डॉ. दत्तात्रय गावडे, डॉ. सुरेश गावंडे
Onion Post-Harvest Management: कांदा हा दीर्घ कालावधीसाठी साठवून बाजारातील दरांचा अंदाज घेऊन मागणीनुसार विक्रीसाठी पुरवठा केला जातो. काढणीपश्चात कांद्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन साठवणुकीच्या काळात कांद्याचे नुकसान होते. त्यासाठी काढणीपश्चात कांद्यावरील रोगांचे ५ ते ६ महिन्यांपर्यंत व्यवस्थापन करून ते विक्रीयोग्य राखणे गरजेचे असते. कांदा पीक काढणीपूर्वी ते काढणीनंतरच्या रोगांपर्यंत योग्य व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे.
सर्वसाधारणपणे काढणीपश्चात बुरशी आणि जीवाणूजन्य रोगांमुळे कांदा पिकाचे ४० टक्क्यांपर्यंत नुकसान होते. कांदा साठवणीतील महत्त्वाचे रोग म्हणजे काजळी, निळी हिरवी बुरशी, पांढऱ्या कांद्यावरील काळी बुरशी, तपकिरी रॉट तसेच जीवाणूजन्य रॉट या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो. कांदा साठवणुकीत रोगांमुळे होणारी नुकसान कमी करण्यासाठी पिकाचे लागवडीपासून कांदा काढणीपश्चात योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
काजळी (Black Mould)
हा बुरशीजन्य रोग रब्बी कांदा साठवणीत सर्रास आढळून येतो. रोग काही प्रमाणात उष्ण कटिबंधीय भागात कांदा काढणीच्या वेळेस शेतात दिसून येतो. परंतु साठवणीमध्ये जास्त प्रमाणात नुकसान होते.
रोगाची सुरुवात वरील बाजूच्या पानांकडून होऊन पुढे परिपक्व होण्याअगोदर पाने मरतात.
रोगग्रस्त कांद्याच्या वरील भागावर काळ्या काजळी सारखा रंग दिसून येतो. तो भाग कोरडा झालेला दिसतो. कांद्याच्या आतील भागात काळ्या रंगाची काजळी तयार होऊन वरील भागावर काळ्या रेषा तयार होतात. यामुळे जीवाणूजन्य रोगाचे आक्रमण होऊन संपूर्ण कांद्याचे मऊ रॉटमध्ये रूपांतर होते.
पोषक हवामान
रोगाच्या वाढीसाठी २८ ते ३४ अंश सेल्सिअस तापमान, वाढलेली आर्द्रता आणि उष्ण हवामान पोषक असते. रोगांची बुरशी हवा, माती, प्रादुर्भावित बियाणे आणि कांदा पिकांचे अवशेष यामध्ये जिवंत राहून पुढे प्रसार होतो.
निळी हिरवी बुरशी
सुरुवातीला कांद्यावर फिक्कट पिवळसर जखमा तयार होऊन ठिपके तयार होतात. यामध्ये निळ्या हिरव्या बुरशीची वाढ होते. प्रादुर्भावित कांद्यामधून राखाडी पातळ द्रव्य बाहेर येतो. कांदा मऊ होऊन सडतो. प्रादुर्भावग्रस्त कांद्यामधून उग्र वास येतो.
ही बुरशी माती, कांद्याची झाडे इत्यादींमध्ये आढळून येते.
रोगाचा प्रसार प्रादुर्भावित इजा झालेले कांदे, साठवणुकीत झालेली इजा, उन्हाच्या चटक्यांमुळे झालेली इजा यामुळे होतो.
पोषक हवामान
वाढलेली आर्द्रता व २१ ते २५ अंश सेल्सिअस तापमान.
बोट्रीटीस रॉट
हा रोग शेतामध्ये दिसून येत असला, तरी तो कांदा साठवणीत मोठ्या प्रमाणात दिसतो.
सुरुवातीला रोगाची लक्षणे कांद्याच्या गर्भापासून सुरू होतात. तपकिरी रंग दिसून येऊन कांदे मऊ होतात. दमट हवामानात राखाडी रंगाची बुरशी प्रादुर्भावित कांद्याच्या वरील बाजूस आणि आतील बाजूस तयार होते. जास्त प्रादुर्भावित कांद्यामध्ये स्क्लेरोशिया सुद्धा दिसून येतात. ही बुरशी साठवणीतील कांदा व जमिनीमध्ये कायमस्वरूपी आढळून येते.
पोषक हवामान
वाढलेली आर्द्रता, १० ते २४ अंश सेल्सिअस तापमान.
पांढऱ्या कांद्यावरील काळी बुरशी
हा रोग शेतातील कांदा पिकावर व साठवणीतील कांद्यावर आढळून येतो.
रोगाची प्रामुख्याने लक्षणे कांद्यावर दिसून येतात. कांद्यावर गडद हिरवे ते काळे ठिपके व रेषा दिसून येतात. हे ठिपके एकसारखे किंवा वेगवेगळे असतात
पांढऱ्या कांद्यावर रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो. त्यामुळे त्याचे बाजारमूल्य घटते.
या रोगाची बुरशी कांदा पिकाच्या शेतामध्ये उरलेल्या पालापाचोळ्यामध्ये जिवंत राहते व ती पुढील कांदा पिकावर आक्रमण करते.
पोषक हवामान
जमिनीचा ओलसरपणा, आर्द्र हवामान, २० अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमानात रोगाची लवकर वाढ होते.
रोगाचा प्रसार प्रादुर्भावित कांदे, पाने इत्यादीमधून तसेच सिंचनाच्या पाण्यातून देखील होतो.
पांढऱ्या कांद्यावरील काळी बुरशी
हा रोग शेतातील कांदा पिकावर व साठवणीतील कांद्यावर आढळून येतो.
रोगाची प्रामुख्याने लक्षणे कांद्यावर दिसून येतात. कांद्यावर गडद हिरवे ते काळे ठिपके व रेषा दिसून येतात. हे ठिपके एकसारखे किंवा वेगवेगळे असतात
पांढऱ्या कांद्यावर रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो. त्यामुळे त्याचे बाजारमूल्य घटते.
या रोगाची बुरशी कांदा पिकाच्या शेतामध्ये उरलेल्या पालापाचोळ्यामध्ये जिवंत राहते व ती पुढील कांदा पिकावर आक्रमण करते.
पोषक हवामान
जमिनीचा ओलसरपणा, आर्द्र हवामान, २० अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमानात रोगाची लवकर वाढ होते.
रोगाचा प्रसार प्रादुर्भावित कांदे, पाने इत्यादीमधून तसेच सिंचनाच्या पाण्यातून देखील होतो.
जीवाणूजन्य रॉट
या रोगामुळे कांद्याच्या आतील भाग मऊ व बिलबिलीत झाल्यासारखा दिसतो.
प्रादुर्भावित कांदे पिवळे पडतात व नंतर तपकिरी होतात. त्यातून पातळ द्रव्य बाहेर पडते.
रोगाचे जिवाणू कांद्यामध्ये इजा झालेल्या भागातून आत प्रवेश करतात. पुढे कांद्यामध्ये रोगाची वाढ होते.
हा रोग शक्यतो कांदा कापणीवेळी किंवा साठवणीत दिसून येतो.
या रोगाचा प्रसार जमिनीतून व वाहणारे पाणी यामधून होतो.
आर्द्र हवामान व २५ अंश सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान रोगाच्या वाढीसाठी अनुकूल असते.
तपकिरी रॉट
या जीवाणूजन्य रोगाची प्रमुख लक्षण म्हणजे कांद्यावर गडद तपकिरी रंग दिसून येतो.
जिवाणू कांद्याच्या आतील गाभ्यामध्ये तयार होतात. कांद्याच्या आतील भागात तपकिरी रंगाचे पातळ द्रव्य तयार होऊन कांदा सडण्याची प्रक्रिया सुरू होते. आतील सडलेला भाग हा बाहेरील भागापर्यंत येतो.
प्रादुर्भावग्रस्त कांदा बाहेरून चांगला दिसत असला, तरी तो दाबला असता त्यातून पांढरे द्रव्य बाहेर पडते.
अशा सडलेल्या कांद्यांमुळे साठवणीत उग्र वास येतो.
कांद्याच्या मुळाकडील भागाकडून दाबले, तर मधला भाग वर येतो.
एकात्मिक व्यवस्थापन
साठवणुकीत दिसून येणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव हा शेतातूनच झालेला असतो. कांदा काढणीनंतर व्यवस्थित न सुकवणे तसेच चुकीच्या साठवण पद्धती या बाबी रोगांच्या वाढीस पोषक ठरतात. रोगांमुळे साठवणुकीतील कांद्याचे होणारे नुकसान टाळण्यासाठी पीक लागवडीपासून ते साठवणुकीपर्यंत वेळीच योग्य उपाययोजना करणे आवश्यक ठरते.
शेतामध्ये रोपाची लागवड शिफारीशीनुसार योग्य अंतरावर व खोलीवर करावी.
पिकाच्या वाढीच्या अवस्थेत शिफारशीनुसार खताची मात्रा द्यावी.
पीक लागवड केलेल्या जमिनीतील पाण्याचा निचरा चांगला करावा.
पिकाची फेरपालट करावी. यामुळे रोगांचा प्रादुर्भाव कमी करणे शक्य होते.
कांदा पोसण्याच्या काळात जास्त पाणी देणे टाळावे. जास्त पाणी दिल्यास जीवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.
पीक पूर्ण परिपक्व झाल्यानंतर काढणी करावी. पिकाची पाने वाळल्यानंतर किंवा शेतातील ५० टक्क्यांपर्यंत माना पडलेल्या दिसल्यानंतर कांद्याची काढणी करावी.
कांदा काढणी करताना कांद्याची मान २.५ ते ३.० सेंमी पर्यंतच ठेवावी. यामुळे रोग व किडींचा प्रादुर्भाव कांद्यामध्ये होण्यापासून काही प्रमाणात रोखणे शक्य होते.
कांदा काढल्यानंतर किमान तीन दिवस शेतामध्ये व १५ दिवस सावलीमध्ये ठेवावेत. त्यानंतर कांदा चाळीत साठवणूक करावी.
काढणी, प्रतवारी करताना तसेच साठवणुकीवेळी कांद्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. कारण इजा झालेल्या भागामधून रोगाचा शिरकाव लगेच होतो.
कांदा चाळीत साठविताना हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. कांदा चाळ उंच जागी, हवेशीर ठिकाणी असावी.
साठवणूक केल्यानंतर दर १५ दिवसांनी प्रादुर्भावित कांदे बाहेर काढावेत. त्यामुळे रोग काही प्रमाणात आटोक्यात आणता येतात.
- डॉ. दत्तात्रय गावडे,
९४२१२ ७०५१०
(कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव, जि. पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.