Agrowon
ॲग्रो विशेष

Indrjeet Bhalerao : फळबागा : इज्रायलचा प्रयोग भारतात

Team Agrowon

- इंद्रजीत भालेराव

सध्या मी हैदराबादेत आहे. भाऊ त्याने विकसित केलेले काही शेतीप्रकल्प मला दाखवतो आहे. काल त्याने मला 'कपिल ऍग्रो फार्म' दाखवलं. कपिल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे मालक वामन राव यांचा हा ऍग्रो फार्म आहे. हे इथलं मोठं प्रस्थ आहे सध्याचे मुख्यमंत्री केसीआर राव यांच्या करीमनगर जिल्ह्यातले हे ग्रहस्थ मुख्यमंत्र्यांचे चांगले मित्र आहेत. दोघांच्या शेतीतल्या रसांमुळेच ते एकमेकांचे मित्र झालेले आहेत.

वामन राव हे शेतीत खूप रस असलेले गृहस्थ आहेत. पण त्यांचे उद्योगही पुष्कळ आहेत. जवळजवळ त्यांच्या चाळीस कंपन्या आहेत. 'कपिल चिट् फंड' मधून ते प्रथम उदयाला आले. 'हंस' हा त्यांचा इंग्रजी पेपरही आहे. एचएम हे टीव्ही चॅनेलही आहे. अशा या ग्रहस्थांनी शेतीप्रयोगांसाठी सलग अडीचशे एकर जागा खरेदी केली आणि त्यातल्या सव्वाशे एकरावर सध्या फळबागा विकसित केलेल्या आहेत.

या फळबागांचं वैशिष्ट्य असं आहे की इज्रायलमध्ये कमीतकमी जागेत जास्तीत जास्त फळझाडं लावून ज्या प्रकारे जास्तीत जास्त उत्पन्न घेतलं जातं तो प्रयोग आपल्या इथलीच फळझाडं घेऊन आपल्या इथल्या मातीत करणं सुरू आहे. आणि तो बऱ्यापैकी यशस्वीही झालेला आहे. त्यामुळे दोन एकरइतकं उत्पन्न अर्ध्या एकरात मिळू शकतं. त्यासाठी त्यांनी बेड सिस्टीम आणि फळांच्या झाडातील अंतर कमी करण्याचे प्रयोग करून पाहिले.

आपली सीताफळ, पेरू, बोर, अंजीर, पपई, लिंबू ही नेहमीची फळझाडं सोडा पण आंबा, जांभूळ, चिंच अशा महावृक्ष असलेल्या फळझाडांनाही सतत कटई करून छोटं ठेवणं, खूप कमी अंतरावर ही झाडं लावणं, असे प्रयोग त्यांनी यशस्वी केलेले आहेत. त्यातून भरपूर उत्पन्नही मिळतं. एकच प्रयोग त्यांचा अयशस्वी झालेला आहे, तो म्हणजे फणसाचा. फणसाच्या झाडाला मात्र कटई करत राहिल्यामुळे मागच्या सहा वर्षात एकही फळ लागलेलं नाही. एकूण या सगळ्या बागा पाहताना प्रयोग यशस्वी झाल्याचं आम्हालाही दिसत होतं.

हे प्रयोग त्यांनी फक्त फळबागांसाठीच केलेले नाहीत, तर ते भाजीपाल्यासाठीही केलेले आहेत. तिथंही त्यांनी बेडवरच सगळा भाजीपाला घेतलेला आहे. कारण इज्रायलमध्ये मुळात माती नाहीच. सगळी शेती वाळूवर केली जाते. त्यामुळे बेडवर असे प्रयोग करण्यात येतात. आपल्या इथेही मातीचा कस फुट दोन फूटच असतो. त्या खाली मात्र काही नसतं. त्यामुळे यांनी जवळजवळ चार फूट उंचीचे बेड फळझाडांसाठी केलेले आहेत. आजूबाजूची दोन फुटांची माती त्या बेडवर घेतलेली आहे. त्यामुळे त्या झाडांना भरपूर कस मिळतो आणि भरपूर फळही लागतात, असा त्यांचा अनुभव आहे.

ही बाग दाखवणारा या बागेचा व्यवस्थापक विकी माने हा मुळात कोल्हापूरकडील हेरवाडचा आहे. इथल्या बहुतेक शेतीप्रकल्पाचे व्यवस्थापक भावाच्या संबंधामुळे महाराष्ट्रातून आलेले आहेत. आणि ते फार यशस्वीपणे या प्रकल्पाचे व्यवस्थापन करत आहेत. त्यापैकीच एक विकी माने हा आहेत. हा तरुणच मुलगा आहे. याने आम्हाला सगळ्या बागा फिरून दाखवल्या आणि काय कमी जास्त आहे तेही नीट समजून सांगितलं.

कपिल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज ही मोठी नानावलेली कंपन्यांची मालिका असल्यामुळे या शेतीमधल्या उत्पन्नापासून वितरणापर्यंत सर्व यंत्रणा त्यांच्या स्वतःच्या आहेत. त्यामुळे इतर कुणावर अवलंबून राहण्याची आणि त्याच्या हाताकडं पहात बसण्याची त्यांना गरज नाही. म्हणूनही कदाचित हा प्रकार यशस्वी झाला असण्याची शक्यता आहे.

आपल्यासाठी हे सगळं स्वप्नवतच आहे. यासाठी एवढी शेती उपलब्ध असणं, प्रयोग करण्यासाठी इतका पैसा उपलब्ध असणं, नव्या सगळ्या प्रकारच्या यंत्रणा उभ्या करणं, या सगळ्या गोष्टी सामान्य माणसांना अशक्यच आहेत. पण यातला एखादा प्रयोग आपल्या आहे त्या शेतीमध्ये करून पाहणं मात्र नक्कीच शक्य आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT