Dragon Fruit Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Dragon Fruit Farming : ड्रॅगनफ्रूट पिकामध्ये सिलिकॉन, केओलिनचा वापर

Soil Health : सिलिकॉनचा वापर केल्याने नत्र, स्फुरद आणि पालाश अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. खतांवरील खर्चामध्ये बचत करता येते. उन्हाळ्यात जमिनीचे तापमान कमी होण्यास मदत होऊन जलधारणशक्ती वाढते.

Team Agrowon

डॉ. शिवाजी थोरात

उन्हाळ्यात ड्रॅगन फ्रूटवर सनबर्नचा परिणाम दिसतो. उन्हाळ्यात तापमान जेव्हा ३५ ते ४० अंश सेल्सिअसच्यावर जाते, त्या वेळी प्रखर सूर्यकिरणांमुळे पाने करपतात. याचा परिणाम कमी फुलधारणा, फळधारणा आणि प्रतीवर होतो. पूर्ण वाढलेल्या ड्रॅगनफ्रूटच्या प्रति झाडास नत्र ५४० ग्रॅम, स्फुरद ७२० ग्रॅम आणि पालाश ३०० ग्रॅम अशी मात्रा ३ ते ४ वेळा विभागून देण्याची शिफारस केली आहे. परंतु नत्र, स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणात विविध कारणांनी ऱ्हास होतो.

प्रति एकरी जमिनीतून माती परीक्षणानुसार ३०० ते ४०० किलो सिलिकॉनचा वापर केल्याने नत्र, स्फुरद आणि पालाश अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. खतांवरील खर्चामध्ये बचत करता येते. उन्हाळ्यात जमिनीचे तापमान कमी होण्यास मदत होऊन जलधारणशक्ती वाढते. जमीन भेगाळण्याचे प्रमाण कमी होऊन जमिनीतून होणारे पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन पाण्याची २० ते २५ टक्के बचत होते.

पानामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त झाल्यास उष्ण हवा व तीव्र सूर्यकिरण यामुळे पेशीद्रव्याचे तापमान वाढून पाने फुटून तो द्रव पृष्ठभागावर येतो. उष्णतेमुळे पाने करपू लागतात. प्रकाश संश्‍लेषण कमी झाल्यामुळे ती पिवळी पडून गळतात. झाड अशक्त बनते. यावर उपाय म्हणजे उन्हाळ्यात झाडांना कमी पाणी द्यावे.

उन्हाळ्याच्या काळात केओलिनचा वापर फार महत्त्वाचा आहे. १५ ते २० ग्रॅम केओलिन प्रतिलिटर पाण्यात मिसळून १० ते १५ दिवसांच्या अंतराने फवारणी केल्यास पानावर पांढऱ्या रंगाचा हलकासा थर तयार होतो. हा पांढरा रंग सूर्यकिरण पानामध्ये जाऊ न देता ती हवेत परावर्तित करतो. त्यामुळे पेशीद्रव्याचे तापमान हे बाह्यवातावरणातील तापमानापेक्षा ४ ते ६ अंश सेल्सिअसने कमी राहते.

प्रकाश संश्‍लेषण चालू राहिल्याने पाने हिरवीगार राहतात, झाड सशक्त राहते, फुले आणि फळे गळण्याचे प्रमाण कमी होते. झाडाचे आयुष्य वाढते. दर्जेदार उत्पादन मिळण्यास मदत होते. काही शेतकरी यासाठी चायना क्ले या घटकाचा वापर करतात, परंतु याचा दाट पांढरा थर पानांवर बसत असल्याने प्रकाश संश्‍लेषण क्रिया कमी होते.परिणामी, अन्न तयार करण्याची पानातील क्रिया मंदावून झाड अशक्त बनते.

हिवाळ्यात अतिथंडीपासून सिलिकॉनमुळे फळांचे रक्षण होते. कारण पेशीभोवती सिलिकॉनचे एकप्रकारचे संरक्षक कवच तयार होते. हे कवच थंडप्रवाह पेशींमध्ये जाऊन देत नाही. थंडीमुळे फळे तडकण्याचे प्रमाण कमी होते.

ड्रॅगनफ्रूट हे काटक झाड आहे. किडींचा फारसा प्रादुर्भाव यावर होत नाही. काही वेळा मिलीबग किडीचा प्रादुर्भाव दिसतो. परंतु या पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसतो. स्टेम रॉट रोगामुळे उत्पादन तसेच फळांच्या गुणवत्तेमध्ये घट होते. तसेच अँथ्रॅकनोज, ब्राउन स्पॉट रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. मलेशिया विद्यापीठातील शास्त्रज्ञ नुरुल फाजिहा यांनी केलेल्या प्रयोगानुसार ५ मिलि सिलिकॉन प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी केली असता स्टेमरॉटचा प्रादुर्भाव ४२.९३ टक्क्यांनी कमी झाला.

या फळपिकावर तीव्र कीटकनाशक किंवा बुरशीनाशकांचा वापर कमी करून सिलिकॉनचा वापर वाढवल्यास झाडांची रोगप्रतिकारक शक्ती वाढून अशा रसायनांचा वापर कमी होईल. फळांच्या औषधी गुणधर्मावर विपरीत परिणाम होणार नाही. तसेच या पिकासाठी जास्तीत जास्त सेंद्रिय घटकांचा वापर करणे फायदेशीर आहे.

इजिप्शियन शास्त्रज्ञ एच.एम.ए. अबो ओगेला यांनी केलेल्या प्रयोगानुसार केओलिनच्या वापराने सनबर्नचे प्रमाण १० ते ५० टक्क्यांनी कमी झाले तसेच पाने, फळांतील तापमानासह कमी होऊन उत्पादन वाढीबरोबरच फळांच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे. ड्रॅगनफ्रूट उत्पादकांनी सिलिकॉन आणि केओलिन वापराबाबतचे प्रयोग स्वतःच्या क्षेत्रावर घेणे आवश्यक आहे.

- डॉ. शिवाजी थोरात ९८५००८५८११

(लेखक इंटरनॅशनल सोसायटी फॉर सिलिकॉन इन ॲग्रिकल्चर, अमेरिका संस्थेचे सदस्य आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT