Rabi Season agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Season : खानदेशातील रब्बी संकटात; अनेक प्रकल्पांत अल्प पाणीसाठा

Rabi crop : खानदेशात यंदा पावसाची तूट राहिली आहे. तसेच अनेक सिंचन प्रकल्पांत जलसाठा कमी आहे. हलक्या, मुरमाड जमिनीतील ओल कधीच उडून गेली आहे. कोरडवाहू पिकांची पेरणी या भागात शक्य नाही.

Chandrakant Jadhav

Jalgaon News : खानदेशात यंदा पावसाची तूट राहिली आहे. तसेच अनेक सिंचन प्रकल्पांत जलसाठा कमी आहे. हलक्या, मुरमाड जमिनीतील ओल कधीच उडून गेली आहे. कोरडवाहू पिकांची पेरणी या भागात शक्य नाही. त्यामुळे रब्बी हंगामातील विविध पिकांची पेरणी १८ ते २२ टक्के कमी होणार असून खानदेशातील रब्बी हंगाम संकटात आहे.

जळगाव जिल्ह्यात सुमारे सव्वादोन लाख, धुळ्यात ६० हजार आणि नंदुरबारात ४० हजार हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी अपेक्षित आहे. मागील हंगामात तिन्ही जिल्ह्यांत पेरणी १०० टक्क्यांवर पेरणी झाली होती. जळगाव जिल्ह्यात सलग तीन वर्षे पेरणी १३५ टक्क्यांवर झाली. सर्वाधिक सव्वा लाख हेक्टरवर हरभरा होता. परंतु यंदा पेरणीचे १०० टक्के उद्दिष्ट गाठता येणार नाही, अशी उलट स्थिती आहे. तसेच कमी पावसामुळे मका, गहू या पिकांची पेरणी घटणार आहे.

ज्वारीचे दर टिकून आहेत. तसेच दर्जेदार चाराही रब्बीत मिळतो. पशुधनासाठी सकस चारा व धान्याच्या विक्रीतून नफा मिळेल, यासाठी ज्वारीची पेरणी खानदेशात ५५ ते ६० हजार हेक्टरवर होईल. जळगाव जिल्ह्यात ३६ ते ३७ हजार हेक्टरवर ज्वारीची पेरणी होईल. ज्वारीला पाणी अधिक लागत नाही. तापी, गिरणा, अनेर, पांझरा नदीकाठी काळ्या जमिनीत ज्वारीचे पीक जोमात येते. यामुळे ज्वारीची पेरणी फारशी घटणार नाही. हरभरा पेरणीत किंचित घट होईल.

जळगाव जिल्ह्यात एक लाख १५ हजार हेक्टरवर, तर धुळे व नंदुरबारात मिळून ५५ ते ६० हजार हेक्टरवर हरभरा पिकाची पेरणी होईल. गव्हाची पेरणी ३२ ते ३३ हजार हेक्टरवर केली जाते. परंतु यंदा ही पेरणी २८ ते २९ हजार हेक्टरपर्यंत राहील. मका पिकाची लागवड ४० ते ४५ हजार हेक्टरवर जाऊ शकते. कमी दर, अवकाळी पावसात बसलेला फटका, चाऱ्याचेही कमी दर, खते व पाण्याची अधिक गरज, अमेरिकन लष्करी अळी आदी कारणांमुळे मका लागवड आठ ते १० हजार हेक्टरने कमी होईल, असा अंदाज आहे.

खानदेशात जळगावमधील पारोळा, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, अमळनेर, जळगाव, जामनेर, बोदवड, धुळ्यातील शिंदखेडा, धुळे, साक्री, नंदुरबारातील नंदुरबार, नवापूर भागात मोठे क्षेत्र हलके, मुरमाड आहे. या भागात जलसाठेही लवकर आटतात. परिणामी, या भागातील रब्बी स्थिती बिकट आहे, असे सांगण्यात आले.

खते मुबलक

कृषी विभागाने खतांसाठी नियोजन केले असून, जळगाव जिल्ह्यात एकूण दीड लाख टन, धुळ्यात ५० हजार टन, नंदुरबारात सुमारे ४० हजार टन खतांचा पुरवठा रब्बीत विविध टप्प्यांत होईल. जळगावात सुमारे ७२ हजार टन युरियाचा पुरवठा होईल. सध्या खरिपातील खतेही शिल्लक आहेत. हा साठा खानदेशात मिळून २५ हजार टनांवर आहे. यामुळे टंचाई नसणार आहे, असा कृषी विभागाचा दावा आहे.

गिरणासह अनेक प्रकल्पांत ठणठणाट

खानदेशात जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव या तालुक्यांत मिळून २१ हजार हेक्टर क्षेत्रातील रब्बीला नाशिकमधील नांदगाव व जळगावच्या चाळीसगाव तालुक्याच्या सीमेवरील गिरणा नदीवरील गिरणा धरणातून आवर्तन मिळते. परंतु यंदा धरणातील जलसाठा ५७ टक्केच आहे. यामुळे रब्बीसाठी किती आवर्तने मिळतील, हा प्रश्‍न आहे. धुळ्यातील अमरावती, सोनवद, मालनगाव, बुराई हे प्रकल्प तळ गाठत आहेत. या धरण क्षेत्रातही रब्बी स्थिती निराशाजनक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: गहू बाजारात नरमाई; केळीला उठाव, कापूस दरावर दबाव, गवार तेजीत, तर ज्वारीला मागणी कायम

Ganeshotsav 2025: माटवी सजविण्याच्या खरेदीकरिता ग्राहकांची झुंबड

Alu Blight Disease: अळू पिकावरील करपा रोगाचे व्यवस्थापन

Kharif Sowing 2025: सांगली जिल्ह्यात खरीप पेरणी ९५ टक्क्यांवर

Onion Cultivation: खानदेशात कांदा पीक स्थिती बरी; पावसामुळे सिंचन बंद

SCROLL FOR NEXT