Rabbi Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Rabbi Crop : जिरायतेत रब्बी पिकांत टिकवली प्रयोगशीलता

Rabbi Season : नगर जिल्ह्यातील कणगर (ता. राहुरी) हा जिरायती भाग आहे. मात्र येथील प्रवीण गाढे यांनी कृषी विद्यापीठांचे सुधारित वाण, तंत्रज्ञान व व्यवस्थापन यांचा वापर करून प्रतिकूलतेतही हरभरा, गहू यांची उत्पादकता वाढविली आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

सूर्यकांत नेटके

Rabbi Crop Production : नगर जिल्ह्यातील कणगर (ता. राहुरी) हा जिरायती भाग आहे. मात्र येथील प्रवीण गाढे यांनी कृषी विद्यापीठांचे सुधारित वाण, तंत्रज्ञान व व्यवस्थापन यांचा वापर करून प्रतिकूलतेतही हरभरा, गहू यांची उत्पादकता वाढविली आहे. या भागातील चाराटंचाई लक्षात घेता मक्याची लागवड करून
मुरघास निर्मितीतून त्यांनी चाऱ्यामध्ये स्वयंपूर्णता साधली आहे.
.
नगर जिल्ह्यात राहुरी तालुक्यातील कणगर परिसरात शेतीसाठी तसे फारसे पाणी उपलब्ध नाही. पावसावरच बहुतांश शेती अवलंबून असते. गावातील रावसाहेब भागवत गाढे सहकारी साखर कारखान्यातील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. त्यांना आदिनाथ व प्रवीण ही मुले. वडिलोपार्जित
११ एकर शेती. प्रवीण एमएपर्यंत, तर आदिनाथ दहावीपर्यंत शिकलेले. दोघे शेतीच करतात.
प्रवीण यांनी जिरायततेतही शेतीत प्रयोगशीलता जपली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील
सुधारित वाण, व्यवस्थापन व तंत्रज्ञान यांचा वापर करून त्यांनी हरभरा, गहू आदी पिकांची
उत्पादकता वाढवली आहे.

हरभरा पिकातील कुशलता

प्रवीण यांच्याकडे पूर्वी पारंपरिक वाण व पद्धतीचा वापर व्हायचा. अलीकडील वर्षांत फुले दिग्विजय, फुले विजय, फुले विक्रांत यांसारख्या वाणांचा वापर सुरू केला. त्यातही फुले विक्रम वाणाचा वापर सर्वाधिक होतो आहे. मर रोग व मूळकुज या रोगांना हा वाण कमी प्रमाणात बळी पडतो. तसेच ‘हार्वेस्टर’चा वापर करण्यासाठी देखील हा वाण अनुकूल असल्याचे प्रवीण सांगतात. दरवर्षी दोन ओळींत नऊ इंच व दोन झाडांमध्ये चार ते सहा इंच अंतराने लावण होते.

मागील वर्षी ट्रॅक्टरचलित बीबीएफ यंत्राचा वापर करून दोन ओळींत १८ इंच अंतर ठेवून लागवड केली. यात दोन झाडांमधील अंतर वाढविल्याचा फायदा मिळतो. हवा खेळती राहते. फुटवे अधिक येतात. घाटे आळीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून मागील वर्षी कामगंध सापळे उपलब्ध झाले. त्यांचा एकरी सात ते आठ या प्रमाणात वापर केला. हरभऱ्यात ज्वारी घेतल्याने पक्षिथांबे तयार झाले. त्यातून घाटे अळीला अटकाव होऊन फवारण्यांची संख्या कमी झाली. पावसाची ओल तसेच पुढे तुषार पद्धतीने दोन असे तीन वेळा सिंचन केले जाते.

उत्पादन, उत्पन्न

पूर्वी एकरी पाच- सहा क्विंटल उत्पादन मिळायचे. आता १० ते ११ क्विंटलपर्यंत ही उत्पादकता पोहोचली आहे. अलीकडील वर्षांत ४८०० ते ५५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. पाच एकरांतून सुमारे दीड लाख ते त्याहून अधिक उत्पन्न जिरायती वातावरणात हाती येत आहे याचे प्रवीण यांना समाधान आहे.

हरभऱ्यापासून मिळणाऱ्या भुश्‍शाचा चाऱ्यासाठी वापर होतो. हरभरा काढणीनंतर उन्हाळ्यात रानाला पूर्ण विश्रांती दिली जाते. त्यानंतर त्यात खरिपात सोयाबीन घेण्यात येते. दोन्ही पिकांमुळे नत्र स्थिरीकरणाचा फायदा मिळतो. मागील वर्षी संगम वाण बीबीएफ तंत्राद्वारे घेतले. त्याचे एकरी १७ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. दरवर्षीची गाढे त्यांची या पिकातील सरासरी एकरी १० ते १२ क्विंटल दरम्यान आहे.


गव्हाचेही भरघोस उत्पादन

गाढे सांगतात, की गव्हाचा फुले समाधान वाण खाण्यास रुचकर असून, त्याचे एकरी १२ ते १५ क्विंटलपर्यंत आम्हाला उत्पादन मिळते. पूर्वी पारंपरिक पद्धतीने नऊ इंचाच्या तिफणीने दुहेरी (आडवी व उभी) पेरणी व्हायची. त्यातून पिकाची वाढ व दाण्याचा आकार समाधानकारक नव्हता. आता एकेरी पद्धतीने पेरणी होते.

त्यातून बियाण्यांची बचत होते. दोन ओळी व झाडांतील अंतर अधिक राहिल्याने हवा खेळती राहतो. त्यातून उत्पादन वाढ झाली आहे. गव्हाची सर्व विक्री थेट ग्राहकांना ३० रुपये प्रति किलो दराने होते. पंधरा ते २० नेहमीचे ग्राहक असून, प्रत्येकाची तीन ते चार क्विंटलनुसार मागणी असते.

ज्वारी व मुरघासासाठी मका

गेल्या वर्षी बीबीएफ पद्धतीने दोन एकरांवर ज्वारी घेतली. उत्पादनासह कडबाही चांगला मिळाला. दोन ओळींत १८ इंच अंतर व ट्रॅक्टरचलित टोकण यंत्राचा वापर करून मका घेण्यात येतो. या भागात पाण्याची टंचाई असल्याने उन्हाळ्यात शाश्‍वत चारा म्हणून मक्याचा वापर होतो. दरवर्षी ३० ते ४० टन मुरघास तयार केला जातो.

शेतकरी प्रथम प्रकल्पात निवड (सब इन्फो)

महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून सहा वर्षापासून ‘शेतकरी प्रथम प्रकल्प’ राबवला जात आहे. विद्यापीठाने विकसित केलेले विविध वाणांचा प्रसार, शेतकऱ्यांना मार्गदर्शन व फायदा त्याद्वारे होतो. प्रयोगशीलता पाहून या प्रकल्पात प्रवीण यांची निवड झाली आहे.

पूरक व्यवसायांची जोड (सब इन्फो)

सध्या कुटुंबाकडे आठ गायी आहेत. सुमारे ४५ ते ५० लिटरपर्यंत दूध संकलन होते.
अलीकडील वर्षांत कृषी विद्यापीठाने कावेरी, ग्रामप्रिया वाणांच्या शंभर कोंबड्याची पिले देऊन प्रवीण यांना कुक्कुटपालनासाठी प्रेरणा दिली होती.

कोरोना काळात देशी कोंबड्याचे चिकन ४५० रुपये प्रति किलो दराने विकून चांगला फायदा मिळवला. मध्यंतरी सर्व कोंबड्यांची विक्री केली होती. आता पुन्हा कोंबडीपालन सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हरभरा ठरतोय फायदेशीर

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कडधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. एस. एन. कुटे म्हणाले, की राज्यात रब्बीतील ८० टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. रब्बीतील प्रमुख पीक हरभऱ्याची आता ३० लाख हेक्टरपर्यंत लागवड होत आहे. आमच्या विद्यापीठाने फुले दिग्विजय, फुले विजय, फुले विश्‍वराज यांसारखे सुधारित वाण विकसित केले आहेत.

सन २०१९ मध्ये फुले विक्रम हा यांत्रिकी पद्धतीने काढणी करता येणारा वाण विकसित केला आहे. हरभऱ्याला हमीदर आहे. शाश्‍वत पाण्यातून तीस टक्के उत्पादन वाढू शकते. तसेच सुधारित वाणांमुळेही उत्पादनवाढीस मोठे बळ मिळते. अशा अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांचा कल हरभऱ्याकडे आहे.

संपर्क ः विजय गाढे, ९७३०२०८२७३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT