Family Guide Program  Agrowon
ॲग्रो विशेष

Shriguru Paduka Utsav : ।। संत दर्शनी हा लाभ । पद्मनाभ जोडीला ।।

Family Guide Program : ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘श्री फॅमिली गाइड’ प्रोग्रॅमअंतर्गत ‘श्रीगुरू पादुका उत्सव’ या सोहळ्याचे वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमधील श्रीगुरू पादुका मंदिर परिसरात आयोजन करण्यात आले आहे.

Team Agrowon

New Mumbai : ‘साधू संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा’ याची साक्षात अनुभूती मंगळवारी (ता. २६) हजारो भाविकांना आली. कष्ट, चिंता, तहान-भूक विसरून ‘उजळले भाग्य आता। अवघी चिंता वारली।। संत दर्शनी हा लाभ। पद्मनाभ जोडीला।।’ म्हणत संत अन् श्रीगुरूंच्या पादुकांवर मस्तक ठेवून कृतकृत्य झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. जीवनाचे सार्थक झाले म्हणत आनंदाचा परमोच्च बिंदू गाठणारा भक्तिसोहळा हजारो भाविकांनी डोळ्यांत साठवून ठेवला..!

‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘श्री फॅमिली गाइड’ प्रोग्रॅमअंतर्गत ‘श्रीगुरू पादुका उत्सव’ या सोहळ्याचे वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमधील श्रीगुरू पादुका मंदिर परिसरात आयोजन करण्यात आले आहे. पादुका सोहळ्यानिमित्त नवी मुंबईला एखाद्या तीर्थस्थानाचे स्वरूप आले होते आणि राज्याच्या कानाकोपऱ्यांतून आलेले गुरुसेवक भक्तीच्या रंगात दंग झाले होते.

सामाजिक, आध्यात्मिक, शारीरिक आणि आर्थिक प्रगती साधण्यासाठी ‘सकाळ’तर्फे नवी मुंबईत दोन दिवस ‘संकल्प ते सिद्धी सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. त्याची सुरुवात मंगळवारपासून झाली.

महाराष्ट्रातील १८ श्रीगुरूंच्या पादुकांचे दर्शन एकाच वेळी एक्झिबिशन सेंटरमध्ये घेता येणार आहे. पहिल्याच दिवशी सकाळपासून गुरुसेवकांची मांदियाळी तिथे लोटली होती. संत-महात्म्यांच्या पादुकांचे एकत्रितपणे ‘याचि देही, याचि डोळा’ दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. राज्यभरातील हजारो भाविक टप्प्याटप्प्याने दाखल होऊ लागले.

पादुका मंदिराचे आकर्षक प्रवेशद्वार आणि तेथेच विराजमान संत ज्ञानेश्वरांचे आणि संत नामदेवांचे मनमोहक शिल्प सर्व भाविकांना नतमस्तक होण्यास भाग पाडत होते. मंदिराच्या प्रवेशद्वारावरच टाळ-मृदंगाचा नाद ऐकायला येत होता. पादुका दर्शन सोहळ्यासाठी पोहोचलेल्या प्रत्येक गुरुसेवकाच्या चेहऱ्यावर पादुका दर्शनाची ओढ दिसत होती.

पादुकांचे दर्शन व्हावे, यासाठी शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले होते. नोंदणी केलेल्या गुरुसेवकांना एका रांगेने सोडण्यात येत होते. नोंदणी नसलेल्यांची नोंदणी करून टप्प्याटप्प्याने पादुका दर्शनासाठी सोडले जात होते. त्यांच्या मार्गदर्शनासाठी स्वयंसेवक सज्ज ठेवण्यात आले होते. परिणामी, त्यांना कोणत्याही अडचणीशिवाय दर्शन घेता येत होते. प्रत्येक गुरुसेवकाच्या ओठावर हरिनामाचा जप होता.

भगवी पताका खांद्यावर घेऊन अनेक गुरुसेवक सहभागी झाले होते. पादुका विराजमान झालेल्या मंदिरांबाहेरील घंटांचा मधुर सूर आणि भक्तिगीतांचा मंजुळ सूर भाविकांना आध्यात्मिक अनुभूती देत होता. मंदिरांच्या दोन्ही बाजूंना चितारण्यात आलेल्या श्री दत्त आणि बा विठ्ठलाचा महाकाय देखावा सर्वांनाच भारावून टाकणारा होता. गुरूंच्या सान्निध्यात तल्लीन झालेले भाविक अभंग गात गातच पादुकाचरणी लीन होत होते.

महिलांची संख्या लक्षणीय

श्रीगुरू पादुका दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये महिलांची संख्या लक्षणीय दिसली. त्यातील अनेक महिलांनी पदर पसरून मनोभावे मागणे मागितले. पोलिस कर्मचाऱ्यांनीही वेळात वेळ काढून दर्शनाची संधी साधली.

अनेक भाविकांना छायाचित्र आणि सेल्फीचा मोह आवरता आला नाही. अनेकांनी आपल्या नातेवाइकांना व्हिडिओ कॉल करून पादुका दर्शन घडवले. त्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा झाला होता. अनेक भाविकांचे डोळे गुरूंच्या साक्षात दर्शनाने पाणावलेले दिसले.

टाळ-मृदंगाच्या गजरात आगमन सोहळा

विठ्ठल-विठ्ठल जय हरी... विठोबा-रखुमाई... ज्ञानोबा-तुकारामाचा जयघोष आणि टाळ-मृदंगाच्या गजरात आज सकाळी मोठ्या भक्तिभावाने वाशी परिसरात पादुका आगमन सोहळा रंगला. संत ज्ञानेश्वर महाराज, संत मुक्ताबाई आणि संत एकनाथ महाराज यांच्यासह १८ संत-महात्म्यांच्या पादुका श्रीगुरू पादुका मंदिरासमोर येताच भक्तांनी भगव्या पताका फडकवत, पुष्पवृष्टी करत मोठ्या भक्तिभावाने त्यांचे स्वागत केले.

महाराष्ट्रातील विविध संस्थांच्या माध्यमातून आणण्यात आलेल्या संत-महात्म्यांच्या पादुकांसह सकाळी दहा वाजता भक्तिमय वातावरणात दिंडी काढण्यात आली. वेगवेगळ्या तीन बग्गींतून सर्व पादुका मंदिरात आणण्यात आल्या. सर्व पादुकांचे विधिवत पूजन करण्यात आले. या वेळी भगवा फेटा, पांढरा कुर्ता आणि हातात भगवी पताका घेतलेले शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सायंकाळी दिंडी आणण्यात आली. त्यानंतर अपूर्व उत्साहात रिंगण सोहळा पार पडला.

बाल वारकऱ्यांचे लक्षवेधी रिंगण

श्रीगुरू पादुका मंदिरात पादुकांचे आगमन झाल्यानंतर पांढरा कुर्ता आणि धोतर परिधान केलेल्या अन् कपाळी टिळा, गळ्यात टाळ घेतलेल्या बाल वारकऱ्यांचे लक्षवेधी रिंगण पार पडले. या वेळी विठोबा-रखूमाईचा जयघोष, फुगड्या, कसरती सादर करत त्यांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली.

२७ नद्यांचे पवित्र जल

पादुका दर्शन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील गोदावरी, तापी, बोरी, कान, सूर, चंद्रभागा इत्यादींसह देशभरातील २७हून अधिक नद्यांचे पवित्र जल आणण्यात आले होते. ते जल मोठ्या भांड्यात एकत्र करून भक्तांना उपलब्ध करून दिले जात होते.

आध्यात्मिक पुस्तकांना मोठी मागणी

श्रीगुरू पादुका दर्शन सोहळ्याच्या ठिकाणी पुस्तके, ऑरगॅनिक फूड आदी विविध प्रकारचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. त्यामध्ये पहिल्या दिवशी भक्तांकडून आध्यात्मिक पुस्तकांच्या खरेदीला मोठी पसंती मिळाल्याचे दिसून आले. त्यामध्ये डॉ. बालाजी तांबे यांच्या ‘फॅमिली डॉक्टर’, क्रियायोग, गर्भसंस्कार, श्रीराम विश्वपंचायतन या पुस्तकांना; तर श्री एम यांच्या हिमालयवासी गुरूंच्या योगी शिष्याचे आत्मकथन, शून्य या पुस्तकांनाही भक्तांची मोठी पसंती असल्याचे दिसून आले. पुस्तकांबरोबरच फेथफूड ऑरगॅनिक इंडिया, आयुर्वेदिक औषधे, विश्वअग्निहोत्र असे अनेक स्टॉल मांडण्यात आले आहेत.

आज सांगीतिक कार्यक्रम

प्रसिद्ध गायक-संगीतकार शंकर महादेवन यांचा मंगळवारी (ता. २६) होणारा सांगीतिक कार्यक्रम सोहळ्याचे आकर्षण ठरणार आहे. श्रीगुरू बालाजी तांबे यांच्या आशीर्वादाने होणाऱ्या पादुका दर्शन सोहळ्यात बुधवारीही आध्यात्मिक गुरू श्री एम मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. पुरुषोत्तम राजिमवाले यांच्या मार्गदर्शनाखाली एकाच वेळी अग्निहोत्रही होणार आहे.

विनामूल्य प्रवेश

नागरिकांना पादुका दर्शन सोहळ्यासाठी विनामूल्य प्रवेश असेल; मात्र त्यासाठी क्यूआर कोडद्वारे नोंदणी करावी लागणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असेल. अधिक माहितीसाठी ८८८८८३९०८२ या दूरभाष क्रमांकावर संपर्क साधावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT