Pune News : भारताला जगाची ‘फ्रुट बास्केट’ बनविण्याचे उद्दिष्ट केंद्राने ठेवले असून त्याचे नेतृत्व निर्विवादपणे महाराष्ट्र करेल. या योजनेतून द्राक्षासाठी पुण्यात, संत्र्यासाठी नागपूरला; तर डाळिंबाकरीता सोलापूरमध्ये ‘शुद्ध लागवड सामग्री केंद्र’ (क्लिन प्लॅंट सेंटर) स्थापन केले जातील, अशी घोषणा केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालय व कृषी विभागाने देशातील पहिली आंतरराष्ट्रीय ‘अॅग्री हॅकॅथॉन’ पुण्याच्या कृषी महाविद्यालय प्रांगणात आयोजित केली होती. या तीन दिवसीय उपक्रमाच्या मंगळवारी (ता. ३) झालेल्या समारोप व पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,
रोहयो व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी व कृषी आयुक्त सूरज मांढरे, पुण्याच्या प्रभारी विभागीय आयुक्त श्रीमती कविता द्विवेदी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. हॅकॅथॉनमध्ये ‘कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग’ या श्रेणीत प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल ‘जयेश एआय सोल्यूशन’ यांना २५ लाखांचे पारितोषिक देत गौरविण्यात आले.
अत्याधुनिक रोपवाटिका तयार करणार : चौहान
श्री. चौहान म्हणाले, ‘‘फलोत्पादनात आज भारत अग्रगण्य असण्याचे श्रेय महाराष्ट्रातील कष्टाळू शेतकरी व राज्य शासनाच्या धोरणाला आहे. मात्र, फलोत्पादनात शुद्ध लागवड सामग्रीचा अभाव आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार व कीडरोगमुक्त वाण मिळत नसल्यामुळे उत्पादन घटते. पीकसंरक्षण खर्च वाढतो. ही समस्या हाताळण्यासाठी देशात ९ ठिकाणी ‘शुद्ध लागवड सामग्री केंद्र’ (क्लिन प्लॅंट सेंटर) स्थापन केले जाणार आहेत. त्यातील तीन महाराष्ट्रात असतील. या केंद्रांसोबत इस्राईल व हॉलंडच्या मदतीने अत्याधुनिक रोपवाटिका तयार होतील. त्यामुळे या राज्यातून जगाला उत्कृष्ट फळे निर्यात होतील.’’
शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांमध्ये तयार झालेल्या दरीवर केंद्रीय कृषिमंत्र्यांनी बोट ठेवले. ते म्हणाले की, शेतकरी व शास्त्रज्ञ एकत्र आले तर चमत्कार होऊ शकतो. कृषिमंत्री म्हणून मीसुद्धा केवळ दिल्लीत राहून जमणार नाही. मंत्री शेतात जात नाही व शेतकऱ्यांचे ऐकत नाही तोपर्यंत कृषिविकास होणार नाही. त्यामुळे मीदेखील शेतकऱ्यांसोबत सतत राहण्याचा प्रयत्न करतो आहे. कृषी शास्त्रज्ञ प्रयोगशाळेत काम करतात. त्यांचे संशोधन वेळेत शेतात पोचत नाही. इकडे मात्र नव्या तंत्राच्या प्रतीक्षेत शेतकरी शेतात राबत आहेत. केंद्रीय संस्थेकडे १६ हजार कृषी शास्त्रज्ञ आहेत. त्यांना आता आम्ही गावागावात जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पुण्यात संगोपन केंद्र : मुख्यमंत्री फडणवीस
‘‘कृषी क्षेत्राला सर्वात जास्त आता तंत्रज्ञानाची गरज आहे. वाढती मजुरी व लागवड खर्च, बदलते हवामान व त्यातून पिकांना बसणारा फटका यामुळे शेतीमधील उत्पादकता वाढवून तिला नफेशीर करण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. हे आव्हान केवळ तंत्रज्ञान पेलू शकते. त्याकरिता अॅग्री हॅकॅथॉनसारख्या स्पर्धा भरविण्यात आली. त्यातून नव्या कंपन्या (स्टार्टअप्स्) पुढे येतील. त्याकरिता कृषी सचिवांनी पुणे कृषी महाविद्यालयात संगोपन केंद्र (इनक्युबेशन सेंटर) उभारावे,’’असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या वेळी म्हणाले. अॅग्री हॅकॅथॉनसारखे उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात भरवावेत. त्यातून पुढे येणाऱ्या संशोधनाचे रूपांतर उत्पादनात व्हावे व ती उत्पादने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेईल’’, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
‘एआय’चा वापर वाढणार : उपमुख्यमंत्री पवार
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, ‘‘‘देशाच्या कृषी व्यवस्थेला दिशा देण्याचे काम राज्यातील शेतकरी व कृषी संलग्न संस्थांनी केले आहे. पुण्यात सन १६३६ मध्ये राजमाता जिजाऊ मॉंसाहेबांनी सोन्याचा नांगर चालविला. ही घटना प्रतिकात्मक असली तरी देशाच्या कृषी प्रगतीचा पायाच या घटनेने घातला आहे. आता शेतीचा टप्पा कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ‘एआय’जवळ पोचला आहे. अॅग्री हॅकॅथॉनसाठी ५०० हून अधिक अर्ज आले होते. त्यापैकी केवळ १२५ नावीन्यपूर्ण प्रस्तावांना सहभागी करून घेता आले. कमी जागेत व कमी खर्चात यापुढे केवळ नफ्याची शेती करावी लागेल. या संकल्पनेला दिशा देण्याचे काम अॅग्री हॅकॅथॉनने केले आहे. या उपक्रमातून मिळणारे ‘एआय’सह इतर तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर नेण्याचे काम कृषी विभागाकडून केला जाईल.’’
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.