Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Crop : सोलापूर जिल्ह्यात खरीप पिके पावसाने तरली

Kharif Season : या हंगामात सोयाबीन, तूर, बाजरी, उडीद, मूग, मका ही पिके घेतली जातात. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ५४५ मिलिमीटर आहे.

Team Agrowon

Solapur News : जिल्ह्यात यंदा हंगामाच्या सुरुवातीला पावसाने चांगली सुरुवात केली. पण गेल्या दीड महिन्यापासून प्रदीर्घ विश्रांती घेतलेल्या पावसाने मागच्या दोन दिवसांत सर्वदूर हजेरी लावल्याने शेवटच्या घटका मोजणारी खरीप पिके तरली आहेत. विशेषतः माळशिरस, करमाळा, सांगोला तालुक्यांत सोयाबीन, बाजरी, तूर, मका यांसारखी पिके वाळत चालली होती, पण त्याची चिंता आता मिटली आहे.

जिल्ह्यात मागच्या काही वर्षांपासून खरिपाचे क्षेत्र वाढते आहे. या हंगामात सोयाबीन, तूर, बाजरी, उडीद, मूग, मका ही पिके घेतली जातात. जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ५४५ मिलिमीटर आहे. त्यापैकी आतापर्यंत सरासरी ४०० मिलिमीटरपर्यंत झाला आहे. पण तो सरसकट झाला नाही. जिल्ह्याचे खरिपाचे क्षेत्र ३ लाख ३७ हजार ९६८ हेक्टर इतके आहे.

पण यंदा सर्वाधिक १२३ टक्के क्षेत्रावर ४ लाख १७ हजार २१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. हंगामाच्या सुरुवातीला मे महिन्यामध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यात सगळीकडे आशादायक चित्र होते. खरिपाच्या पेरण्यांनाही अगदी वेळेवर सुरुवात झाली. पण गेल्या दीड महिन्यापासून मात्र पावसाने प्रदीर्घ विश्रांती घेतली.

परिणामी बार्शी, मोहोळ, माळशिरस, दक्षिण सोलापूर आणि अकलूज, माळशिरस, करमाळा आणि सांगोला या तालुक्यांमध्ये पावसाची टंचाई सुरू झाली. पिके ताणावर गेली, विशेषतः जिथे पाणीसाठ्यांवर आधारित सिंचनाची सोय नाही, त्या ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होते. गेल्या काही दिवसांत तर या भागातील पिके पुरती कोमेजून गेली. पण मागच्या दोन दिवसांत पडलेल्या पावसामुळे मात्र मोठा दिलासा या पिकांना मिळाला आणि ती चांगलीच तरली.

माझ्याकडे दहा एकर सोयाबीन आहे. आम्ही वेळेत पेरण्या केल्या, पण दीड महिन्यापासून पाऊस नसल्याने सोयाबीन उगवूनही वाढत नव्हते. मागच्या दोन दिवसांत चांगला पाऊस झाल्याने मोठे नुकसान टळले, तरीही उत्पादकतेवर परिणाम होणार आहे.
रत्नदीप बोरावके, शेतकरी, माळीनगर, ता. माळशिरस
माझ्याकडे ४ एकरांवर सोयाबीन आहे. पण दोन महिन्यांपासून पाऊस नाही, पिके चांगली उगवली आहेत, आता शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत, या वेळी नेमकी पाण्याची गरज आहे. दोन दिवसांपूर्वी पडला, पण त्यावर किती उत्पन्न निघेल, हे सांगता येत नाही.
- सुभाष इंगोले, शेतकरी, कोंढेज, ता. करमाळा
मंगळवेढा तालुक्यात तूर, उडीद, मूग, सूर्यफूल ही प्रमुख पिके आहेत. मागच्या काही दिवसांपासून ही पिके पाण्यावर आली होती. अनेक ठिकाणी ती सुकत होती. पण दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसाने त्यांना जीवदान मिळाले आहे. सगळी पिके चांगली आहेत. उडीद आता काढणीला आले आहे, तर सूर्यफूल फुलोरावस्थेत आहे.
- मनीषा मिसाळ, तालुका कृषी अधिकारी, मंगळवेढा
ज्या भागात लवकर पेरण्या झाल्या आहेत, त्या भागातील शेतकरी पाण्याअभावी आणि किडरोगांमुळे अडचणीत आले आहेत. पण ज्यांनी उशिरा पेरण्या केल्या आहेत. त्यांना मात्र आता अलीकडे पडलेल्या पावसाचा फायदा झाला आहे. फळधारणा, फुलधारणा अवस्थेतच नेमका अनेक भागात पाण्याचा ताण पडल्याने अडचण झाली. पण शेतकऱ्यांनी कीड-रोगाची लक्षणे वेळीच ओळखून फवारण्या करून घ्याव्यात.
-प्रा. अमोल शास्त्री, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Udgir APMC : उदगीर बाजार समितीचे माजी सभापती हुडेंसह दोघे अपात्रच

Farm Road : ‘महसुल’ने केले १०४ पाणंद रस्ते खुले

Kharif Crop Loss : सांगली जिल्ह्यात पाणी देऊन जगवली खरीप पिके

Rainfall Deficit : पावसाची तूट; दुष्काळाचे सावट गडद

New Municipal Corporations: पुण्यात तीन नवीन महानगरपालिकांची गरज; अजित पवार

SCROLL FOR NEXT