Grape Crop Management : सामान्यतः सटाणा, इंदापूर, बोरी अशा काही भागांमध्ये आगाप छाटणीची सुरुवात या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होत असते. बाजारात चांगला दर मिळण्यासाठी ही छाटणी लवकर घेऊन द्राक्षे दिवाळी ते ख्रिसमस या काळात उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जातात.
या काळात पाऊस बऱ्यापैकी पडत असल्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव अधिक राहतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी बऱ्याचदा महागडी रसायने वापरली जातात, त्यामुळे काही परिस्थितीत बुरशीनाशकांचे अवशेष राहण्याची शक्यता जास्त असते. तेव्हा आगाप छाटणीच्या बागेतील नियोजन कसे असावे, या बद्दलची माहिती या लेखात घेऊ.
काडीची तपासणी करून घेणे
फळछाटणीच्या साधारणतः एक आठवडा आधी काडीची प्रयोगशाळेतून तपासणी करून घेणे आवश्यक असते. त्यासाठी एक एकर बागेतून पाच ते सहा ठिकाणाहून प्रत्येक जाडीच्या (७ ते ८ मि.मी., ८ ते १० मि.मी. आणि १० ते १२ मि.मी. जाडीच्या) सबकेन किंवा सरळ अशा प्रत्येक वर्गातील नऊ ते दहा काड्या तळातून एक डोळा राखून काढाव्यात.
या काड्या ओल्या गोणपाटात बांधून प्रयोगशाळेत पाठवाव्यात. तिथे सूक्ष्मदर्शकाखाली डोळे तपासणी होते. त्या वेळेपर्यंत काडी ओली राहणे गरजेचे असते. डोळे तपासणी केल्यामुळे छाटणीच्या त्रुटी टाळता येतात.
खत व्यवस्थापन
खत व्यवस्थापनासाठी माती व पाणी परीक्षण फळछाटणीपूर्वी अवश्य करून घ्यावे. यामुळे जमिनीची सद्यःस्थिती कळून येईल. त्यानुसार खतांचे व्यवस्थापन करून उत्पादन खर्चात बचत साधता येईल. बऱ्याचशा जमिनीत चुनखडी व उपलब्ध पाण्यात क्षार ही समस्या दिसून येते.
जमिनीत चुनखडी व पाण्यात क्षार असलेल्या बागेत सल्फरचा वापर शेणखतामध्ये मिसळून करता येईल. तर फक्त पाण्यात क्षार असलेल्या परिस्थितीमध्ये जिप्सम १५० ते २०० किलो प्रति एकर प्रमाणात शेणखतात मिसळून देता येईल. बऱ्याच बागेत
चुनखडीचे प्रमाण ५ ते २२ टक्क्यांपर्यंत दिसून येते, अशा स्थितीत ५० ते १२० किलो प्रति एकर सल्फर वापरावे. ५ ते ८ टक्के चुनखडीसाठी ५० ते ६० किलो सल्फर, ८ ते १५ किलो चुनखडीसाठी ८० ते १०० किलो सल्फर आणि १५ ते २२ टक्के चुनखडीसाठी १०० ते १२० किलो सल्फर या प्रमाणे प्रत्येक हंगामात तीन ते चार वर्षे सलग वापरणे गरजेचे आहे.
विद्राव्य खताचा वापर जमिनीमध्ये मिसळण्यासाठी करू नये. ही खते महागडी असून वेलीला लवकर उपलब्ध होतात. यामुळे बागेत ओलावा सर्वत्र असल्यामुळे मुळांचा विकासही चांगला झालेला असतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अन्नद्रव्यांचा वापर केल्यास उपलब्धता सहज होते.
या वेळी चारी घेता आल्यास वेलीची मुळे दहा टक्क्यांपेक्षा अधिक तुटणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. जमिनीमध्ये शेणखत १० टन प्रति एकर व एसएसपी १०० किलो प्रति एकर शेणखतात व्यवस्थित मिसळून घ्यावे. त्याच प्रमाणे नवीन फुटींसाठी नत्राची उपलब्धता करण्याकरिता अमोनिअम सल्फेट ६० ते ८० किलो प्रति एकर प्रमाणे साधारण परिस्थितीत बागेत वापरता येईल.
शेणखतातून किंवा पाण्यातही नत्र उपलब्ध असल्यामुळे वेलीच्या वाढीचा जोम जास्त प्रमाणात दिसू शकतो. तेव्हा बागेतील परिस्थिती पाहून नत्र कमी अधिक करावे. पाण्यामध्ये सोडिअम ८० ते १०० पीपीएम किंवा त्यापेक्षा अधिक असलेल्या परिस्थितीमध्ये मात्र प्रथम सोडिअमचे व्यवस्थापन गरजेचे असेल. अशा परिस्थितीत जिप्सम १५० ते २०० किलो प्रति एकर या प्रमाणे मिसळून घ्यावे.
प्रत्यक्ष छाटणी
डोळे तपासणीच्या अहवालानुसार बागेत छाटणी करून घ्यावी. डोळे तपासणी न केलेल्या बागेत छाटणी करताना आपला पूर्वीचा अनुभव ध्यानात घ्यावा. सबकेन असलेल्या काडीवर गाठीच्या शेजारी एक ते दोन डोळे राखून छाटणी घ्यावी. सरळ काडी असलेल्या परिस्थितीत सबकेनच्या शेजारी एक ते दोन डोळे राखून छाटणी करावी. सरळ काडी असलेल्या परिस्थितीत आखूड पेरा असलेल्या ठिकाणी (६ ते ८ वा डोळा) राखून छाटणी करावी.
