Soybean Seed : सोयाबीन बियाणे दरात कंपन्यांकडून मोठी वाढ

Soybean Market : आगामी खरीप हंगामासाठी बियाण्यांची प्लेसमेंट, नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली असून, या वर्षी काही खासगी बियाणे कंपन्यांनी मागणी असलेल्या सोयाबीन बियाण्यांचे दर अव्वाच्या सव्वा वाढवले आहेत.
Soybean
SoybeanAgrowon

Akola News : आगामी खरीप हंगामासाठी बियाण्यांची प्लेसमेंट, नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली असून, या वर्षी काही खासगी बियाणे कंपन्यांनी मागणी असलेल्या सोयाबीन बियाण्यांचे दर अव्वाच्या सव्वा वाढवले आहेत. सोयाबीन बियाण्याचे होलसेल दरच भरमसाट वाढविल्याने आता विक्रेतेही साहजिकच शेतकऱ्यांना त्यापेक्षा अधिक दराने विक्री करणार हे निश्‍चित आहे. दुसरीकडे पारंपरिक सोयाबीन वाणांचे बियाणे जुन्याच दराने बाजारपेठेत दिसणार आहे.

पुढील महिन्यात खरीप हंगामाला सुरुवात होत असल्याने बाजारपेठेत अक्षय तृतीयेपासून उलाढाल सुरू होणार आहे. यासाठी विविध बियाणे कंपन्यांनी बुकिंग प्रक्रिया सुरू केलेली आहे. आता बियाण्यांचे दर बाहेर आले असून, याभागात एका कंपनीने २३ किलो वजनाच्या बॅगची किंमत तब्बल ४१५० रुपये काढली आहे. तर दुसरे एक वाण २५ किलो बॅगेमध्ये ३४५० रुपयांना होलसेल विकल्या जात आहे.

Soybean
Soybean Rate : हिंगोली, परभणी बाजार समित्यांत सोयाबीन दर कमी

गेल्या हंगामात प्रचंड मागणी झालेल्या मध्य प्रदेशातील एका बियाणे कंपनीच्या वाणाची किंमत यंदा किलोला २०० रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. तसेच या नावाजलेल्या वाणासोबत त्याच कंपनीचे कीडनाशक घेण्याची सक्ती केली जात आहे. जो विक्रेता कीडनाशक विकेल त्यालाच हा वाण पुरवल्या जातो. मागील हंगामाच्या तुलनेत सोयाबीनच्या एका बॅगेमागे ३०० ते ६०० रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. तर पारंपरिक ३३५ आणि ९३०५ या वाणांना मागणी कमी राहत असल्याने दरही वाढलेले नाहीत आणि फारशी विचारणाही केल्या जात नसल्याची वस्तुस्थिती बाजारपेठेत आहे.

बियाणे कंपन्यांनी काही हंगामापासून शक्कल लढवत गावोगावी थेट प्रतिनिधी पाठवून मार्केटिंग सुरू केली. तरुणांच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संपर्क साधून बुकिंग व पुरवठा केल्या जात आहे. मागील हंगामातही अशाच पद्धतीने हजारो पाकिटांचा थेट शेतकऱ्यांना पुरवठा करण्यात आला होता. या व्यवहारात शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारची पावती दिल्या जात नाही.

Soybean
Soybean Rate : हिंगोली, परभणी बाजार समित्यांत सोयाबीन दर कमी

हे वाण तणनाशकाला अनुकूल असल्याने शेतकरीसुद्धा निंदणाचा खर्च वाचतो या कारणाने पसंती देतात. सध्या गावोगावी अशा बुकिंग प्रतिनिधींचा सुळसुळाट झालेला असून, राउंडअप बीटीच्या नावाखाली मोठा गोरखधंदा सुरू झालेला आहे. या मार्केटिंगवर गुणवत्ता नियंत्रण विभागाचे कुठलेही नियंत्रण नसल्याचेही स्पष्ट झालेले आहे. सातपुड्याला लागून असलेल्या बुलडाणा, अकोला जिल्ह्यांतील विविध तालुक्यांत सर्रास अशी बीटी कपाशी बियाण्याची विक्री होत असल्याची चर्चा आहे.

सोयाबीनचा दर मात्र वाढेना

सोयाबीनला दहा वर्षांपूर्वी मिळणारा दरच आज बाजारपेठांमध्ये मिळतो आहे. सोयाबीन सरासरी ४४०० रुपयांच्या आतच विकत आहे. वर्षभर असाच दर मिळत आलेला नाही. गेल्या हंगामात पाऊस, येलो मोझॅक, खोडकिडीच्या कारणाने सोयाबीनचे उत्पादनही घटले. तरीही दर वाढलेले नाहीत. मात्र, बियाणे कंपन्यांनी सोयाबीनच्या दरांना यंदा मोठी ‘फोडणी’ दिल्याचे दरांवरून स्पष्ट झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com