Vegetable
Vegetable Agrowon
ॲग्रो विशेष

सण-उत्सवांमुळे अन्नविविधतेची जपणूक

नीलिमा जोरवर

“का हो, तुमच्या गावची हरियाली कधी आहे?’’

“उद्याच ठरली, म्हणून तर जंगलात आलोय. सर्व सामान गोळा करायला.’’

बस्तर भागातील जंगलात फिरत असताना काही लोक आम्हाला भेटले. त्यांच्याकडे अनेक झाडांची पाने ते घेऊन निघाले होते. त्यात मोरासारखा पिसारा करून बांधलेली शतावरीची पाने मला ओळखता आली, बाकी त्यांच्या जंगलात असणाऱ्या काही रानभाज्या, काही औषधी वनस्पती इत्यादींची पाने ते घेऊन चालले होते.

धानाची रोपाई पूर्ण झाली, की आठ दिवसांतला कोणताही एक दिवस ठरवून ‘हरियाली’ सण सर्व गाव एकत्रित साजरा करते. या वेळी शेतीची सगळी अवजारे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. अंगमेहनतीच्या कामाने दमलेल्या शरीराला त्यामुळे थोडासा आनंद-उत्साह तर मिळतोच, शिवाय आपल्या जंगलात फिरल्यामुळे गावकऱ्याना जंगलात कोणत्या वनस्पती शिल्लक आहेत, कोणत्या नष्ट होत आहेत हेही समजते. नवीन पिढीला या वनस्पतींची माहिती मिळते. पूजेसाठी लागतात म्हणून त्यांचे संवर्धन केले जाते. असे अनेक फायदे या सणांतून होतात. वनस्पती, शेतातील पिके व भाज्या यांचा संबंध प्रत्येक सणामध्ये दिसून येतो.

अगदी जवळ येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवातील २१ भाज्या, २१ पत्री, २१ मोदक यांचा गणपतीला लागणारा नैवेद्य किंवा पुढे पितृपक्षात पितरांना लागणाऱ्या भाज्या व व्यंजनाचा ‘घास’ किंवा पुढे नवरात्रीत लागणाऱ्या ९-१६ धान्यांची बीजे हे सगळे निसर्ग व शेतीशी संबंधित आहे. पूजेसाठी लागणाऱ्या २१ पत्री परिसरातून जमा करणे अपेक्षित असते. हायस्कूलमध्ये असताना शाळेत गणपती बसवत असत. गणपतीसाठी लागणाऱ्या दूर्वा, आघाडा, डाळिंब, पेरू, सीताफळ असे सर्व सामान गोळा करत गावभर फिरत असू. खरं तर या पत्री जमा करताना परिसराची व तेथील वनस्पतींची माहिती मिळावी, हेच अपेक्षित असणार. हल्ली सर्व बाजारात विकत मिळते.

पत्रीबरोबर गणेशाला लागतो २१ भाज्यांचा नैवेद्य. अशा भाज्या एकत्र कापून ‘मिश्र भाज्या’ त्या दिवशी विकायला येतात. एरवी बाजारात कधीच न दिसणारा चाईचा मोहर, करटोले हेही त्यात असतात. या रानभाज्या यात समाविष्ट केल्यावरच २१ भाज्या पूर्ण होत असाव्यात. कडू, आंबट, तिखट, गोड, तुरट, खारट अशा सर्व चवींच्या भाज्या आपल्या आहारात नियमित सेवन कराव्यात याचाच हा संदेश.

जशी रानभाज्यांमध्ये विविधता आहे, तशी आपण ज्यांची शेती करतो अशा भाज्यांमध्ये देखील विविधता आपल्याकडे आढळते. उदाहरणार्थ, मेथीची भाजी घेतली तर त्यात लाल कोरची मेथी, लेकुरवाळी मेथी अशी निवड करता येते. भाजी खायला उत्तम असते. पालक भाजीत लाल शिरांची व दांड्याची पालक ही खायला चाविष्ट असते. गर्द हिरवी पाने असणारी व विशिष्ट वास येणारी शेपू खायला चविष्ट असते. या काळात अंबाडीची भाजी बाजारात येते. अंबाडीमध्ये हिरवी अंबाडी व लाल अंबाडी हे दोन प्रकार शेतात लावले जातात. आंबट चवीची ही भाजी कोणत्यातरी धान्यात भरड करून केल्यास तिचा आंबटपणा काहीसा कमी होतो. अजून एक आंबट चवीची भाजी म्हणजे आंबट चुका. काही भागांत याला आंबट पालक असेही म्हणतात. शेतात लावली जाणारी खुरासणी, राजगिरा या भाज्यादेखील याच काळात मिळतात. पालेभाज्यांची विविधता रानभाज्यांच्या तुलनेत खूपच कमी आहे. म्हणजे अगदीच पाच ते दहा टक्के.

अनेक फळभाज्या आपल्याकडे उपलब्ध होतात. दोडका, घोसाळे, कारले, काकडी, तोंडले, भोपळे, डांगर इ. हल्ली बाजारात जे बियाणे उपलब्ध असते, सगळीकडे तशाच आकारांच्या, रंगांच्या या फळभाज्या उपलब्ध होतात. दुधी भोपळा यात वरच्या क्रमाकाला येतो. एकच चव, रंग, आकार. तेच ते पाहून भोपळा खाण्याची इच्छा कमी व्हावी. खरं तर भोपळ्याचा मोठा वर्ग आहे आणि यात खूप विविधता देखील आहे. लांब २ ते ५ फूट उंचीचा मोठ्या बाटलीसारखा असणारा भोपळा, गोल चेंडूसारखा, टोकाला लांबट असणारा भोपळा, शंकूच्या आकाराचा, अंडाकृती असे कितीतरी प्रकार आढळतात. त्यांची चवही तितकीच खास. विशेष म्हणजे या दुधी भोपळ्याचा खायचा वापर संपला, की त्याचे आवरण कठीण लाकडासारखे बनते. मग याचा वापर पाणी ठेवण्यासाठी, बियाणे ठेवण्यासाठी किंवा संगीत वाद्य किंवा मासळी पकडण्यासाठीचे साधन बनवण्यासाठी होतो.

लाल भोपळा किंवा डांगर याचेही अनेक वाण उपलब्ध असत. गोल, लांबट, गर्द हिरवे, पोपटी, पिवळे, केशरी अशा अनेक रंगांत हे आढळतात. डांगर चवीला गोड असते तर चक्की व कोहळा गोड नसते पण त्यांची भाजी खूप चवदार लागते. दोडकासुद्धा अनेक चवींचा व आकारांचा असतो. त्या चवीचे वर्णन शब्दांत करणे अशक्य आहे. तीच गोष्ट कारल्याची आणि काकडीचीही.

वांगे ही सर्वदूर, सर्वकालीन महत्व असणारी भाजी. भाजून केलेल्या वांग्यांचे भरीत असो की भरलेल्या वांग्यांची भाजी. वांगे-बटाटा भाजी तर लग्न व इतर समारंभात असायलाच हवी. खानदेशी भरीत वांगे, तसेच सोलापूर-सांगली भागांतील पातळ आवरण असणारे हिरवे वांगे, काटेरी वांगे, गुलाबी वांगे हे काही प्रकार आपल्याला माहीत असतात. डहाणू-वसई भागात गेले तर विविध आकाराचे, विविध रंगांचे व चवीचे वांगे पाहायला मिळतात. यातील बहुतेक वाण पारंपरिकरीत्या शेतकऱ्यांनी सांभाळले आहेत. लांबट आकाराचे हिरवे-जांभळे वांगे किंवा पूर्णतः पांढऱ्या रंगाचे छोटे वांगे, जांभळे छोटे वांगे, हिरवे-गुलाबी गोल मोठे वांगे असे कितीतरी प्रकार आढळतात. पण हल्ली बाजारात वांगे बियाणे मिळतात. त्यामुळे विविध बियाणे सांभाळण्याची गरज उरत नाही.

फळभाज्यामध्ये मोठा वाटा येतो तो वेलवर्गीय भाज्यांचा. घेवडा, वालवड, चवळी यांच्या शेंगाची भाजी मोठ्या प्रमाणात केली जाते. या शेंगातून मोठ्या प्रमाणात प्रथिने मिळत असतात, शिवाय यांची चवदेखील उत्तम असते. घेवड्यामध्ये बुटका घेवडा, लांब बोंबील घेवडा, जांभळा फताड्या घेवडा, हिरवा फताड्या घेवडा, चपटी वालवड असे अनेक प्रकार आढळतात. चवळीमध्ये देखील काळी, लाल, हिरवी, पोपटी असे प्रकार असतात. शेतात मिश्रपीक घेताना कडेला हे पीक घेतले जाते. बरेचदा परसदारात जी छोटी वाडी केली जाते त्यात घेवडा, भोपळा, दोडका, कारली, वांगे अशा सर्वच भाज्या लावल्या जातात. अकोल्याच्या आठवडी बाजारात आजूबाजूच्या गावांतील शेतकरी या सर्व भाज्या विकायला आणतात. लाल कोरची मेथी, लाल शिरांचा पालक आणि घेवड्याचे तर जवळ जवळ १०-१२ प्रकार बाजारात विकायला येतात. शेतातला माल थेट शेतकरी बाजारात आणतो. त्यामुळे चार ठिकाणी चढ-उतार करताना झालेली हाताळणी कमी होते आणि भाज्या अगदी ताज्या उपलब्ध होतात. परंपरागत जपलेल्या देशी बियाण्यांची विविधता परिसरातील महिलांमुळे टिकून आहे. अकोल्याच्या प्रत्येक गावातील महिला घरचे बियाणे जपून ठेवतात. त्यामुळे आम्हा अकोलेकरांची भाज्यांची समृद्धी टिकून आहे. ही समृद्धी टिकून राहिली तर गणेशाला आपण २१ काय ५१ भाज्यांचा देखील नैवेद्य देऊ शकतो.

खाणे आणि जगणे याचा हा घनिष्ट संबंध अधोरेखित होतो तो सण-उत्सवात. सणांच्या परंपरा शरीराच्या आरोग्याशी संबंधित आहे तशाच त्या मानसिकतेशी देखील संबंधित आहेत. अन्न निर्मितीची प्रक्रिया म्हणजे शेती व निसर्ग. आपले सण-उत्सव हे शेतीशी संबंधित असल्यामुळे शेतातील त्या-त्या वेळी निघणाऱ्या पिकांचा नैवेद्य बनवला जातो. हल्ली बाजारात गणपतीच्या पूजेची पत्री, फळे व भाज्या मिळत आहेत. हा ‘रेडीमेड’ फंडा वापरण्यामुळे सणांचा मूळ उद्देश बाजूला जात आहे. शेतकरी कुटुंबात देखील बाजारात मिळणाऱ्या भाज्यांचाच आहारात समावेश वाढला आहे. त्यामुळे या पारंपरिक भाज्या, त्यांच्याशी निगडित असणारे ज्ञान कमी होत आहे. भविष्यात घरी लागणाऱ्या भाजीसाठी आम्हाला पैसे मोजावे लागणार आहे, ही वस्तुस्थिती आहे. शिवाय एखादा कीड-रोग आला तर परिसरातील सर्वच भाजी नष्ट होऊ शकते. आणि मोठ्या कमतरतेला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण होते. असे अनेक धोके ओळखून पूर्वजांनी या अन्नविविधतेचा संबंध उत्सवाशी जोडून ठेवला आहे. प्रत्येक शेतकऱ्याने थोडे थोडे पारंपरिक बियाणे सांभाळले तरी मोठे काम होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Seed : सोयाबीन बियाणे दरात कंपन्यांकडून मोठी वाढ

Loksabha Election : देशातील ९३ जागांसाठी मोठ्या उत्साहात मतदान

Onion Export Duty : कांदा निर्यात शुल्क गोंधळाने कंटेनर खोळंबले

Fertilizers Rate : दरवाढीच्या अफवेने खत उद्योग हैराण

Indian Spices : भारतीय मसाल्यांच्या बदनामीचे षडयंत्र

SCROLL FOR NEXT