Forest Department Agrowon
ॲग्रो विशेष

Forest Protection : स्त्रियांचे हात करी जंगलाचे रक्षण

डॉ. नागेश टेकाळे

डॉ. नागेश टेकाळे

Forest Department Opportunity for Women : भारत सरकारच्या सेवेत उच्च पदावर सेवेबरोबरच अधिकार प्राप्तीसाठी प्रतिवर्शी IAS, IRS, IPS आणि IFS साठी स्पर्धात्मक परीक्षा घेऊन लाखो युवक- युवतींमधून काही हजारांची निवड केली जाते. या वर्षी IFS म्हणजे Indian Forest Service मध्ये निवड झालेल्या चमूमध्ये दहा युवती आहेत ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कोणे एकेकाळी पुरुषांची मक्तेदारी असलेल्या वन खात्यात आता महिलासुद्धा ऑफिसर म्हणून रुजू होत आहे, हे शासनाचे जंगल वाचविण्यासाठीचे सुदृढ पाऊलच म्हणावयास हवे.

भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी २०२२ च्या भारतीय वन खात्याच्या अधिकारी वर्गाला त्यांच्या डेहराडून येथील पदवीदान समारंभात या युवतींचा सन्मान करताना त्यांच्या वन खात्याच्या जबाबदारीची त्याच बरोबर जंगल सांभाळणाऱ्या वन्य आदिवासी जाती जमातीबद्दल सहानुभूतीची जाणीव करून देताना भारतीय वनांचे खरे रक्षक असलेल्या आदिवासींच्या आरोग्य, शिक्षण आणि संस्कृतीची काळजी घेत असताना त्यांना वनात राहूनच आदर आणि संरक्षण कसे मिळेल याबद्दल जागरूकता दाखविण्याचे तळमळीने आवाहन केले.

‘‘जो दु:ख स्वत: अनुभवतो, जवळून पाहतो त्यालाच इतरांच्या, समाजाच्या दु:खाची जाणीव असते.’’ आदरणीय राष्ट्रपतींनी ओडिशामधील आदिवासींचे दु:ख जवळून पाहिले. एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीच्या दु:खावर फुंकर घालू शकते हे त्यांनी प्रत्यक्ष अनुभवलेले होते म्हणूनच या वर्षीच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून वन खात्याच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या या दहा महिला अधिकाऱ्यांचा त्यांनी अभिमानाने उल्लेख करत स्वत: निर्माण केलेली परंपरा पुढे चालवून सर्वांसाठी एक आदर्श निर्माण करण्याचे आवाहन केले.

ब्रिटनमधील १९ व्या शतकातील औद्योगिक क्रांतीमुळे लाकडाची मागणी वाढली आणि ब्रिटिश आधिपत्याखालील भारतामधील जंगलांची मोठ्या प्रमाणावर कटाई सुरू झाली यामुळे जंगलांचे रक्षण करणारा, वन्य प्राण्याबरोबर गुण्यागोविदांने राहणारा आदिवासी समाज फिरंग्याच्या अत्याधुनिक शस्त्रांच्या भीतीने मागे हटू लागला कारण तीर कमठयाने तो किती लढणार?

आदिवासी क्रांतिवीर बिरसा मुंडा याने आदिवासींना बरोबर घेऊन ब्रिटिशांना लढा दिला आणि त्यासाठी स्वत:ची आत्माहुती दिली. १८७५ ते १९२५ या पन्नास वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात ब्रिटिशांनी भारतीय जंगलामधील ८०,००० पट्टेदार वाघ, १.५ लाखापेक्षाही जास्त बिबटे आणि दोन लाखांवर कोल्हे, लांडगे यांची शिकार करून त्यांना मरून टाकले. श्रीमती मुर्मू म्हणतात, “जेव्हा मी प्राणी संग्रहालयास भेट देते तेव्हा भिंतीवर टांगलेली या वन्य पशूंच्या मुंडक्यांची श्रीमंती पाहून मला मनाला यातना होत असतानाही पूर्वीच्या वैभवशाली भारतीय जंगलाकडे पुन्हा घेऊन जाते.”

आज भारतीय जंगल रक्षणासाठी महिलांच्या हातांची गरज आहे. उत्तराखंडमध्ये हजारो महिलांनी सुंदरलाल बहुगुणा आणि चंडीप्रसाद भट यांच्या नेतृत्वाखाली मोठमोठ्या वृक्षांना मिठ्या मारून तेथील घनदाट जंगल वाचवले आहे. ‘चिपको’ आंदोलन या नावाने याची इतिहासात नोंद झाली आहे.

आज भारतामधील जंगलामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध पद्धतीने वृक्ष कापले जातात. काही दिवसांपूर्वी आलेल्या एका अहवालात मागील २० वर्षांत आपण आपल्या देशामधील ५० लाख पूर्ण वाढीचे वृक्ष भुईसपाट केले आहेत. अशा परिस्थितीत वाढते उष्णतामान, वादळवारे, गारपीट ही राहू, केतूसारखी संकटे तुमच्या आमच्या पाठीमागे का लागणार नाहीत? वातावरण बदलाच्या वाईट प्रभावापासून प्रत्येक नागरिकाचे रक्षण करणे हे शासनाचे कर्तव्य आहे

हे नुकतेच उच्च न्यायालयाने भारतीय घटनेच्या कलम १४ व २१ च्या आधारे बजावले आहे. वास्तविक आपण प्रत्येकानेच आपल्या मनामधून हा विचार काढून टाकावयास हवा की या भूमातेने लाखो वर्षांपासून संभाळलेली वने, वृक्ष, पाणी, हवा, खनिजे यांचा मी मालक आहे, मला हवे तेव्हा मी त्यास ओरबडणार! वास्तविक या वसुंधरेने आपणास ही जी निसर्ग संपत्ती दिली आहे तिचे आपण फक्त रक्षणकर्ते आहोत. तिला सांभाळणारे आहोत.

आज स्त्रियांचा सहभाग सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने वाढत आहे. आपल्या देशासाठी ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्यांचा असाच सहभाग भारतीय वनक्षेत्र सांभाळण्यासाठी, त्याच्या रक्षणासाठी वाढावयास हवा. स्त्रियांनी पुढाकार घेतल्यासच भारतीय वन क्षेत्र आणि त्यामधील जैव विविधता, वन्य पशूंची संख्या वाढू शकते. केरळ, कर्नाटकमध्ये शेतजमिनीमध्ये हत्तींचे आक्रमण वाढू लागले तेव्हा तेथील शेतकऱ्यांची समजूत काढण्यात वनखात्यामधील स्त्री

अधिकारी आघाडीवर होत्या. गावकऱ्यांच्या मदतीने त्यांनी जंगल क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बांबू लागवड केली. जेव्हा जंगलामधील अन्न, निवारा आणि संरक्षण कमी होते, तेव्हाच वन्य जीव जंगलाबाहेर पडू लागतात. आसाम आणि काझीरंगा भागांत महिला वन अधिकाऱ्यांच्या साह्याने जंगलामधील आदिवासींनी वन्य प्राण्यांसाठी शेकडो तलाव निर्माण केले आहेत. अनेक महिला अधिकारी आदिवासींबरोबर संवाद साधतात. त्यांच्या पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतात.

राष्ट्रपती म्हणतात, आदिवासी जगला तरच जंगल वाचेल अन्यथा या आदिम जातीचे भविष्य अंधारमय आहे. आज वातावरण बदलाचा सर्वांत जास्त प्रभाव हा जगामधील आदिवासी जमातीवर जास्त आहे आणि विशेष म्हणजे वातावरणामध्ये बदल करणारी, ते वाढवण्याची एकही कृती त्यांच्याकडून होत नाही थोडक्यात ‘‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’’ अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. पाणी समस्या आज आदिवासी स्थलांतरास कारणीभूत होत आहे म्हणूनच जंगल राखणे, पाणी साठवण क्षमता वाढवणे, नवीन स्थानिक वृक्ष लागवड करणे आणि यामध्ये आदिवासी स्त्रियांचा सहभाग वाढवणे आवश्यक आहे आणि यासाठीच कार्यक्षम वन अधिकाऱ्यांमध्ये स्त्रियांचा सहभाग जास्तीत जास्त असावयास हवा.

पूर्वी नागालँड राज्याचे धनेश पक्षी (हार्नबील) हे वैभव होते. तेथील जंगलामधील मोठमोठे वृक्ष आणि त्यावरील धनेशची घरटी, त्यांच्या पिलांचा चिवचिवाट तेथील वन विभागाच्या जैवविविधतेचा समृद्ध ठेवा होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर येथे मोठ्या प्रमाणावर वृक्ष तोड आणि त्याची नदी मार्गाने तस्करी झाली. धनेश पक्षी वृक्षांवीना अनाथ झाला, त्यांना मारणे सोपे झाले आणि हळूहळू हा सुंदर पक्षी अस्तंगत झाला.

नागालँडमधील वनखात्यातील स्त्री अधिकाऱ्यांनी या पक्ष्यांना वाचविण्याचा निर्धार केला. सर्व प्रथम त्यांनी स्थानिक आदिवासींना विश्‍वासात घेतले आणि त्यांच्या मदतीने हार्नबील संवर्धन आणि संरक्षण मोहीम सुरू केली आणि त्यात यश प्राप्त केले. आज राजधानी कोहिमामध्ये २००० पासून प्रतिवर्षी १ ते १० डिसेंबर दरम्यान Hornbill Festival साजरा होतो ज्यासाठी जगभरामधून हजारो पर्यटक येथे येतात. भारताचे राष्ट्रपती या उत्सवाच्या उद्‍घाटनास आवर्जून येतात.

नवी दिल्ली स्थित Indian Forest Service Association ने मार्च २०२१ मध्ये भारतीय वन विभाग सेवेमध्ये पर्यावरण, वन संरक्षण, जैव विविधता रक्षण आणि त्यास जोडलेल्या शेकडो आदिवासी जाती जमातीमध्ये सलोख्याचे कार्य करत प्रशंसनीय योगदान देणाऱ्या महिला वन अधिकाऱ्यांच्या कार्याचे गौरव करण्यासाठी “The Green Queens of India” हे सुरेख पुस्तक प्रसिद्ध केले आहे. यामध्ये भारतामधील २८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात उल्लेखनीय कार्य केलेल्या १०० च्यावर स्त्रिया आणि त्यांच्या वन क्षेत्रामधील बहुमोल कार्याचा सुरेख परिचय दिला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून वन परीक्षेस बसणाऱ्या सर्व महाराष्ट्रीय मुलींनी या पुस्तकाचे वाचन जरूर करावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT