Kolhapur News : गतवर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातच रब्बीच्या पिकांनी शेतशिवार फुलल्याचे चित्र सगळीकडे होते. यावर्षी मात्र गेल्या आठवड्यापर्यंत सर्वत्र परतीचा पाऊस सुरू होता. त्यामुळे भुदरगड तालुक्यासह जिल्ह्यात अद्याप खरीप पिकांची काढणी सुरू आहे.
मॉन्सूनोत्तर पावसामुळे रब्बी हंगामही लांबणार असून, याचा परिणाम उत्पादनावरही होण्याची शक्यता आहे. खरिपाचा हंगाम संपल्यानंतर शेतकरी रब्बीची पेरणी करतात. हरभरा, गहू, शाळू, मक्का उत्पादक शेतकरी शेती मशागतीची कामे करून नियोजन करतात. परंतु, यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने सुरुवातीपासूनच जमिनीत ओल कायम आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना मशागत करता आली नसल्याचे दिसून येते. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे, असे शेतकरी साधारणपणे सोयाबीन, भात, भुईमुगाची काढणी झाल्यानंतर हरभरा, गहू, शाळू पिकाची पेरणी करतात. यावर्षी सुरुवातीपासून सतत पाऊस पडल्याने पिकांचे नुकसान तर झालेच, शिवाय भात, सोयाबीन, भुईमूग पिकांचे नुकसान होऊन काढणीही लांबली.
मागील आठवडाभर पावसाने अक्षरशः शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणले. त्यामुळे नुकसान झाल्यानंतर जे काही पीक शिल्लक आहे, अशा पिकांची चिखलातून काढणी शेतकरी करताना दिसत आहे. दरवर्षी साधारणपणे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ज्वारी, मका पेरणी झालेली असते ऊस तेवढाच शेतात शिल्लक राहतो.
भात, भुईमूग, सोयाबीनची काढणीची सध्या धांदल सुरू आहे. साहजिकच त्यामुळे खरिपाची काढणी लांबली. परिणामी, रब्बीचे पीक घेण्यासाठी शेतात मशागत होऊ शकली नाही. उत्पादनाचा विचार केल्यास रब्बी हंगामातील हरभरा उत्पादनात सध्याच्या अंदाजानुसार किमान १० टक्के घट येण्याची शक्यता आहे. अद्याप थंड पडायला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे यावर्षी थंडीचा मोसमही लांबण्याची शक्यता आहे.
भुदरगड तालुक्यामध्ये परतीच्या पावसामुळे ऊस लागण उशिरा होण्याची शक्यता आहे. बऱ्याचशा क्षेत्रात पाणी साचून राहिल्याने जमिनी घातीवर येण्यासाठी वेळ लागणार आहे. तसेच येणाऱ्या थंडीचा विचार करता त्याचा ऊस उवणीवर परिणाम होणार आहे.- सुनील डवरी, मंडल कृषी अधिकारी, गारगोटी
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.