Land Management Agrowon
ॲग्रो विशेष

Land Management : जमिनीच्या आरोग्यासाठी हंगामपूर्व तयारीचे नियोजन कसे करावे?

Team Agrowon

डॉ. शुभम दुरगुडे, डॉ. अनिल दुरगुडे, डॉ. संतोष काळे

Indian Agriculture : गेल्या दोन-तीन वर्षांत पाऊसमान अनियमित होत आहे. कमी पावसाच्या काळात पडणाऱ्या पावसाचे पाणी अडविणे आणि मुरविणे ही काळाची गरज आहे. त्याच सोबत अधिक पावसामध्ये पाण्याबरोबर माती आणि त्यातील अन्नद्रव्ये वाहून जातात. वास्तविक एक इंच मातीचा थर तयार होण्यास १०० वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागतो.

मातीच्या वरील सुपीक थरात पिकास लागणारी अन्नद्रव्ये, सेंद्रिय कर्बाचे व सूक्ष्म जिवाणूंचे प्रमाण अधिक असते. असा सुपीक १ इंच मातीचा थर पाण्याबरोबर वाहून गेल्यास ती बाब पिकांसाठी नुकसानकारक ठरते. तर दुसरीकडे वाहून गेलेली माती तलावात साठल्याने पाणी साठवण क्षमता कमी होते.

या बाबी टाळण्यासाठी उन्हाळ्यामध्ये बांध बंदिस्तीचे नियोजन प्रत्येक शेतकऱ्याने केले पाहिजे. त्यात पावसाचे अधिक पाणी मुरविण्यासाठी बांधबंदिस्ती करणे, ढाळीचे बांध घालणे, विहीर पुनर्भरण करणे, जमीन सपाटीकरण करणे, समपातळी मशागत, दगडी बंधारे, गॅबियन बंधारे, शेततळी तसेच नादुरुस्त नाली बांधून दगडाने पिचिंग करणे, आवश्यक तिथे जादा पाणी निघून जाण्यासाठी चर खोदावेत.

चराच्या बाजूने दगड लावून वरच्या बाजूला गवताची लागवड करावी. त्यामुळे माती वाहून जाण्यास प्रतिबंध होईल. या बाबी शेतकऱ्यांनी निदान कोरडवाहू क्षेत्रात तरी मोठ्या प्रमाणात व सामूहिकरीत्या कराव्यात.

सुपीकतेसाठी गाळाचा वापर

गावातील तलाव उन्हाळ्यात कोरडे पडले असल्यास तलावाची पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी त्यातील गाळ काढून घ्यावा. त्या आधी त्याचे माती परीक्षण करून घ्यावे. हा गाळ माळरान, बरड जमिनी किंवा फळबाग लागवडीसाठी केलेल्या खड्ड्यांमध्ये टाकावा.

यासाठी लोकसहभागातून महात्मा फुले जल अभियान राबवले जात आहे. त्याविषयी अधिक माहिती मिळवावी. तलावातील गाळ हा शक्यतो सुपीक व पिकांच्या वाढीसाठी चांगला असतो. तरिही प्रथम या गाळाचे माती परीक्षण करून त्याचे गुणधर्म पुढील प्रमाणे असल्याची खात्री करावी.

-या गाळाचा सामू ६.५ ते ७.५ पर्यंत असावा.

-विद्युतवाहकता म्हणजे क्षारता ०.२५ डेसीसायमन प्रति मीटरपेक्षा कमी असावी.

-मुक्त चुनखडीचे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा कमी असावे.

गाव तळे तयार करावे

गावपातळीवर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पाणलोट क्षेत्रातील खोलगट भागात मोठे शेततळे खोदून घ्यावे. त्यात पाणलोट क्षेत्रातील वाहून आलेले पाणी साठवावे. त्यामुळे परिसरातील भूजलामध्ये वाढ होऊन विहीर, कूपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ होईल.

जमिनीची सुधारणा

सिंचन क्षेत्रातील जमिनीची उन्हाळ्यापूर्वी नांगरट करून चांगली तापवून घ्यावी. जमिनीतील माती परीक्षण करून घ्यावे. माती परीक्षणानुसार जमिनीचे आरोग्य बिघडलेले असल्यास उन्हाळ्यामध्ये आवश्यक रासायनिक व सेंद्रिय भूसुधारके टाकून त्या सुधारून घ्याव्यात.

माती परीक्षण न करता ढोबळमानाने जमिनीत जिप्सम, लाइम, मळी कंपोस्ट, आसवणीतील सांडपाणी, गंधक इ. टाकू नये. अंदाजे केलेल्या उपाययोजनांमुळे जमिनीचे आरोग्य सुधारण्याऐवजी बिघडण्याचाच धोका असतो. खालीलप्रमाणे जमिनीच्या प्रकारानुसार उन्हाळ्यात सुधारणा कराव्यात.

१) जमीन क्षारयुक्त असल्यास (सामू ८.५ पेक्षा कमी, क्षारता १.५ डेसिसायमन प्रति मीटरपेक्षा जास्त) भूमिगत निचरा प्रणालीची व्यवस्था करावा लागते. त्यासाठी योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ती कामे करून घ्यावीत. त्याद्वारे अतिरिक्त पाण्याचा व क्षारांचा निचरा होईल. मात्र या जमिनीत मळी कंपोस्ट, आसवणीतील सांडपाणी, गंधक टाकू नये.

खरीप हंगामात धैंचा किंवा ताग लागवड करून तो फुलोऱ्यात असताना गाडावा. मगच पुढील पिकाचे नियोजन करावे. माती परीक्षणानुसार संतुलित अन्नद्रव्ये पिकांना द्यावीत.

२) जमीन क्षारयुक्त चोपण असल्यास (सामू ८.५ पेक्षा जास्त, क्षारता १.५ डेसिसायमन प्रति मीटरपेक्षा जास्त) भूमिगत निचरा प्रणालीची व्यवस्था करावी लागते. त्यासाठी योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ती कामे करून घ्यावीत. त्यामुळे अतिरिक्त पाण्याचा व क्षारांचा निचरा करावा. या जमिनीत मळी कंपोस्ट, आसवणीतील सांडपाणी, गंधक टाकू नये.

माती परीक्षणातून मिळालेल्या प्रमाणानुसार जिप्समची योग्य मात्रा शेणखतासोबत जमिनीत मिसळावी. या जमिनीमध्ये क्षार प्रतिकारक पिकांची निवड करावी.

३) जमीन चोपण असल्यास (सामू ८.५ पेक्षा जास्त, क्षारता १.५ डेसिसायमन प्रति मीटरपेक्षा कमी) भूमिगत निचरा प्रणालीची व्यवस्था करावी. माती परीक्षणानुसार जमिनीत जिप्सम शेणखतासोबत मिसळून टाकावे. चोपण जमीन चुनखडीयुक्त असल्यास गंधक शेणखतात मिसळून वापर करावा.

जमिनीतील मातीमध्ये विनिमय सोडिअमच्या प्रमाणावरून जिप्सम किंवा गंधक भूसुधारकाची मात्रा ठरविण्यासाठी तक्ता १ उपयोगी ठरेल. या जमिनीत पाच वर्षांतून एक वेळा उन्हाळ्यामध्ये पेरणीपूर्वी किमान एक महिना आधी आसवणीतील सांडपाणी हेक्टरी ७५ ते ८० हजार लिटर जमिनीवर पसरावे.

त्यानंतर नांगरणी, कुळवणीसारख्या मशागती कराव्यात. त्याचप्रमाणे दोन ते तीन वर्षांतून एक वेळा मळी कंपोस्टचाही उन्हाळ्यात नांगरटीपूर्वी हेक्टरी ८ ते १० टन या प्रमाणात वापर करावा. नंतर ते जमिनीत चांगले मिसळावे. पावसाळ्यात धैंचा लावून तो गाडावा. उन्हाळ्यात क्षार प्रतिकारक पिकांचे नियोजन करावे.

चोपण जमीन सुधारण्यासाठी जमिनीतील विनिमय सोडिअमच्या प्रमाणावरून जिप्सम/गंधक भूसुधारकांची मात्रा ठरवणे.

विनिमय सोडियम (मिलिग्रॅम/१०० ग्रॅम माती) --- जिप्सम (टन/हे) --- गंधक (टन/हे)

१ --- २.१२ --- ०.४०

२ --- ४.२५ --- ०.८०

३ --- ६.५० --- १.२०

४ --- ८.६२ --- १.६०

५ --- १०.७५ --- २.००

६ --- १२.८७ --- २.४०

७ --- १५.०० --- २.८०

८ --- १७.१२ --- ३.२०

९ --- १९.३७ --- ३.६०

१० --- २१.५० --- ४.००

४) जमीन चुनखडीयुक्त असल्यास (मुक्त चुनखडीचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त) उन्हाळ्यात तीन वर्षांतून एकदा आसवणीतील सांडपाणी हेक्टरी ८० हजार लिटर जमिनीवर पसरावे. नंतर मशागती कराव्यात.

या जमिनीची घडण मऊ होण्यासाठी व पाणी धरून ठेवण्यासाठी मळी कंपोस्ट हेक्टरी ८ ते १० टन जमिनीत चांगले पेरणीपूर्वी एक महिना अगोदर मिसळावे. त्याचप्रमाणे हिरवळीच्या खतांचा तीन ते चार वर्षांतून एकदा वापर करावा. चुनखडी सहन करणाऱ्या पिकांची लागवड करावी. उदा. सोयाबीन, गहू, तूर, भुईमूग, पपई, आवळा इ.

५) जमीन चांगली असल्यास (सामू ६.५ ते ८.०, क्षारता ०.४० डेसिसायमन / मीटरपेक्षा कमी, मुक्त चुनखडीचे प्रमाण १ ते ५ टक्के, सेंद्रिय कर्ब - ०.६ टक्क्यापेक्षा जास्त व उत्तम निचरा) तिचे आरोग्य नियमित चांगले ठेवण्यासाठी पुढील उपाययोजनांवर भर द्यावा.

जमीन उन्हाळ्यात चांगली नांगरट करून तापवावी व नंतर मशागती कराव्यात. फेरपालटीत कडधान्य पिकांचा समावेशाचे नियोजन करावे.

शेणखताची दरवर्षी शिफारस खतमात्रा द्यावी. शेणखताचे ढीग उन्हाळ्यात शेतात न ठेवता पेरणीपूर्वी एक महिना अगोदर शेवटच्या कुळवणी अगोदर शेतात मिसळून टाकावे. उघड्यावर ढीग करून ठेवल्यास त्यातील नत्र व कर्बाचाही ऱ्हास होतो. सूक्ष्मजीवांची संख्या कमी होते.

पाणी व्यवस्थापनाचे योग्य नियोजन करावे.

- माती परीक्षणानुसार रासायनिक खतांचा संतुलित वापराचे नियोजन करून खते विकत घेऊन ठेवावीत.

- सूक्ष्म अन्नद्रव्याचा कमतरतेनुसार वापर ओळखून सूक्ष्म अन्नद्रव्येयुक्त खते खरेदी करून ठेवावेत.

- जिवाणू खते किंवा बुरशीनाशके यांचा बीजप्रक्रियेद्वारे अथवा शेणखताबरोबर वापराचे नियोजन करावे. म्हणजे मर रोगांचे प्रमाण कमी होऊन उगवण क्षमता वाढते.

संपर्क - डॉ. शुभम दुरगुडे, ९०२१५९०१५०, डॉ. अनिल दुरगुडे, ९४२०००७७३१

डॉ. शुभम दुरगुडे हे खासगी कंपनीमध्ये मृदाशास्रज्ञ आहेत, तर डॉ. अनिल दुरगुडे व डॉ. संतोष काळे, मृद्‍ विज्ञान विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT