय खोटं बोलावं लागेल? तो म्हणाला, ``तिला सांगावं लागेल. ह्याच्यात कैलासचा लई फायदा आहे. तर माय-आजी नक्की तयार होईलं.`` मला मनात वाटलं, दुसऱ्याचं भलं होतय म्हणून मरण पत्करणारी माणसं अजुन आहे तर. मी कैलासला बोललो, मला पण थोडं खोटं बोलावं लागेल. कैलास म्हणाला, बोला ना सर बिनधास्त. विषयच नाही

मी आजीला सांगितलं, ``आजी, सिनेमातल्या म्हातारीचा लेक लांब देशात असतो आणि तिकडं त्याला स्वप्न पडतं म्हातारी गेल्याचं. पण खरं तर ती गेलेली नसते. नुस्तं स्वप्न पडतं, खरं नाही.`` म्हातारी तयार झाली कारण जिवंत माणूस गेल्याचं स्वप्न पडलं तर त्या माणसाचं आयुष्य वाढतं असं म्हणतात, असं मी ऐकल होतं. अक्षरशः आठ तास चाललेल्या शुट दरम्यान म्हातारी नाकात-कानात बोळे घालून बठ्याच्या पोज मधे बसून होती. सोबत आलेल्या कैलासच्या मावशीला खरंच रडु आलं. त्या दिवशीचं पॅकप झाल्यानंतर मला राहवलंच नाही. मी म्हातीरीचे घट्ट पायच धरले.

आमचे सीन आणि टेक खूप वेळ चालायचे. एकदा मी सात पावलं चालायचे सतरा टेक घेतले. सप्तपदी सुध्दा आयुष्यातं एकदाच असते. मी सतरा टेक घेतले. त्याची नीट टायमिंगच जुळत नव्हती. अजिनाथ अस्वस्थ होऊन जवळ येऊन बसायचा. ``सर, जेवन गार व्हायलंय बरं का...`` पण मी शेतात कित्येक वेळा एक पारगी औत हानलेलं असल्यानं म्हणायचो, चला आज एक पारगी करायचं.

(म्हणजे एखादं पेरणी सारखं महत्त्वाचं काम असेल तर पावसा-पाण्याच्या भीतीने शेतकरी दुपारचं जेवन न करताच तसचं तिसरापारपर्यंत काम करतो. त्याला एक पारगी म्हणतात.) वाढीव टेकला कलाकार खूश असंत, पण इतरच त्याची चर्चा खूप करायचे. गरज नसताना एवढे टेक कशाला वगैरे. आई पोळ्या नरम येण्यासाठी कणीक मळवायची.

मी तसंच करायचो. पण त्या सात पावलाच्या सतरा टेकची सेटवर जरा जरा जास्तच चर्चा झाली. आमचा एडिटर गोरक्ष पण बोलला. बाकीचे बोलत होते, तोपर्यंत मी फार सिरीयस नाही घेतलं. म्हणलं रिकाम्या लोकांना नाहीतरी टाईम जडच जातो, पण एडीटरच म्हणल्यामुळे मला उत्तर देणं गरजेचं होतं. मी वाट पाहात होतो.

एक हॉस्पिटलचा सीन होता. त्यात एक छोटा रोल करायची ऑफर मी गोरक्षला दिली. तो नाही हो..नाही हो करत तयार झाला. दोन-तीन-चार टेक झाले कीच मी ओके म्हंटलं. गोरक्ष थोडा जवळ आला. अजून एक घेऊया का? मी म्हंटलं मला ओके आहो. तेव्हा तो नाही एक घ्या मला नाही वाटत ओके, असं म्हणला. मग मी म्हटलं पाहीलं का, का होतात सतरा टेक? अशा एकेक गंमती.

एक सीन. शेतात जड ओझं उचलन्याचा सामुहीक सीन होता. बहुतेक सगळे ॲक्टर आमच्या रंगमळा ग्रूपचे असल्यानं आमच्यात चांगली मैत्री तर होतीच, शिवाय शेतात कामं करायची सवय पण होतीच. टेक चालू झाला. खरं तर मास्टर दिड-दोन-अडीच मिनिटाचा. पण मला ते सगळे इतर नटांसारखे अंग राखून न करता झोकून काम करताना दिसत होते म्हणून मी सारखा टेक चालूच ठेवला. मला तो आणखी कुठे-कुठे वापरायचा होता.

दहा-पंधरा-वीस-पंचविस मिनिटं झाल्यावर सगळे परेशान झाले. पण म्हणावं कुणी? सगळे परेशान. संभा हळूच म्हणला..राजा कट म्हणायचं विसरला की काय रे..आणि ते हेडफोनमुळे कानावर आलं आणि मी कट म्हंटलं. आणि मी लंचब्रेक म्हणायच्या आत ते जेवणाकडं पळाले. दुपारी उशीर झाल्यावर औताचे बैल जसं औतं घेऊनच झाडाकडं पळतात तसंच. पण त्या दिवशी जेवनच आलं नव्हतं. पुन्हा जानवलं. शेतकऱ्याला वेळेवर भाकरच मिळत नाही ती ही अशीच

मला टेक्निकली जरी माहीत नसलं तरी, कंटेन्ट माहीत आहे, याचं सर्वांना भान होतं. त्यामुळे मी आत्मविश्वासानं वावरत असे. मी लहानपणी नांगरणीला पहाटे चांदणी निघायला अगळीवर उभा राहीलोय. त्यामुळे मी पहिल्याच दिवशी पहाटे चारच्या कॉल टाईमला, पाच मिनिटं आधीच हॉटेलच्या खाली होतो. कदाचित हे माझ्या लहानपणापासूनच अंगात असावं. मी आठवी-नववी-दहावीत असताना गमावलेला आत्मविश्वास मॅट्रीक नापास झाल्यावर परत मिळवला होता.

माध्यमिक शाळेतल्या मास्तरांना नाही पण गावातल्या लोकांना मी हुशार वाटायचो. सगळ्यात लहान वयात पेरणी करणारा, जी गाय सरव्या बिगर कुणालाच दुध काढू देत नव्हती, तिला नुसती दोरी दाखवून सातवीतच धार काढणारा. आता अभिनय काढून घेऊ शकलो. स्वतःचं वजन पंचविस किलो असताना सुध्दा तीस किलो युरियाचं पोतं कुणाच्याच मदतीविना ऊचलून रानात फेकणारा.

आता कुठल्याच फिल्म इन्स्टिट्यूटचं तोंड न पाहाता एफ.टी.आय.आय.च्या टीम बरोबर काम करू शकलो. एकाच मुठीनं बाजरीची पेर वेगळी, तुरीची वेगळी, सोयाबीनची वेगळी अन् तंतोतंत पेरणारा मी. पण गणितातलं रमेश अन् दिनेशच्या वयातलं अंतर न काढता आल्याने ढ गणल्या जायचो. पण इथे तांत्रिक भाषा येत नाही म्हणून कुणीच हिणवत नव्हतं. शाळेत एकही संज्ञा, व्याख्या पाठ नसताना, मी वैभवलक्ष्मीचं व्रत बिन पाहाता निम्म्या गावात वाचून दाखवायचो.

ते तंत्र मला गोष्ट रंगवुन सांगायला कामी आलं. आईनं मी चौथीत असतानाच कित्येक वेळा पायली-दोन पायल्या तुरी देऊन पिंपळगावच्या बाजाराला पाठवलं, तेव्हा फक्त पहिल्यांदा एकच चूक झाली, ती म्हणजे, मी तुरी विकल्या विकल्या पहिले भजे खाल्ले. तेंव्हा माझ्या दादानं सांगितलं की, पहिलं परतीच्या तिकिटाचे पैसे बाजूला काढून ठेवायचे...भजे नाही खायचे...(आज ही तो पहिलं खतं-बियाणांचे पैसे बाजूला काढून ठेवतो.) तेवढी शिकवणी मी पटकन घेतली.

सिनेमा ही काहीशी चंगळवादी, भोगवादी असल्याचा भास करणारी संस्कृती. पण वास्तवात तुम्हाला खूप काम करायला लावणारी, दमवणारी. त्यानंतर मात्र सगळं, मला त्यातल्या त्यात कसं बसवायचं हे तंत्र त्याच बाजारानं शिकवलं. काम आणि व्यवहार याची सांगड घालताना मी कशाला महत्त्व द्यायचं, कसा अग्रक्रम ठरवायचा हे मी घरीच शिकलो.

त्या साठी कुठल्याच मॅनेजमेंट स्कुलमध्ये दाखला घालायची गरज पडली नाही. याचा अर्थ टेक्निकली शिकायचंच नाही किंवा शाळेतच जायचं नाही किंवा गरजच नाही असं मात्र मुळीच नाही. खरं तर शाळा सोडणं हे फार भूषणावह तेव्हाही नव्हतं आणि आताही नाही. पण..

आता जसं सरासरी कुटुंबाच्या मिळकतीच्या पन्नास टक्क्यापेक्षा जास्त बजेट मुलांच्या शिक्षणावर खर्च होतं, तसं तेव्हा पालकांचं नव्हतं. (हे म्हणनं फक्त घामाने कमवणारांसाठी लागू. ब्लॅक मनी, लाचखोरांना यातून वगळलं आहे.) दुरडीतली भाकरी खाऊन, रांजणातलं पाणी पिऊन आणि मामाच्या घरचे कपडे लेऊन... लेकरं जेवढे शिकतील तेवढेचं घडवायचे.

म्हणजे आताच्या सरकारी धोरणांसारखंच. आत्ता जे बजेट आणि प्राधान्य सरकार शिक्षणाला देतं, तेवढचं पूर्वी पालकांचं होतं. लेकराचे पाय पाळण्यात दिसतात एवढी प्रचलित म्हण सोडली तर, आताच्या साखी कल चाचणी वगेरे त्या काळात खालपर्यंत पोचलेली नव्हती. त्यामुळं आपल्याला नेमकं काय येतंय याचा शोध घेण्या-घेण्यातच लग्नाचं वय निघून जाण्याची वेळ आली.

आता मुलांना या सगळ्या सुविधा मिळतात पण पैसा असेल तर. ग्रामीण मुलांचं अवघड झालंय. ना वशिला, ना भांडवल, ना मार्गदर्शन. बरं आदर्श तरी कुणाचा घ्यायचा. चार वाजल्याच्या नंतर महिला सोडल्या तर निम्मा गाव तऱ्हाट असातो. प्रत्येक गल्लीत एक जण तरी धोतर फिटुन पडलेला दिसतो. त्यात आपली गावं म्हणजे दोन पार्ट्यात दुभंगलेली. दुष्काळानं आणि व्यवस्थेनं पिचलेली. पोलिसांचं आणि वकिलांचं हक्काचं गिऱ्हाईक.

पंढरीला कमी एवढी गर्दी कोर्टात आणि साहेबाच्या बंगल्यावर जमते. आधीच्या पिढीकडं विकायला वलांड्यावरचं रान तरी होतं. आता आपल्या पिढीनं प्लॉटींगच्या नावाखाली गावखुरातले विकून खाल्ले. ज्यांच्यावर माती विकून खायची पाळी येते तो देशोधडीला लागला म्हणून समजा. अश्या देशोधडीला लागलेल्या गावातून-समाजातून बाहेर पडण्याची धडपड, तगमग न करता तिथेच तरफडत बसतोय...याच्यावरचं बोलतोय माझा सिनेमा.

गावातल्या सगळ्याच पोरांना काहीतरी करायचं आहे, पण नेमकं काय करायचं हे नीट कळतं नाही. जसा बोरीचा काटा जर पायात मोडला तर भलती कडेच सलतो. आपण जिथे-जिथे दाबून पाहातो तिथे-तिथे चमक निघते. आणि आपण प्रत्येक ठिकाणी टोकरून पाहाताना पाय रक्तबंबाळ होतो. पण तोच पाय आपण नीट स्वच्छ धुवून पाहीला तर नेमका काटा दिसंल. आणि भलतीकडेच टोकरणं थांबेल.

मला जेंव्हा थोडं-थोडं कळु लागलं होतं, तेव्हाच मी कलेक्टर व्हायचं सांगणं बंद केलं. मी कुणी विचारलं तुला काय करायचंय तर मी सांगायचो...मी जर एस.टी. मधे उभा दिसलो तर, मला कुणीही ऊठून जागा दिली पाहिजे. एवढ्या पर्यंत ते आलं होतं. म्हणजे स्वतःची गाडी घेईलं वगेरे पैशाच्या गोष्टी डोक्यातच नव्हत्या. आणि शोध सुरू केला स्वतःतल्या क्षमतांचा आणि जगातल्या संधींचा. बिनं भांडवली, बिनं खर्ची, बिन मार्गी अशा करियरकडे बिना गुरूचा, वाटेत भेटेल त्याचा सल्ला घेत वाटचाल सुरू. भांडवल फक्तं मित्र आणि घरच्यांचं पाठबळ.

गावातल्या मुलांना एकत्र करूनं शेतीमातीच्या प्रश्नावर प्रकाश टाकणारी नाटकं करत करत सामाजिक भान जपणारं शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला हे कुळवाडी भूषण छत्रपती शिवराय आणि बाबासाहेबांचा विचार सांगणारं नाटक कधीही नाट्यशास्त्राच्या शाळेची पायरीच न चढलेल्या रंगमळाच्या बहुतांश शेतकरी कलावंतांनी केलं.

आता बघु म्हणलं सिनेमा करता येतोय का ते...पिढ्यानपिढ्या वेग-वेगळी पिकं घेऊनं पाहिली. हे नवं पीकही घेऊन बघावं. तोटा सहन करायची ताकद तर आहेच. सिनेमा चांगला झालाय. पण आई म्हणती तसं..किती जोरातं पीक आलं तरी पदरात पडंल तेवढंच आपलं.

पीक तर चांगलं आणलंय. तुम्ही पाहातान तेव्हा म्हणतान...लई मेहनत घेतली राव, आपल्यालाही हे पीक घ्यायचंय. हे नवं सिनेमाचं पीक काढणीला येईल तेव्हा जरूर या पाहायला. तुम्ही पण म्हणतान... कुठून आणलं राव हे बियाणं? आपल्याला पण पुढच्या वर्षी करायचंय थोडं फार. तेव्हा आम्ही तुम्हाला जरूर वाणवळा देऊ विचार रूपी बियाण्याचा. आपल्या घरच्या शाळेतला...

(लेखक साहित्यिक, अभिनेते व रंगकर्मी आहेत.) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT