Fertilizers Rate : दरवाढीच्या अफवेने खत उद्योग हैराण

Fertilizers Market Update : निवडणुकांच्या रणधुमाळीत भडकलेल्या चर्चांना अजून फोडणी देण्यासाठी रासायनिक खतांच्या दरवाढीची जोरदार अफवा राज्यभर पसरली आहे. त्यामुळे हैराण झालेल्या खत उद्योगाने दरवाढ झाली नसल्याचा स्पष्ट निर्वाळा दिला आहे.
Fertilizers
FertilizersAgrowon
Published on
Updated on

Pune News : निवडणुकांच्या रणधुमाळीत भडकलेल्या चर्चांना अजून फोडणी देण्यासाठी रासायनिक खतांच्या दरवाढीची जोरदार अफवा राज्यभर पसरली आहे. त्यामुळे हैराण झालेल्या खत उद्योगाने दरवाढ झाली नसल्याचा स्पष्ट निर्वाळा दिला आहे; तर शेतकऱ्यांकडून जादा दर घेतल्यास कडक कारवाईचा इशारा कृषी खात्याने दिला आहे.

निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर सध्या घमासान चर्चा होते आहे. कृषी निविष्ठांवरील खर्च वाढल्याचाही मुद्दा समूह माध्यमांवर सतत उपस्थित होतो आहे. त्याचे निमित्त साधत ‘ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर खते महागली आहेत’ अशी जोरदार अफवा सोमवारी (ता. ६) राज्यभर पसरली होती. विशेष म्हणजे काही वृत्तवाहिन्यांनी ही अफवा खरी समजून खत दरवाढीच्या बातम्या प्रसारित केल्या.

Fertilizers
Agriculture Fertilizers : खरिपासाठी १ लाख २३ हजार ३०० टन खते मंजूर

त्यामुळे राज्यभर गोंधळ उडाला. या बातम्यांमध्ये १०:२६:२६ खताच्या ५० किलोच्या गोणीचे दर १४७० रुपयांऐवजी १७०० रुपये, २४:२४:०:० श्रेणीचे दर १५५० रुपयांऐवजी १७०० रुपये २०:२०:०:० ची किंमत १२५० रुपयांऐवजी १४५० रुपये तर सिंगल सुपर फॉस्फेटच्या किमतीत ५०० रुपयांवरून ६०० रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे चुकीचे सांगण्यात आले. या बातम्यांना खरे मानत काही भागात विक्रेत्यांनी अडवणूकदेखील सुरू केल्याचे गुणनियंत्रण विभागाच्या एका तंत्र अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, कृषी आयुक्तालयात खत दरवाढीची अफवा धडकताच स्वतः गुणनियंत्रण संचालक विकास पाटील यांनी खत उद्योगातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यात कोणतीही दरवाढ झालेली नसून उलट आरसीएफ कंपनीच्या एका श्रेणीची किंमत कमी झाल्याचे आयुक्तालयाच्या निदर्शनास आले.

आरसीएफ कंपनीचे उपमहाव्यवस्थापक भगवानसिंह चौहान यांनी दिलेल्या लेखी पत्रात खतांचे दर नमूद केले. त्यात आरसीएफ युरियाची कमाल किरकोळ किंमत (एमआरपी) २६६.५० रुपये (४५ किलो गोणीसाठी) तर ५० किलोची सुफला १५:१५:१५ ची किंमत १४७० रुपये, १०:२६:२६ ची किंमत १०७० रुपये; तर डीएपीची किंमत १३५० रुपये अशी नेहमीप्रमाणेच स्थिर असल्याचे कळविण्यात आले.

Fertilizers
Agriculture Fertilizer : शेतकऱ्यांनी युरियाचा अनावश्यक वापर टाळावा

निवडणुकीच्या वातावरणाची संधी साधत खत दरवाढीची अफवा पसरवली गेली असू शकते, असे ‘फर्टिलायझर्स असोसिएशन ऑफ इंडिया’च्या सूत्रांनी सांगितले. ‘‘राज्यात कोणत्याही कंपनीने खतांची दरवाढ केलेली नाही. शहरालगतच्या शेतकऱ्यांना ही अफवा असल्याचे पटले आहे; परंतु दुर्गम व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या अफवेचा फटका बसू शकतो.

मुळात, केंद्र शासनाने अन्नद्रव्य आधारित अनुदान (एनबीएस) अलीकडेच जाहीर केले आहे. त्यानुसार खत निर्मिती कंपन्या आपापल्या उत्पादनाचा निर्मिती खर्च आणि किमतीचे पुढील किमान सहा महिन्यांचे नियोजन करीत आहे. त्यामुळे मध्येच खताची दरवाढ होण्याचा प्रश्‍न उद्‍भवत नाही,’’ असे असोसिएशनच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

‘‘आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या कच्च्या मालाचे दर अचानक वाढल्यास कंपन्यांना खतांच्या किमतीचा आढावा घ्यावा लागतो. मात्र त्यासाठी देखील केंद्राची परवानगी घ्यावी लागते. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या मालाबाबत मोठे बदल झालेले नाहीत. त्यामुळे सध्या खतांच्या किमती स्थिर आहेत,’’ असेही असोसिएशनच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

उलट दर कमी झाले

‘आरसीएफ’च्या सूत्रांनी सांगितले, की संयुक्त खतांच्या दरात वाढ झालेली नाही. उलट २०:२०:०:१३ खताची नव्या पुरवठ्याची किंमत १३०० रुपयांऐवजी १२५० रुपये झाली आहे. त्यामुळे या श्रेणीचे नवे खत शेतकऱ्यांना प्रतिगोणी ५० रुपये कमी दराने मिळणार आहे.

खत उद्योगाकडून आम्ही खात्री केली आहे. रासायनिक खतांच्या किमती वाढलेल्या नाहीत. विक्रेत्यांनी अफवांवर विश्‍वास ठेवू नये. ‘एमआरपी’पेक्षा जास्त दराने विक्री होत असल्यास कारवाई केली जाईल.
विकास पाटील, कृषी संचालक, निविष्ठा व गुणनियंत्रण

खताच्या श्रेणी (ग्रेड)निहाय स्थिर

किमती अशा (सर्व दर ५० किलो गोणीचे)

युरिया २६६.५० रुपये (४५ किलो)

डीएपी १८:४६:०:० १३५० रुपये

एमओपी ०:०:६०:० १६५५ ते १७०० रुपये

एनपी २४:२४:०:० १५०० ते १७०० रुपये

एनपीएस २४:२४:०:०८ १६०० रुपये

एनपीएस २०:२०:०:१३ १२०० ते १४०० रुपये

एनपीके १९:१९:१९ १६५० रुपये

एनपीके १०:२६:२६:० १४७० रुपये

एनपीके १२:३२:१६ १४७० रुपये

एनपीके १४:३५:१४ १७०० रुपये

एनपी १४:२८:० १७०० रुपये

एनपी २०:२०:०:० १३०० रुपये

एनपीके १५:१५:१५ १४७० रुपये

एनपीएस १६:२०:०:१३ ११५० ते १४७० रुपये

एनपीके १६:१६:१६:० १३७५ रुपये

एनपी २८:२८:०:० १७०० रुपये

एएस २०.५:०:०:२३ १००० रुपये

एनपीकेएस १५:१५:१५:०९ १४५० ते १४७० रुपये

एनपीके १७:१७:१७ १२१० रुपये

एनपीके ०८:२१:२१ (४० कि.) १८०० रुपये

एनपीके ०९:२४:२४ (४० कि.) १९००

एसएसपी (दाणेदार) ०: १६:०:११ ५३० ते ५९० रुपये

एसएसपी (भुकटी) ०: १६:०:१२ ४९० ते ५५० रुपये

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com