Oil Production
Oil Production Agrowon
ॲग्रो विशेष

Oil Production : शारीरिक व्याधींमधून सावरत हिमतीने साधली तेलनिर्मिती

Suryakant Netke

सूर्यकांत नेटके

Oil Seeds : कर्जत (जि. नगर) येथील किशोर तनपुरे यांना कोरोना काळात प्रचंड शारीरिक त्रास सहन करावा लागला. शस्त्रक्रियाही झाली. पण हिंमत न हारता त्यांनी त्यातून सावरत लाकडीघाण्याद्वारे तेलनिर्मिती व्यवसाय त्यांनी आकारास आणला असून, त्याचा शंभू’ ब्रॅण्ड चर्चेत आला आहे. जोड म्हणून डाळ मिल व्यवसायही सुरू करीत उत्पन्नाच्या वाटा रुंद केल्या आहेत.

नगर जिल्ह्यातील कर्जत हा दुष्काळी तालुका आहे. तालुक्यातील वडगाव तनपुरे येथील मूळ राहिवासी असलेले किशोर तनपुरे अनेक वर्षांपासून कर्जत शहरात राहतात. त्यांचे बंधू प्रदीप अभियंता असून, नोकरीनिमित्त अमेरिकेत स्थायिक आहेत, तर बहीण ज्योती पुण्यात डॉक्टर आहेत. किशोर यांचे ‘डी.फार्मसी’चे शिक्षण झाले आहे. गावाकडे वडिलोपार्जित अल्प शेती असल्याने ते कर्जतमध्ये वीस वर्षांपासून ‘मेडिकल’चे दुकान चालवतात. वडील प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. मुख्य व्यवसाय सांभाळताना किशोर यांनी शेतीची आवडही जपली. साडेतीन वर्षांपूर्वी वडील, भाऊ यांच्या मदतीने कर्जत शिवारात पाच एकर शेती खरेदी केली. व्यावसायिक दृष्टिकोन पहिल्यापासून होताच. त्यामुळेच उत्पन्नाची आणखी जोड देण्यासाठी प्रक्रिया उद्योग सुरू करावा असे त्यांना वाटले.

पण कोणता उद्योग करावा त्यास एक पार्श्‍वभूमी कारणीभूत ठरली. किशोर यांना पहिल्या लाटेतच कोरोनाची बाधा झाली. त्यांना डॉक्टरांकडून दररोजच्या आहारातील तेल हे लाकडी घाण्यातील असावे असा सल्ला देण्यात आला. लातूर व भिगवण (जि. पुणे) येथून ते उपलब्ध झाले. दोन- तीन महिने या तेलाचा वापर केल्यानंतर व या तेलाला असलेली मागणी पाहिल्यावर आपण स्वतःच या तेलाची निर्मिती का करू नये असा विचार सुरू झाला. सहा महिन्यांपूर्वीच जमीन खरेदी केली होती. ती देखील उपलब्ध होती. कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करून हा व्‍यवसाय सुरू करण्याचा निर्णय झाला.

कोरोनाचे संकट आणि व्यवसाय वाटचाल

लातूर भागात जाऊन तसेच पुढे तमिळनाडू येथे जाऊन सहा लाख रुपये खर्च करून दोन लाकडी घाणे आणले. पंधरा लाख रुपये खर्च करून युनिटसाठी शेड उभारले. कोरोना काळात किशोर यांना प्रचंड शारीरिक त्रास सहन करावा लागला. पुण्यात ते दवाखान्यात दाखल होते. व्याधी इतकी विकोपाला गेली की त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. त्यानंतर किशोर यांना हालचाली करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मर्यादा आल्या. तरीही त्यातून हळूहळू सावरत त्यांनी तेलनिर्मिती सुरू केली. अनेक शेतकरी स्वतः तेलबिया आणून तेल काढून नेत. आज करडई, शेंगदाणा, सूर्यफूल, तीळ, खोबरे, मोहरी, जवस अशी तेलांची श्रेणी विस्तृत केली आहे. मालाच्या प्रकारानुसार प्रति लिटर ३०० पासून ते पाचशे, ८०० रुपये दराने विक्री केली जात आहे.

कच्चा माल

कच्चा माल म्हणून वर्षाला काही क्विंटलपासून ते काही टनांपर्यंत गरज असते. त्यासाठी शेतकऱ्यांकडून थेट खरेदीला प्राधान्य असते. यात हमाली, तोलाई आदी खर्च वाचून शेतकऱ्यांचाही फायदा होऊ शकतो. त्यांच्याकडून विशेषतः भुईमुगाच्या थेट खरेदीसाठी किशोर यांनी जाहिरातीद्वारे निवेदनही प्रसिद्ध केले होते. त्यासाठी शेंगा फोडणी यंत्राची खरेदीही केली आहे. बार्शी, लातूर भागांतूनही कच्च्या मालाची खरेदी होते.

विक्री व्यवस्था

गुणवत्ता ठेवल्याने परिसरात या तेलाची लोकप्रियता होऊ लागली. साहजिकच किशोर यांचा घाणा चर्चेत येऊ लागला. शस्त्रक्रिया होऊन काहीच दिवस झाल्याने अद्याप प्रवास करण्यावर काही बंधने आहेत.
मात्र किशोर यांनी जिद्दीने व हिमतीने पुढे जात विक्री व्यवस्था मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. थेट ग्राहकांना विक्री करण्यावर भर आहेच. शिवाय कर्जतमध्ये असलेल्या मेडिकल दुकानामुळे हे काम अजून सोपे झाले. सध्या याच शहराबरोबर राशीन येथील मेडिकल दुकानांमधूनही तेल उपलब्ध केले आहे. आजमितीला महिन्याला ८०० ते एक हजार लिटर तेलाची निर्मिती व विक्री होत आहे.

डाळ मिलची जोड

तेलनिर्मिती व्यवसायात आत्मविश्‍वास आल्यानंतर आता डाळ मिल व्यवसायातही किशोर यांनी पाच महिन्यांपूर्वी पाऊल टाकले आहे. दिवसाला २०० ते ३०० किलो डाळ तयार करण्याची क्षमता असलेले यंत्र खरेदी केले. सध्या दिवसाला ८० ते १०० किलो डाळ तयार होते. परिसरातील शेतकरी
आपल्याकडील कच्चा माल घेऊन येतात. भांडवलाअभावी अजून ‘ड्रायर’ घेणे शक्य नसल्याने ऑक्टोबर ते मे या कालावधीतच हा व्यवसाय सुरू ठेवता येणार आहे. विना पॉलीश असल्याने
अशा नैसर्गिक पद्धतीच्या डाळींना मागणी आहे. त्याचबरोबर सेंद्रिय गूळ व हळदीची विक्रीही सुरू केली आहे. व्यवसायाची ओळख ठळक व्हावी म्हणून तेल, डाळींचा शंभू हा ब्रॅण्ड तयार केला आहे.
यंदा शेतकऱ्यांना मागणीनुसार पंधरा हजार किलो डाळ तयार करून दिली.

पेंडीपासून उलाढाल

तेलनिर्मितीतील उपपदार्थ असलेल्या विविध पेंडींनाही पशुखाद्य म्हणून चांगली मागणी आहे. त्यातून
वर्षाला दोन ते तीन लाखांपर्यंत उलाढाल होत आहे. वर्षाकाठी शेंगदाण्यापासून दीड हजार किलो पेंड मिळते. त्याची पन्नास रुपये प्रति किलोने विक्री होते. सूर्यफुलापासून अडीच हजार किलो तर करडईपासून ३५०० किलो पेंड मिळते. त्यास व खोबरा पेंडीस तीस रुपये प्रति किलो दर मिळतो.

शेतीतही प्रगती

किशोर यांना वडील जालिंदर, आई सुरेखा व पत्नी ज्योती यांचीही साथ मिळते. व्यवसाय सांभाळताना त्यांनी शेतीकडेही दुर्लक्ष केलेले नाही. सीताफळ, पेरू, आंबा अशी फळबाग विकसित केली आहे.
पाण्याची टंचाई जाणवत असल्याने दीड लाख लिटर क्षमतेची सिमेंटची टाकी बांधली आहे.
ती उंचावर असल्याने पंपाचा वापर न करता ठिबकद्वारे पाणी देण्यात येते.

किशोर तनपुरे, ९५०३२६५५५५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT