Village Life  Agrowon
ॲग्रो विशेष

Rural Social Structure : गावाच्या गोतावळ्यात मागे पडलेली माणसं

गण्या पुढं सांगू लागला, "गावातल्या मालदार पार्ट्या तिथंच बसलेल्या असत्यात दिवसभर. हजारात डाव चलत्यात. परवा दिवशी शांता कुंभारणीच्या असक्यानं चाळीस हजाराचा माल हाणला ढवळ्याच्या श्रीरंग बापूचा." सुन्या मधेच गण्याला थांबवत म्हणला, "मायला पण बापूकड इतका पैसा आलाच कुठून?" "उचल घेतली होती कारखान्याची. आता ह्येव हिकडं घालून बसलाय. पैसे गेल्यापासून गडी माप उतरुच देत नाय. बायकू मरतीय डोक्यावर मोळ्या वाहून. बरं ते जाऊ दी! संत्याच्या लई नादी लागू नकु बरंका! गावात त्याला काय इज्जत राहिली नाही.

Dhananjay Sanap

लेखक -धनंजय सानप

गण्यानी फुल भरलेला ग्लास सुन्याच्या टेबलवर ठेवला. सुन्या अजूनही हॉटेलमध्येच बसून होता. दुपार कधी एकदाची निघून जाईल, असं त्याला झालेलं. घरी जाऊन जेवण करावं तर चहानं भूक मेली होती. त्यानं बसल्या जागीच गण्याला हाक दिली. चहाच्या किटलीतला चहा पातेल्यात ओतत गण्यानं ऑर्डर आल्याची सांगितलं. गण्या किटलीत चहा भरून सुन्यापाशी आला अन् सुन्याला म्हणला, "दोस्ता शुन्य मिनिटात पाटलाच्या मळ्यातून चहा देऊन येतो.

तू थांब हिथं. कुणी आलं त ऑर्डर घेऊन गेलाय म्हण आणि बुड टेकायला लाव त्याला. आलोच शून्य मिनिटात." जगात काहीही झालं तर शून्य मिनिटात आलो म्हणायची सवय गण्याला कुठून लागली होती, माहीत नाही. पण हॉटेलच्या चहाची ऑर्डर असू देत किंवा इतर कुठलंही काम. गण्याची 'शून्य मिनिट' म्हणल्याशिवाय गाडी पुढं धकत नव्हती. सुन्यानं गण्याला 'बिगीनं ये'! खुणवलं अन् खिशातला मोबाईल काढून इंस्टा रिल्स पाहायला सुरुवात केली.

तो स्क्रीनवर स्क्रोल करत होता. चार अर्ध्या नागड्या कंबर हलवणाऱ्या पोरी पाहून झाल्यावर त्याला मोटिव्हेशनल स्पीकरचं रिल दिसलं. तसा त्याने मोबाईलचा आवाज वाढवला. त्यातला पोरगा म्हणत होता, "डेरिंग अशी करा की बुलेटच्या आवाजानं सगळा गाव हादरला पाहिजे." तसं सुन्यानं स्क्रोल करणं पुन्हा सुरू केलं. इंस्टाच्या रिल्समध्ये फुल टू मोटिव्हेशनल स्पीकरचा भरणा होता. सुन्या औरंगाबादला असताना सकाळ संध्याकाळ रील पाहत स्वतःतला उत्साह जागवत राहायचा.

त्याची त्याला सवय झालेली. कित्येक वेळा अभ्यासाचा कटाळा आलेला असतानाही तो रिल्सवर ताव हाणून स्वतःत ऊर्जा भरायचा प्रयत्न करायचा. गण्या चहा देऊन वापस आला होता. पण सुन्याचं स्क्रोल सुरूच होतं. चहाची किटली टेकीत गण्या म्हणला, "साहेब कधी आणताय मग लाल दिवा!" तसं सुन्याचं काळजात ठसठसलं. जणू कुणीतरी बेडावर जोरात फटका हाणवा. त्यानं नुसतंच आणू आणू म्हणत विषयाला फाटा फोडला.

मोबाईल बाजूला ठेवला अन् गण्याला म्हणला, "ईचारायचं राहिलं बघ, तिकडं पाटलाच्या मळ्यात येधोळा कसं काय चहा?" तसा गण्या म्हणला, "डाव बसलेला असतोय ना तिकडं!" सुन्याला काहीच कळलं नव्हतं. त्येव प्रश्नार्थक नजरेनं म्हणला, "म्हंजी?" त्यावर गण्या टेबलवर फडकं मारत म्हणला, "आरं ते पत्त्याचा डाव बसलेला असतोय. पाटलाच्या सोन्या दादाचा क्लब चालतोय मळ्यात. दिवस मावळूस्तोर साठ-सत्तर चहा त तिथंच जातेत." आता कुठं सुन्याला गोष्ट क्लियर झाली होती. गण्या पुढं सांगू लागला, "गावातल्या मालदार पार्ट्या तिथंच बसलेल्या असत्यात दिवसभर.

हजारात डाव चलत्यात. परवा दिवशी शांता कुंभारणीच्या असक्यानं चाळीस हजाराचा माल हाणला ढवळ्याच्या श्रीरंग बापूचा." सुन्या मधेच गण्याला थांबवत म्हणला, "मायला पण बापूकड इतका पैसा आलाच कुठून?" "उचल घेतली होती कारखान्याची. आता ह्येव हिकडं घालून बसलाय. पैसे गेल्यापासून गडी माप उतरुच देत नाय. बायकू मरतीय डोक्यावर मोळ्या वाहून. बरं ते जाऊ दी! संत्याच्या लई नादी लागू नकु बरंका!

गावात त्याला काय इज्जत राहिली नाही. तू आपला शिकला सरवलेला माणूसय. त्याच्यासोबत कशाला फिरायलास?" तसं सुन्या सावध होत म्हणला, "नाय आज असचं गेलतो सोबत!" सुन्याला बापूच्या बायकुचं जरा वेळ वाईट वाटलं. पण त्यात लई इचार करण्यात त्याला रस नव्हता. गण्याला सगळ्या गावातल्या भानगडी माहीत होत्या.

गण्याचं हॉटेल गावात चांगलं चालतं. सकाळ आणि संध्याकाळच्या टायमाला गावातले लोकं गण्याकड चहा घ्यायला येतात. नाही म्हणलं तरी हजारेक रुपये आरामशीर गल्ला होतोच. गण्याचं वय साधारण बावीसच्या आसपास असेल पण त्याच्या चेहऱ्याकड पाहून त्याच्या वयाचा अंदाज लावता यायचा नाही. त्याच्या कातडीचा रंग पांढराधोट होता. कपाळ रुंद आणि नाक बारीक. केस देवगण स्टाइल कपाळावर आलेले. त्याच्या गळ्यात एक रुमाल असायचा. तोही केशरी कलरचा. आणि हातात लालसर धागा बांधलेला. त्येव कायम कामाच्या धुंदीत असायचा. स्वभाव बडबड्या असल्या तरी व्यवहाराची अक्कल लई लवकर त्याला आलेली.

गण्याचा बाप ऊसतोडीच्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर होता. ट्रॅक्टर होतं सरपंचाचं. मेसी फर्ग्युसन १०३५ डीआयचं. कारखाना लाईनवर चालायचं. गण्या लहान असतानाची गोष्टय. भुडकीत सरपंचाची ऊस तोड सुरू होती. भुडकीतून ऊसाचं भरलेलं ट्रॅक्टर काढायचं लई जिकरीचं काम होतं. कारण भुडकीत जायला रस्ता नव्हता. बैलगाडीची अरुंद वाट होती. त्यात पावसाळ्यात तर भुडकीवर जाताच यायचं नाही. रस्त्यात खड्डे असायचे. म्हणून मंग ट्रॅक्टर भुडकीपासून लांब नदीच्या पुलावर उभं केलं होतं. अन् बैलगाडीनं मोळ्या ट्रॅक्टरजवळ आणल्या जायच्या. त्यासाली सरपंचाचा फडही सोळा एकरचा होता.

फडातून ऊसाच्या मोळ्या बाहेर काढताना माणसांपेक्षा बैलाची लई बेजारी होत होती. बैलगाड्याचे साठे पार खिळखिळ झाले होते. ऊसाने भरलेली गाडी ओढताना बैलाचे पाय घसरत होते. फड अजून महिनाभर चालणार होता. पहिल्या आठवड्यात गण्याचा बाप ट्रॅक्टर नदीच्या पुलावर लावून देत होता. पण सकाळी लावलेलं ट्रॅक्टर दोन दिवसांनी भरलं जात होतं. फड काही उरकत नव्हता. म्हणून एकदिवस मंग गण्याच्या बापानं न राहून ट्रॅक्टर ट्रॉली थेट भुडकीवरच्या फडात नेली. अन् तिथंच भरली. तऱ्हा करून ऊसाचं भरलेलं ट्रॅक्टर त्या रस्त्यावरून सहीसलामत बाहेर काढलं.

टायर थोडे फार घासले होते, पण लई अडचण आली नव्हती. त्यानंतरही दोन वेळेस ऊसानं भरलेलं ट्रॅक्टर तिथून काढलं होतं. तसा गण्याचा बाप कसलेला वस्ताद होता. पण तिसऱ्या वेळी घात झाला. ट्रॅक्टरचं एक टायर टेकडावर अन् दुसरं टायर दिडेक फूट खोल चकारीत फसलं. त्यानं एक्सरलेटर करायचा प्रयत्न केला, तसं ट्रॅक्टरनं जागेवर पलटी मारली. ट्रॉलीचे दांभ निसटले अन् ऊसाच्या मोळ्यात आणि ट्रॅक्टरच्या मुडक्यात दबून गण्याचा बाप जागीच मेला. तेव्हापासून गण्याला आणि त्याच्या बहिणीला त्याच्या माईनं लहानाचं मोठं केलं.

गण्याचं वय जास्त दिसण्याचं कारण त्याच्यावर आलेल्या जबाबदारीचं ओझचं असावं. सुन्याला आपल्यावर असलं ओझं कधीच नव्हतं, तरीही आपल्याला काहीच करता आलं नाही, असंही क्षणभर वाटून गेलं. तेवढ्यात "च्यायला हे ऊन एक कातू कातू पडायला लागलंय." म्हणत गण्या काउंटरच्या आतल्या बाजूच्या खुर्चीवर बसला. सुन्याला आठवलेला भूतकाळ गण्याचा बोलण्याला ईस्कटला.

गण्या मोबाईलमध्ये मुडकं घालून बसला होता. सुन्या बराच वेळेचं खुर्चीवर बसून होता. त्यामुळं अंग जखडून गेलं होतं. आता घराकड जावं असा विचार करत सुन्या गण्याला म्हणला, "चहाचे किती झाले!" त्यावर गण्या दहा म्हणला. सुन्यानं खिशातून शंभरची नोट काढून गण्या पुढं केली. गण्या म्हणला "सुट्टे नाहीत." सुन्या म्हणला, "मपल्याकडपण नाईत. दहा बाकी राहू देतो का?" त्यावर गण्या म्हणला, "नेक्स्ट टाईम दी." त्यावर बरं म्हणत सुन्या हॉटेलातून बाहेर पडला.

अजून दुपारचं ऊन पोळत होतं. हॉटेलमधून निघून सुन्या मंदिराजवळच्या झाडाखाली जावं असं विचार करत होता. पण त्याला तिथं जाऊन बसण्यापेक्षा घरी जावं वाटलं. मंदिराच्या उजव्या बाजूच्या गल्लीतून तो झपा झप पावलं टाकत घराकडे निघाला. रस्त्यावर कुणीच नव्हतं. त्याला पाच पन्नास पावलं टाकल्यावर त्याला घाम आलेला. त्यानं खिशातला रुमाल काढला आणि डोक्यावर घेतला. त्याला आता उन्हाची सवय राहिली नव्हती. तो घराजवळ आला. घरी कुणीच नव्हतं. माय आणि बाप सकाळीच रानात गेले होते. तो दुपारी बाहेर पडला होता, तेव्हा लाईट गेलेली.

त्याने घराचं कुलूप उघडलं आणि आत शिरला. लाईट आलेली. बराच वेळेपासून त्याचा घसा कोरडा पडला होता. त्यानं फ्रीजमधली पाण्याची बाटली काढून गटागटा पाणी पिलं आणि बेडवर पडला. अंगातलं शर्ट चुरगळणार म्हणून बेडवरून उठून त्यानं शर्ट आणि पॅन्ट काढलं. आणि नाईट पॅन्ट आणि टी शर्ट घातला. कुलरचं बटन ऑन केलं. आणि मोबाईल काढून गाणी लावली. त्याचं फेव्हरेट गाणं होतं, तुम आये तो आया मुझे याद गली मे आज चांद निकला. गाणं रिपीट मोडवर टाकून त्यानं बेडवर अंग मोकळं सोडलं. घडाळ्यात आता दुपारचे तीन वाजले होते. हळूहळू त्याच्या पापण्या जड पडू लागल्या. त्याला दुपारची झोप घ्यायची सवय औरंगाबादमध्येच लागली होती. गाण्याच्या आवाजात आणि कुलरच्या गारव्यात त्याला झोप केव्हा लागली कळालंच नाही.

क्रमशः

#गोतावळा_२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT