Pune News : कृषी विद्यापीठे, सार्वजनिक संस्थांतर्फे विकसित जैवतंत्रज्ञानातील संशोधनाच्या औद्योगिकीकरणास मोठी संधी आहे. मात्र सरकारी धोरणे- नियम, शेतकऱ्यांच्या समस्या, गरजा, बदलते हवामान आदी बाबींचा अभ्यास व परस्पर सहकार्यातून मार्ग काढून हे साध्य करता येईल असा सूर तज्ज्ञांनी व्यक्त केला.
कृषी जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील सार्वजनिक- खासगी भागीदारी या विषयावर पुणे येथे गुरुवारी (ता. २८) कार्यशाळा झाली. कृषी जैवतंत्रज्ञान, सेंद्रिय, रासायनिक अवशेषमुक्त शेतीला चालना देण्याच्या उद्देशाने आसाम कृषी विद्यापीठ आणि ग्रीनव्हेंशन बायोटेक, पुणे यांच्यातर्फे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
केंद्रीय जैवतंत्रज्ञान विभाग व नॉर्थ ईस्ट सेंटर फॉर ॲग्रिकल्चरल बायोटेक्नॉलॉजी (डीबीटी-निकॅब) यांचे त्यास सहकार्य लाभले. कृषी विद्यापीठे, सार्वजनिक संस्थांमधील संशोधन, तंत्रज्ञान प्रयोगशाळेतून बाहेर येऊन त्यास उद्योग- व्यवसायाचे मूल्य कसे प्राप्त करता येईल व ते शेतकऱ्यांपर्यंत ते कसे पोहोचवता येईल या विषयावर तज्ज्ञांचे या वेळी विचारमंथन झाले.
भारती कृषी विद्यापीठाच्या पोषण, आरोग्य व रोगांसंबंधी विभागाचे संचालक एम. व्ही. हेगडे यांनी ओमेगा फॅटी ॲसिडचे महत्त्व, जवस, अंडी यांच्या अनुषंगाने संस्थेतील संशोधन याविषयी सविस्तर माहिती दिली.
‘डीबीटी- निकॅब’चे संचालक प्रा. बिद्युत सरमाह म्हणाले, की देशातील किमान १० टक्के सुपीक क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आणण्याचे सरकारचे धोरण आहे. देशात ते केवळ तीन टक्के आहे. आसाममध्ये ०.७ टक्क्याच्या आसपास ते सेंद्रिय शेतीखाली असून, ४० लाख हेक्टर क्षेत्र त्याखाली येण्यास वाव आहे.
‘ग्रीनव्हेंशन बायोटेक’चे संस्थापक-शास्त्रज्ञ डॉ. एम. व्ही. देशपांडे म्हणाले, की प्रयोगशाळेतील संशोधनाचे रूपांतर औद्योगिकतेत होण्यासाठीचे व्यासपीठच आम्ही कंपनीतर्फे उपलब्ध केले आहे. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत (एनसीएल) सुमारे ४३ वर्षे कार्यरत असताना विकसित केलेले तंत्रज्ञान संस्थेच्या परवानाआधारे उपलब्ध केले आहे.
तज्ज्ञांकडून विविध विषयांवर मार्गदर्शन
आसाम कृषी विद्यापीठातर्फे विकसित भाताचे विविध वाण, जैविक खते, कीडनाशके, जनुकीय तंत्रज्ञान, पोल्ट्री आदींचे संगणकीय सादरीकरण संबंधित शास्त्रज्ञांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कीटकशास्त्रज्ञ डॉ. अजित चंदेले, विद्यमान विस्तार संचालक व कीटकशास्त्रज्ञ डॉ. सी. एस. पाटील यांनी जैविक उत्पादने, किडी- रोगांच्या समस्यांविषयी विचार मांडले.
ग्रीनव्हेंशन बायोटेकचे डॉ. संतोष तुपे यांनी सूक्ष्मजीव व नॅनो तंत्रज्ञानातील पैलू मांडले. ‘ॲग्रोवन’चे उपमुख्य उपसंपादक मंदार मुंडले यांनी ‘रेसिड्यू फ्री’ शेतीचे महत्त्व उलगडले. प्रयोगशील सेंद्रिय शेतकरी वसुधा सरदार, ईर्षा, कॅन बायोसिस, बायफ, इनोरा, कुमार बायोटेक, द फार्म आदी संस्थांच्या प्रतिनिधींनी विचारमंथनात सहभाग घेतला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.