Monsoon
Monsoon Agrowon
ॲग्रो विशेष

प्रेमाचा ओलावा अन् मायेची ऊब

टीम ॲग्रोवन

उन्हाळ्यात एखाद्या शेतातली पायवाट नांगरणी केल्यामुळे मोडून जाते. नांगरलेल्या काळ्याभोर जमिनीतल्या लोखंडासारख्या कडक आणि चिवट ढेकळातून तोल सांभाळीत आपल्याला मार्ग काढावा लागतो. काही ढेकळे इतकी अनिवार असतात की कित्येकदा पायाला खरचटते. अगदी सहजच ‘आई ग’ असे आपण उद्गारतो. आयुष्यात येणाऱ्या संकटांशी मुकाबला करण्यासाठी आपले बाळ सक्षम व्हावे म्हणून आई प्रसंगी कठोर होत असते. त्याप्रमाणे उन्हाळ्यात माती ढेकळाच्या रूपाने कठोर होऊन जणू आपली परीक्षा घेत असते. (Agrowon Mashagat Article)

ऋतुचक्रात उन्हाळ्यानंतर पावसाळा येणार या आशेवर उन्हाच्या तडाख्याने तावून निघालेली सृष्टी दरवर्षी पावसाची आतुरतेने वाट बघतच असते. वाट बघता बघता अचानक एक दिवस पाऊस येतोच आणि त्याच्या वर्षावात सगळी सृष्टी न्हाऊन निघते. एका घडीत सगळे चित्र पालटून जाते. लोखंडासारखी अनिवार ढेकळे लोण्यासारखी मऊशार होतात. पावसामुळे ओल्या उबदार गादीसारख्या झालेल्या शेतात अनवाणी चालतानाचे सुख अवर्णनीय असते. कितीही कठीण कवचाचे बियाणे असले तरीही ते या मायेच्या स्पर्शाने मृदू होऊन अंकुरित होते. कारण त्या मातीत प्रेमाचा ओलावा आणि मायेची ऊब असते.

लहानपणी आईबरोबर मी शेतात जायचो. आईची खुरपणी चालू असायची आणि माझे मातीतले खेळ. अचानक जोराची सर आली की मी पळत पळत जाऊन आईच्या कुशीत बिलगून बसायचो. कधी कधी पाऊस इतका जोराचा येई की, आईच्या अंगावरचे पोते गळायला लागायचे आणि आई चिंब भिजून जायची पण आपल्या बाळाला घट्ट कुशीत घेऊन पावसाचा एकही थेंब लागू नये म्हणून ती आटोकाट प्रयत्न करायची. हीच मायेची ऊब आणि प्रेमाचा ओलावा प्रत्येक आईने त्या मातीतून अगदी जसाच्या तसा घेतलेला असतो. म्हणूनच त्या मातीला आपण काळी आई म्हणतो.

बीजाला अंकुरित करणारी आई, रोपांचे पोषण करून त्याचे वृक्षात रूपांतर करणारी आई. माती आईचे रूप, आपण आईचे स्वरूप मग आपल्यापासून माती वेगळी कशी असेल? मातीने आणि मातेने दिलेला प्रेमाचा ओलावा आणि मायेची ऊब न विसरता यातून उतराई होण्याचा प्रयत्न करणे म्हणजे माऊली स्वरूप होणे. जगावर आईप्रमाणे प्रेमाचा वर्षाव करणारी माणसे संतपदाला पोहोचतात. म्हणूनच पायी वारीत चालणारे वारकरी एकमेकांना प्रेमाने 'माऊली' या नावाने हाक मारत असतात. आयुष्यरुपी अखंड वारीचे आपण वारकरी आहोत. आयुष्यात सर्वांभूती प्रेमाचा ओलावा आणि मायेची ऊब निर्माण झाली तर, जग आनंदाच्या हिरवळीने बहरून जाईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

SCROLL FOR NEXT