Shrirampur News : कांदा पिकात हवामानानुसार माती, खत व पाणी व्यवस्थापन केले, तरच कीड-रोग नियंत्रण होईल व खर्च कमी होईल, अशी माहिती कृषी पर्यवेक्षक नारायण घुले यांनी दिली. कोतूळ (ता. अकोले) येथे ‘सकाळ-अॅग्रोवन’ व रिवुलिस इरिगेशन इं. प्रा. लि. च्या संयुक्त विद्यमाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘कांदा लागवड व रिवुलिस तंत्रज्ञानाने पाणी व्यवस्थापन’ या विषयावर चर्चासत्र झाले.
कृषी पर्यवेक्षक नारायण घुले, रिवुलिस इरिगेशनचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ शिवराज लोणाळे, उत्तर आणि मध्य महाराष्ट्राचे व्यवस्थापक विजय घुगे, रवींद्र सातपुते, संगमनेर तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, देशमुख अॅग्रो एजन्सीचे संचालक अरविंद देशमुख, नितीन वाबळे, अनिरुद्ध देशमुख, बी. जे. देशमुख, राजेंद्र देशमुख, भाऊसाहेब देशमुख, श्याम देशमुख, किरण देशमुख, सयाजी देशमुख, सयाजी पोखरकर, अशोक साबळे, विजय गोडसे, गणेश शिंदे, रमेश देशमुख, सीताराम देशमुख, ज्ञानबा देशमुख, फारूक पठाण, सुनीता फटांगरे, लता बांबळे उपस्थित होते.
घुले म्हणाले, की कांदा पीक व्यवस्थापन हे बदलत्या हवामानानुसार बुरशीमुळे जास्त जिकिरीचे होते. त्यामुळे जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मासारखे जास्तीत जास्त वापर वाढवावा. कांदा पिकाला पाणी जास्त झाले, तर कीड व बुरशीचे प्रमाण वाढते. महाग खतही वाया जाते. कांदा रोपे करताना जास्त रोपे एकसारखी व सशक्त तयार करण्याची गरज आहे.
रोपे टाकण्यासाठी गादीवाफा व पेरणी यंत्र वापरावा, खते व कीडरोग नियंत्रणात ठेवण्यासाठी रासायनिक, तसेच जैविक बुरशीनाशकाचा वापर वाढविणे गरजेचे आहे. साठवणुकीसाठी पिकाच्या ७० दिवसांनंतर बुरशीनाशकांची दोनदा फवारणी केल्यास कांद्याची टिकवण क्षमता वाढते.
गोसावी यांनी शासकीय योजनांची माहिती दिली, तसेच शेतकऱ्यांनी शेती करताना नवनवीन पिके घेतली पाहिजे. जिरा लागवड आत्मा प्रकल्पातून नावीन्यपूर्ण उपक्रम घेतल्याचे त्यांनी सांगितले. रिवुलिस इरिगेशनचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ शिवराज लोणाळे यांनी पाणी व्यवस्थापन आणि ठिबक सिंचन याची माहिती दिली.
ठिबक सिंचन दीर्घकाळ वापरण्यासाठी नळी दाबाने चालविली पाहिजे. गरजेपेक्षा जादा पाणी दिल्याने जमिनीचा सामू व मुक्त चुण्याची पातळीत वाढ होते. कांद्याची लागवड केल्यानंतर विद्राव्ये खते ठिबकच्या सहाय्याने द्यावीत.
ठिबकने पाणी दिल्याने जमिनीचे आरोग्य चांगले राखू शकतो, असे सांगितले. सूत्रसंचालन अॅग्रोवनचे सिनीयर एक्झिक्युटिव्ह सैफ शेख यांनी केले. आभार बी. जे. देशमुख यांनी मानले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.