हायड्रोजन सायनामाइडचा वापर
काडीच्या जाडीनुसार बागेतील वातावरण, तापमान व डोळा किती फुगला आहे, यावर हायड्रोजन सायनामाइडची मात्रा अवलंबून राहील. साधारण परिस्थितीत ८ ते १० मिलि जाड काडीवर डोळा फुगलेला असल्यास ३० ते ३५ अंश सेल्सिअस तापमानात ४० मिलि हायड्रोजन सायनामाइड पुरेसे होईल. या वेळी बागेत बऱ्यापैकी रोगांचा प्रादुर्भाव असल्यामुळे याच द्रावणात तीन ते चार ग्रॅम मॅन्कोझेब प्रति लिटर पाणी या प्रमाणे मिसळता येईल. सुरुवातीचे काही दिवस रोगाचा प्रादुर्भाव आटोक्यात ठेवता येईल.
छाटणी होताच एक टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी काडी, ओलांडा व खोड त्या प्रमाणे बागेत बांधासह सर्व जमिनीवर फवारणी करावी. या फवारणीनंतर तिसऱ्या दिवशी ट्रायकोडर्मा उदा. मांजरी वाईनगार्ड २ मिलि प्रति लिटर या प्रमाणे व्यवस्थितरीत्या फवारणी करावी.
या वेळी कॅनॉपी नसली तरीही ३५० ते ४०० लिटर द्रावण प्रति एकरी वापरल्यास विशेषतः जमिनीवरील रोगग्रस्त पानांमधून रोगाचा प्रसार होणार नाही. छाटणीनंतर नवीन फुटी निघालेल्या परिस्थितीत पाच ते सात पानांच्या अवस्थेत (घड बाहेर पडलेला असताना) झिंक सल्फेट २ ग्रॅम, फेरस सल्फेट २ ग्रॅम आणि बोरॉन १ ग्रॅम प्रति लिटर पाणी यांची वेगवेगळी फवारणी घ्यावी.
फेरस सल्फेटचा वापर करताना द्रावणाचा सामू आम्लधर्मी करण्यासाठी अॅसिडचा (सायट्रिक किंवा सल्फ्युरिक अॅसिड) वापर करता येईल. त्याच प्रमाणे १० ते १५ किलो मॅग्नेशिअम सल्फेट प्रति एकरी जमिनीतून उपलब्ध करावे. १० पाने अवस्थेमध्ये कॅल्शिअम (क्लोराइड किंवा नायट्रेटच्या स्वरूपात) २ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे एक फवारणी करावी
पानगळ करणे
छाटणीपूर्वी पानगळ करून छाटणी वेळी डोळे फुगलेले असणे गरजेचे असते. यासाठी हाताने अथवा रसायनाने पानगळ करणार असला तरी ती छाटणीच्या १५ दिवस आधी पानगळ करावी. बऱ्याचशा भागामध्ये पावसामुळे रोगाचा प्रादुर्भाव होऊन कमी अधिक पानगळ झालेली दिसून येईल. आपल्या बागेतील परिस्थितीचा विचार करता हाताने पानगळ किंवा फवारणीचा कालावधी मागेपुढे करता येईल.
उदा. ५० टक्के पानगळ झालेल्या बागेत ८ दिवसांपूर्वी पानगळ केली तरी पुरेसे असेल. मजुरांची उपलब्धता असल्यास आपण छाटणी करणार असलेल्या डोळ्याच्या ठिकाणची ८ ते १० पाने हाताने काढून घेता येतील. रसायनाचा वापर करायचा झाला तर इथेफॉन ३ ते ५ मिलि अधिक ०-५२-३४ हे खत ५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे मिसळून फवारणी करावी. या वेलीवर कॅनॉपी किती प्रमाणात आहे, यावर द्रावणाचे प्रमाण अवलंबून असेल. पूर्ण कॅनॉपी असलेल्या परिस्थितीत ४५० ते ५०० लिटर पाणी प्रति एकर वापरावे.
फवारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या इथेफॉनच्या द्रावणाचा सामू ३.५ पर्यंत असल्यास पानगळ हळूहळू होऊन डोळे फुगण्यासाठी चांगले परिणाम मिळतील. ५० टक्के कॅनॉपी असलेल्या बागेमध्ये २५० ते ३०० लिटर पाणी पुरेसे होईल. इथेफॉनचे परिणाम पानगळीसाठी चांगले मिळत आहेत, याचा अर्थ फवारणीच्या दोन ते तीन दिवसांनंतर पाने फक्त पिवळी पडायला सुरुवात होईल.
त्यानंतरच्या काळात पान गळून खाली पडेल. १० ते ११ दिवसांत बागेतील पूर्ण पानगळ झालेली दिसेल. काडीवरील डोळे फुगलेले दिसतील. बागेत अशा प्रकारे पानगळ होताना पानातील अन्नद्रव्ये देठाद्वारे डोळ्यामध्ये गोळा होते. ते पान आपल्याच वजनाने खाली गळून पडते, या प्रक्रियेत वेलीमध्ये इथिलीनचे प्रमाण हळूहळू वाढते व ऑक्झिन्सचे प्रमाण हळूहळू कमी होते.
- डॉ. आर. जी. सोमकुंवर,
: ९४२२०३२९८८, (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, जि. पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.