Solapur News : सोलापूर जिल्ह्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सलग पाऊस होतो आहे. बुधवारीही (ता.१२) पुन्हा मध्यरात्रीपासून सुरू झालेली संततधार थांबून-थांबून सुरूच आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १५०.५ मिलिमीटर इतका पाऊस झाला असून, ९१ मंडलापैकी १९ मंडलांत पावसाचा जोर सर्वाधिक आहे. जिल्ह्यातील भीमा, सीना, नागझरी या प्रमुख नद्या तुडुंबू भरुन वाहू लागल्या आहेत. दरम्यान, कासेगाव (ता.दक्षिण सोलापूर) येथे ओढ्याच्या पाण्यात तिघे वाहून गेले, त्यापैकी दोघे बचावले, पण एकजण बेपत्ता आहे. त्याचा शोध सुरू आहे.
पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, करमाळा या तालुक्यांत पावसाची संततधार सुरूच आहे. मंगळवारी दुपारी पावसाने हलकी हजेरी लावल्यानंतर रात्री अकरापासून पुन्हा पावसाची संततधार सुरू झाली. बुधवारी मध्यरात्रीपासून त्याचा जोर अधिक वाढला. सकाळी नऊच्या सुमारास काहीशी विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा त्याची संततधार थांबून-थांबून सुरूच राहिली.
जिल्ह्यातील ९१ मंडलांपैकी १९ मंडलांत पावसाचा जोर राहिला. याठिकाणी ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. उत्तर सोलापुरातील मार्डी मंडलात १०४.३ मिलिमीटर, मोहोळ तालुक्यातील नरखेड मंडलात १०० मिलिमीटर, सावळेश्वर मंडलात ११.१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. बार्शी तालुक्यातील बार्शी, वैराग, उपळे दुमाला, गौडगाव पांगरी, पानगाव, नारी, सुरडी, खांडवी या मंडलांतही चांगला पाऊस झाला आहे. अक्कलकोट तालुक्यात १०२ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
यामध्ये अक्कलकोट, जेऊर, तडवळ, करजगी, दुधनी, मैंदर्गी, वागदरी, चपळगाव, किणी मंडळाचा समावेश आहे. माढा तालुक्यात ९७.७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. यामध्ये माढा, दारफळ, कुर्डूवाडी, रोपळे, म्हैसगाव, टेंभुर्णी, रांजणी, मोडनिंब, लऊळ या मंडळाचा समावेश आहे. सततच्या पावसामुळे प्रमुख भीमा, सीना, नागझरी, नीलकंठा या नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. तसेच ओढे, नालेही वाहत आहेत. उजनी धरणातही ३ टीएमसीपर्यंत पाणीसाठा वाढला आहे. लघू आणि मध्यम प्रकल्पातही बऱ्यापैकी पाणी साठले आहे.
तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)
उत्तर सोलापूर : १७५.८, दक्षिण सोलापूर : १०९.३, बार्शी : १३१, अक्कलकोट : ८५,२, मोहोळ : २२८.९, माढा :१६३.९, करमाळा : १८९.६, पंढरपूर : १७३.६, सांगोला : १६७.७, माळशिरस : ११४.१, मंगळवेढा : १३५.८.
जूनमध्ये समाधानकारक पाऊस
गेल्या कित्येक वर्षानंतर यंदाच्या वर्षी जूनमध्ये पावसाने चांगली सुरुवात केली आहे, हा पाऊस पेरणीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्याचबरोबर बऱ्याच तालुक्यातील पाणीटंचाई या पावसाने दूर होणार आहे. शिवाय जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही सुटणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जून महिन्याची पावसाची सरासरी १०२ मिलिमीटर आहे. यंदा आतापर्यंत १५० मिलिमीटर पाऊस झाला आहे.
कासेगावात तिघे वाहून गेले, दोघे बचावले, एकाचा शोध सुरू
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव परिसरातील उळे रस्त्यावरील ओढ्यावरील पूल ओलांडताना मोटारसायकलवरून प्रवास करणारे तिघे पाण्यात वाहून गेले. ज्ञानेश्वर संभाजी कदम, संदीपान जाधव आणि महादेव रेड्डी अशी त्या तिघांची नावे आहेत. त्यापैकी बबन जाधव आणि महादेव रेड्डी यांना पुराच्या पाण्याबरोबर वाहून जाताना ओढ्यातील झाडांना पकडून स्वतःला जीव वाचवण्यात यश आले. पण ज्ञानेश्वर कदम हा बेपत्ता झाला. त्याचा शोध सुरू आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.