Indian Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Indian Agriculture : जुने हवे ते नवनिर्मितीसाठी...

डॉ. सतीश करंडे

Agriculture Story : शेतकरी बहिणीच्या घरी भाऊ बहिणीला भेटण्यास गेला. बहिणीने त्याच्यासाठी जेवण बनवले. त्यामध्ये दोन प्रकारचा भात तयार केला. एक राळ्याचा आणि दुसरा शेवयाचा. शेवया गव्हापासून बनतात. गहू खाणे ही चैन मानली जात होती त्या काळातील ही गोष्ट आहे. बहिणीने नवऱ्याला शेवयाचा भात वाढला तर भावाला राळ्याचा! शेवयाच्या भातामध्ये दूध-तूप टाकले तसेच राळ्याच्या भातातही ते टाकले. परंतु शेवयासारखे राळ्याच्या भातातील दूध तूप दिसेना (राळ्याचा भातामध्ये दूध-तूप टाकले तरी ते लगेच दिसत नाही.) ते दिसेना त्यामुळे बहिणीचा नवरा पाहुण्याला दूध-तूप वाढ म्हणून आग्रह करू लागला. नवऱ्याचा मान ठेवायचा म्हणून तीही दूध-तूप वाढत राहिली. भाऊ घरी आला आणि आईकडे तक्रार करू लागला, की ताईने मला राळ्याचा तर नवऱ्याला शेवयाचा भात वाढला. आई त्यातील खुबी लक्षात आणून देत म्हणाली, ‘‘तू भात राळ्याचा खाल्ला त्याच बरोबर दूध-तूपही जास्त खाल्ले.’’ ही माझ्या आज्जीने- आक्काने- लहानपणी सांगितलेली गोष्ट. मक्याचा पाला काढताना (त्या वेळी थ्रेशर नव्हते), ती सोलताना अशा अनेक गोष्टी आक्का सांगत असे. गोष्टीमध्ये नातवंडे एवढी तल्लीन होत, की हातातले काम कधी संपले हे कळतही नव्हते. कथा त्यातील उपकथा आणि त्याला अनुभवाची जोड देत सांगितलेली गोष्ट काम संपेपर्यंत संपत नव्हती. एवढ्या खुबीने आक्का गोष्टी सांगत असे.

पुढे आम्ही महाविद्यालयात गेलो आणि आक्काला त्याच गोष्टीवर आम्ही प्रश्‍न विचारला, की तू सांगितलेल्या गोष्टीतली बहीण चतुर होती, भोळी भाबडी, प्रेमळ होती की आगाऊ होती? त्यावर ती हसली आणि म्हणाली, ‘‘तुम्ही म्हणाल तशी ती होती. परंतु ती बहीण होती.’’ आम्ही गंमतीने म्हणालो, की बहीण आगाऊच म्हणायची! त्यावर ती हसली आणि एवढेच म्हणाली, की ती जर आगाऊ असती तर तिने भावाला तुपाची बरणी बरोबर दिली नसती का?

आक्का शेतमजुराची मुलगी. जन्म १९३० च्या दरम्यानाचा. एकूण भावंडे आठ. घरची खूप गरिबी. त्यामुळे त्या सर्व भावंडांची शेतीकाम करण्याची सुरुवात ही वयाच्या सातव्या वर्षापासून होत असे. घरात काम करणारी आठ-दहा माणसे असल्यामुळे इतर मोठ्या शेतकऱ्यांची शेती ते वाट्याने करत असत. जोडीला शेळ्या, गायी, कोंबड्या असा प्रत्येक भावंडाला वाटून दिलेला शेती जोड व्यवसाय. प्रचंड मेहनत, वर्षानुवर्षे कमविलेला विश्‍वास यावर तिच्या आईने स्वकष्टाने जमीन खरेदी केली. शेतमजूर ते शेतकरी हा प्रवास आक्काच्या तोंडून ऐकणे म्हणजे एकाच वेळी शेती प्रगतीचे टप्पे ऐकणे, सचोटी, श्रम प्रतिष्ठा, ईर्षा आणि उमेद हे विषय समजून घेणे. ती आणि तिची सर्व भावंडे म्हणजे अपार कष्टाने प्रतिष्ठित झालेली अशी. त्यांना कोणी अहंकारी म्हणणार नाही, परंतु त्यांच्या स्वाभिमानी जगण्याचे अनुभव मात्र सर्वांना नेहमी येणार.

माझ्या आजोबाची ती दुसरी पत्नी. सासरी तुलनेने खूप वैभव होते. सवतीच्या (तिला हा शब्द फार खटकत असे) पाच मुली. आम्हाला चांगले कळेपर्यंत त्या तिच्या मुली नाहीत हे माहीत नव्हते. कोणत्याही प्रकारे तिने सापत्न भाव जपला नाही. त्यामुळे सापत्न भाव जपू नको किंवा दिसू देऊ नको (व्यवहारी तोडगा) असा वरवरचा संस्कार तिला तिच्या मुलांना देण्याची गरज भासली नाही. नातेवाइकांमध्ये कधी सख्ख्या दोन भावंडांमध्ये आई-वडिलांकडून थोडा भेदभाव झालेले ऐकले, की आक्काचे उदाहरण दिले जायचे. त्या वेळी आक्का खूप थोर आहे असे वाटायचे. तसे तर उदाहरण म्हणून आक्का खूप ठिकाणी असायची. ज्वारी-भुईमुगाचे वाटे देण्यात असायची, शेतमजुरांची कामाच्या प्रकारानुसार वेतन ठरविण्यात ती असायची, कामाचा मोबदला देण्यात आणि कुचराई हयगय करणाऱ्याकडून दया न दाखवता नुकसान भरपाई वसुली या दोन्ही ठिकाणी उदाहरण म्हणून आक्का असायची.

पुढे माझे शेती विषयात शिक्षण सुरू झाले. तिथे अनेक विषय शिकतानासुद्धा आक्का संदर्भ म्हणून असायची. शेतीचे अर्थशास्त्र आणि एकात्मिक शेती प्रारूप हे विषय समजून घेताना आक्काने आवर्जून सांगितलेले अनुभव लक्षात यायचेच. ती सांगायची की तिची आई मुलींची बाळंतपणे शेळ्या विकून करायची, रोजचा खर्च भागविण्यासाठी तिची भावंडे भाजीपाला विकत, सणाचा बाजार कोंबड्या विकून केला जाई. गायी- म्हशी सांभाळणे ते दूध-तुपाची विक्री करणे ही कामे तिच्याकडे असायची. त्याचे कितीतरी किस्से ती सांगायची. त्यातून त्या विषयाचे तांत्रिक, आर्थिक असे कितीतरी पैलू समजून घेता येत होते.

सध्या हरितक्रांती आणि त्याचे परिणाम, दुष्परिणाम यावर मोठी चर्चा होत असते. पारंपरिक शेती हा त्यावर पर्याय वाटतो. त्याविषयी एकदा आक्काशी चर्चा केली. त्यावर ती सुधारित बियाणे आणि जोडीला खते यामुळे उत्पादनात वाढ कशी झाली याचे अनेक अनुभव सांगू लागली. ‘पूर्वी जेवढा बियाणे म्हणून गहू पेरला तेवढा सुद्धा मिळत नसे.’ ‘पूर्वी आजारी पडल्याशिवाय फळे खायला मिळत नव्हती.’ ‘पेरणीला उशीर झाला तर घरातील मका बियाणे चांगले येत नव्हते.’ ‘मिरचीवर कीड खूप यायची त्यामुळे बियाणे बदलले’ असे कितीतरी स्वानुभव सांगून तिने हरितक्रांतीचे गोडवे गायले होते. पूर्वी पसऱ्या भुईमूग पेरला जाई, त्याच्या काढणीला मजूर खूप लागत. त्या वेळी ती अनेकांना बियाणे बदलून नवीन बियाणे घ्यावे असे सांगायची. या सगळ्यांतून बियाणे बदल हा अतिशय तांत्रिक विषय सोप्या पद्धतीने समजून घेता येत असे.

एक मुळी धान्ये हा खास तिचा शब्द. याचा अर्थ एकल पीक पद्धती. त्याला तिचा विरोध असे. शेतात किमान खाण्यापुरती पिकतील एवढी गरजेची सर्वच पिके असली पाहिजेत, पैशाच्या गरजा भागतील यासाठी दोन-तीन पिके असावीत असा तिचा आग्रह असे. जोडीला व्यवसाय असावा हे सांगताना ती म्हणायची, की प्रत्येकाला शेतीकाम सोडून अजून काही तरी काम असावे; कारण शेतात कुठे वर्षभर सर्वांना पुरेल एवढे काम असते? हे सांगताना शेतीतील छुपी बेकारी या विषयावर ती बोलते आहे, असे पटकन लक्षात येत असे. माझे शिक्षण पूर्ण होत असतानाच राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या हा विषय जोरकसपणे चर्चेला आला होता. आक्काशी या विषयावर बोललो. तिला त्याविषयी मोठी वेदना जाणवली. पुढच्याच क्षणी ती म्हणाली, की आपली लढाई आपल्यालाच लढावी लागते. आयुष्यात दहा दुष्काळ पाहिले, परंतु या ‘शेळी़’ने असा काही विचार करावा अशी वेळ आणली नाही. वयाच्या ऐंशी वर्षापर्यंत ती शेळ्या पाळत होती. माझी एक आत्या गडगंज घरी दिलेली. पुढे परिस्थिती हलाखीची झाली. अक्काचा आग्रह एखादी शेळी घे. तिच्या घरी शेळी पाळणे कमीपणाचे मानले जाई. शेवटी एकदा अक्काने तिला शेळीच भेट म्हणून दिली. आज त्या आत्याची पुढची पिढीसुद्धा शेळीपालन करीत आहे.

आक्का तू खूप नशीबवान आहेस, असे कोणी म्हणाले, की ती म्हणायची, ‘‘हो लहानपणी साप गारुड्याचा, डोंबाऱ्याचा खेळ पाहत होते. आज मोबाइल, टीव्हीवर हरिपाठ ऐकते. कशाचे पथ्य नाही. सर्व काही खाऊ शकते.’’ अशी तिची उत्तरे असत. ती निरुत्तर कधी होत नसे. याची आम्हाला कधी गंमत वाटे आणि कौतुक सुद्धा.

शेतीतले निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य तिला नसेल; परंतु घेतलेले निर्णय कमी नुकसानकारक ठरावे याच्यासाठीची तिची जीवतोड मेहनत आम्ही पहिली आहे. कदाचित तिला निर्णय स्वातंत्र्य असले असते, तर शेतीतील नुकसान कमी होऊन वैभवात आणखी भर पडली असती. शेतीतील महिलांचे योगदान हा विषय चर्चेला आला की ती म्हणे, “मोट ओढणारा मोटकरी आणि दारे धरणारी/पाणी भरणारी त्याची कारभारीन असल्याशिवाय मळा पिकत नसतो” त्यात शेती किफायतशीर होण्यासाठी पुरुष आणि महिला या दोघांचे योगदान हवे असे तिला सुचवायचे असे. महिलांशिवाय फायद्याची (तिचा शब्द नुगुतीने आणि काटकसर करून) शेती शक्य होत नाही. त्याला ती अनेक दाखले देई. त्यात गावातील विधवा महिला कशा कर्जमुक्त झाल्या, तिच्या समवयस्क महिलांनी सर्व सूत्रे हातात घेऊन सावकारी जप्तीपासून शेती कशी वाचवली असे दाखले असत.

शेतकरी महिला म्हणून आक्काचे उदाहरण संदर्भ म्हणून घेऊन थोडा अभ्यास केला की लक्षात येते. ज्या कुटुंबात एकात्मिक पद्धतीने शेती केली जाते, महिला निर्णय घेतात त्यांचे तुलनेने बरे चाललेले असते. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या बायका त्याच जमिनीच्या तुकड्यावर शेती करत आहेत, हिमतीने उभ्या आहेत. हे सर्व पाहिले की वाटते, शेतकरी महिला हा सर्वांनीच बेदखल केलेला विषय आहे. शेतीचा अभ्यास करताना, शेतीची धोरणे ठरवताना शेतात काम करणाऱ्या महिलांशी नक्की चर्चा केली पाहिजे. आक्का आणि तिच्या भावंडांच्या जन्माच्या वेळा आणि शेतीची कामे यातल्या गंमतीजमतींविषयी खूप सांगण्यासारखे आहे. म्हणजे लसूण काढणी दरम्यान कोण जन्मले, सुगीच्या वेळी कोणाचा जन्म झाला वगैरे. तिच्याशी गप्पा मारताना अशा असंख्य आठवणींची पोतडी उलगडली जायची.

वयाच्या ९७ व्या वर्षी अगदी शांतपणे ती गेली. ती गेल्यानंतर एका मित्राने प्रश्‍न केला की ती आनंदी होती का? ती समृद्ध जीवन जगली त्यामुळे ती आनंदी असणारच, असं उत्तर मी दिलं. पण काही वेळाने मनात विचार आला, की हा प्रश्‍न आपण आक्काला कधीच विचारला नाही. विचारला असता तर नक्कीच नेहमीसारखे वेगळे उत्तर मिळाले असते. विचार करायला लावणारे असे.

(लेखक एमकेसीएल नॉलेज फाउंडेशनच्या शाश्‍वत शेती विकास मिशनचे सल्लागार आहेत. ८८०५२९२०१०)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation : टेंभूच्या लाभक्षेत्रानजीक उंचीवरच्या १५०० हेक्टर शेतीला मिळणार पाणी

Watermelon Harvesting : कलिंगड आले काढणीवर, पावसाने पिकाचे नुकसान

Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेच्या १२ जागांबाबत कोणतीही तडजोड नाही; मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका

Rabi Season 2024 : खानदेशात रब्बीत सोयाबीनचे क्षेत्र वाढणार

Crop Damage Compensation : वादळाच्या नुकसानीची भरपाई मिळेना

SCROLL FOR NEXT