Orchid Garden Agrowon
ॲग्रो विशेष

Orchid Garden : अंबेश्‍वर देवराईत साकारतेय ‘ऑर्किड गार्डन’

Agriculture News : कोल्हापूर- रत्नागिरी मार्गावरील अंबा घाट (ता. शाहूवाडी) हा अनेक प्रकारच्या जैव विविधतेने नटलेला परिसर आहे.

अमित गद्रे

Pune News : कोल्हापूर- रत्नागिरी मार्गावरील अंबा घाट (ता. शाहूवाडी) हा अनेक प्रकारच्या जैव विविधतेने नटलेला परिसर आहे. या डोंगरी भागातील झाडांवर जुलै ते ऑक्टोबर महिन्यांत अनेक प्रकारची ऑर्किड्‍स (आमरी) फुललेले दिसतात.

परंतु सध्या आंबा घाट परिसरातून जाणाऱ्या रत्नागिरी- नागपूर महामार्गाच्या रुंदीकरणामध्ये रायवळ आंबा, फणस, वड, पिंपळ, उंबर, जांभूळ अशी जुनी वृक्षसंपदा तोडली जात आहे. या झाडांवरच अनेक वर्षांपासून ऑर्किडच्या विविध प्रजाती रुजलेल्या आहेत.

वृक्षतोडीमुळे दुर्मीळ ऑर्किडच्या प्रजाती नष्ट होत आहेत. हा अमूल्य ठेवा संवर्धनाचे काम ‘नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी’तर्फे (Nature Conservation Society)करण्यात येत आहे. कोल्हापूर, सांगली परिसरातील अभ्यासू निसर्गप्रेमींची ही स्वयंसेवी संस्था आहे. निसर्ग संवर्धन, संशोधनामध्ये हे निसर्गप्रेमी कार्यरत आहेत.

या उपक्रमाबाबत संस्थेचे सदस्य अमोल जाधव म्हणाले, की कोल्हापूर- रत्नागिरी मार्गावर तोडलेल्या वृक्षांवरील आर्किडच्या विविध दुर्मीळ प्रजातींचे संवर्धन करीत आहोत. पहिल्यांदा आम्ही तोडलेल्या झाडांचे सर्वेक्षण आणि जिओ टॅगिंग केले.

यावर आम्हाला दुर्मीळ ऑर्किड प्रजाती दिसून आल्या. यांच्या संवर्धनासाठी नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी, ठाकरे वाइल्ड लाइफ फाउंडेशन, निसर्गप्रेमी मंडळ, पेठ वडगाव आणि वनविभाग, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ऑर्किड वाचवा’ मोहीम हाती घेतली.

फेब्रुवारी, मार्च महिन्यांत शनिवार- रविवारी संस्थेच्या सदस्यांनी कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गाच्या कडेने तोड झालेल्या झाडांच्या वरील विविध प्रकारची ऑर्किड्स जमा केली. यामध्ये काही दुर्मीळ, काही संकटग्रस्त आणि स्थानिक प्रजाती आढळून आल्या. ही मोहीम राबविताना आम्ही कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक एम. रामानुजम यांची परवानगी घेतली आहे. यास निसर्गप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

दुर्मीळ आर्किड्सचे संवर्धन ः

ऑर्किड्सच्या विविध प्रजातींच्या पुनःरोपणासाठी अंबा (ता. शाहूवाडी) गावातील अंबेश्‍वर देवराईची संस्थेने निवड केली. ही देवराई विविध वृक्षांनी संपन्न आहे.

पुनःरोपणाबाबत माहिती देताना नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीचे अध्यक्ष तबरेज खान आणि सदस्य धनंजय जाधव म्हणाले, की या मोहिमेअंतर्गत पाच दुर्मीळ प्रजातींची तीन हजारांहून अधिक ऑर्किड्स रोपे वाचविली आहेत.

मार्च, एप्रिल महिन्यांत आम्ही त्यांचे पुनःरोपण अंबेश्‍वर देवराईमध्ये केले. आम्हाला एरिड्स क्रिस्पा (द्रौपदी पुष्प), रेकोस्टायलस रेटूसा (सीतेची वेणी), एरिड्स मॅक्यूलोसा (गुलाबी द्रौपदी पुष्प), अकॅम्पे प्रायमोर्सा (वाघरी), डेन्ड्रोबियम हर्बेसियम (शरद आमरी) यांसारख्या दुर्मीळ प्रजातींचे संवर्धन करण्यात यश मिळाले आहे.

वन विभागाच्या सहकार्याने आम्ही देवराईमध्ये ‘ऑर्किड गार्डन’ तयार करत आहोत. नारळाचा काथ्या, सोडणामध्ये ऑर्किडची रोपे ठेवून देवराईतील विविध झाडांच्या खोडावर सुतळीने बांधण्यात आली आहेत.

ठरावीक दिवसांनी संस्थेचे स्थानिक कार्यकर्ते पुनःरोपण केलेल्या ऑर्किडवर पाण्याची फवारणी करतात. यामुळे ओलावा टिकून रुजण्याचे प्रमाण वाढले आहे. देवराईमध्ये आम्ही आतापर्यंत ३,७१० ऑर्किड रोपांचे पुनःरोपण केले आहे.

या उपक्रमासाठी कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक एम. रामानुजन, मलकापूर वनपरिक्षेत्र अधिकारी अमित भोसले, राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य सुहास वायंगणकर, कोल्हापूरचे मानद वन्यजीव रक्षक स्वप्नील पवार, संस्थेचे सदस्य तसेच आंबा ग्रामस्थांचे चांगले सहकार्य मिळत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update : मॉन्सूनचा वेगवान प्रवास; मुंबई गाठली, विदर्भात वर्ध्यापर्यंत मजल

Livestock Fodder Management: कमी पावसाच्या परिस्थितीत शाश्‍वत चारा व्यवस्थापन

Kharif Sowing 2026 : देशात कापूस, सोयाबीन, ऊस, भात लागवड पिछाडीवर; भरडधान्य, तूर, मक्याची आघाडी

Farm Loan Waiver: कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यासाठी तयारी सुरु

Khoya Production Mechanization: खवा उत्पादनातील यांत्रिकीकरण

SCROLL FOR NEXT