
Beed News : मागील एक-दोन दिवस झालेल्या अति पावसामुळे कपाशीत आकस्मिक मर आली. पीक हातच गेले. त्यामुळे खचलेल्या शेतकऱ्याने मायबाप सरकार मदत करा, सांगा आता आम्ही जगायचं कसं? असा उद्विग्न सवाल केल्यानंतर प्रशासनाकडून बांधावर जात त्या शेतकऱ्याच्या पीक नुकसानीचा गुरुवारी (ता. ३१) पंचनामा करण्यात आला.
यासंदर्भात अधिक माहितीनुसार, की गेवराई तालुक्यातील सुरळेगावचे शेतकरी ज्ञानेश्वर काळे यांच्याकडे साडेतीन एकर शेती आहे. त्यापैकी अडीच एकर कपाशी पिकापैकी एक एकरातील कपाशीचे पीक अति पावसामुळे संपल्यात जमा आहे. तर दुसऱ्या दीड एकरातील कपाशी पिकांपैकीही कपाशी पिकाचे ड्रिंचींग केल्यामुळे काही बचाव झाला असला तरीही त्या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती नुकसानग्रस्त शेतकरी श्री. काळे यांनी दिली.
कपाशी पिकाचे नुकसान होत असताना प्रशासन, शासन स्तरावरून केवळ बघ्याची भूमिका घेतली जात, असल्याने श्री. काळे यांनी समाज माध्यमातून आपला संताप व्यक्त केला होता. आमदार अमरसिंह पंडित यांनाही निवेदन दिले होते.
त्यानंतर गेवराईचे तहसीलदार त्यांच्या निर्देशानुसार नायब तहसीलदार एस. बी सोनवणे, तलाठी अमित तरवरे तसेच कृषी सहाय्यक योगेश सुरदूसे यांनी गुरुवारी (ता. ३१) सुरळेगाव येथील श्री. काळे यांच्या गट नंबर ६१/१ मधील नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केली.
अति पावसामुळे आकस्मिक मर येऊन कपाशीचे एक एकरातील पीक हातचे गेल्याची स्थिती असल्याची माहिती कृषी सहाय्यक श्री. सुरदूसे यांनी दिली. झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून अहवाल तहसीलदारांना सादर करण्यात येणार असल्याचेही तलाठी श्री. तरवरे यांनी सांगितले.
अगोदरच श्री. काळे यांच्याकडे राष्ट्रीयकृत बँकेचे दीड लाखाचे पीक कर्ज आहे. व्याज भरणा करून नवं-जुनं करण्यासाठी दमडी नसल्याने त्यांनी यंदा गावातील बचत गटाचे कर्ज काढून जूनच्या पहिल्या आठवड्यात कापूस लागवड केली होती.
तत्काळ भरपाई द्यावी
झालेल्या नुकसानी विषयी माहिती देताना शेतकरी श्री. काळे म्हणाले, की कपाशी पिकावर आत्तापर्यंत नांगरणीसाठी एकरी २ हजार, रोटावेटर साठी १६००, सरी पाडण्याकरता १ हजार, बियाण्यांसाठी २ हजार, ४ पाळ्यासाठी २४०० रुपये, २ फवारण्यासाठी ४ हजार, २ खुरपणीसाठी ३ हजार, खतासाठी ४ हजार, ड्रिंचिंगसाठी १५०० रुपये असा एकूण खर्च आला. मात्र पीक हातच गेल्याने आता पदरात काहीच पडणार नसल्याची व्यथा मांडली. शासन आणि प्रशासनाने झालेल्या नुकसानीची दखल घेऊन तत्काळ भरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.