Oil Production : घाणा यंत्रावर तेलनिर्मिती व्यवसायाचा होतोय विस्तार

बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन नगर जिल्ह्यात अनेक कुटुंबांनी लाकडी घाणा तसेच छोट्या यंत्राच्या माध्यमातून तेल निर्मितीचा घरगुती व्यवसाय सुरू केला. गेल्या पाच वर्षांत हा व्यवसाय चांगला विस्तारला आहे. लाकडी घाण्यावरील तेलाला चांगली मागणी आहे.
Oil Production
Oil ProductionAgrowon

ग्रामीण भागातील प्रयोगशील शेतकरी (Farmer) तसेच तरुण शेतीसोबत छोटे पूरक आणि प्रक्रिया उद्योगाला प्राधान्य देत आहेत. अन्न व औषध विभागाकडून (Food And Drug Department) मिळालेल्या माहितीनुसार नगर जिल्ह्यात अलीकडच्या पाच ते सात वर्षांत नगर, राहुरी, राहाता, नेवासा, कर्जत, संगमनेर, पारनेर, शेवगाव, जामखेड आदी तालुक्यांच्या ग्रामीण भागात लाकडी घाणा, तसेच अत्याधुनिक छोट्या यंत्रांचा तेल काढण्यासाठी वापर वाढला आहे.

Oil Production
Farmer Insurance : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेसाठी करा अर्ज

नगर जिल्ह्यासह राज्याच्या अनेक भागात आता हळूहळू तेलनिर्मिती प्रक्रिया उद्योगाचा विस्तार होताना दिसत आहे. सध्या लाकडी घाणा तसेच लहान यंत्रातून तेलनिर्मिती करण्याचा प्रक्रिया उद्योग सुरु करण्यावर शेतकरी, सुशिक्षित बेरोजगारांचा भर आहे. नगर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत साडेचारशेपेक्षा अधिक कुटुंबांनी हा व्यवसाय सुरू केला आहे.

Oil Production
Palm Oil Import : पाम तेलाच्या दरात वाढ

तेल काढण्यासाठी लागणाऱ्या घाण्याची किंमत एक लाखांपासून ते दहा लाखांपर्यंत आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी अडीच ते बारा लाखांपर्यंत गुंतवणूक करावी लागते. अलीकडे अत्याधुनिक घाण्यासह तेल काढण्यासाठी छोटी यंत्रे उपलब्ध आहेत. पंचवीस हजारांपासून पाच लाखांपर्यंत ही यंत्रे बाजारात उपलब्ध आहेत. एक घाणा तसेच लहान यंत्राच्या कामावर दोन ते चार मजूर काम करतात. त्यामुळे ग्रामीण भागात रोजगार तयार झाला आहे.

हजारो टन तेलबियांची खरेदी ः
- लाकडी घाणा, यंत्रातून तेलनिर्मिती उद्योग सुरू झाल्यापासून तेलबियांची मागणी वाढू लागली आहे. हा व्यवसाय करणारे व्यावसायिक स्थानिक बाजार तसेच गुजरातमधून शेंगदाणा खरेदी करतात. सूर्यफूल, करडईची सोलापूर, मराठवाड्यासह परराज्यांतून खरेदी केली जाते.

- तीळ, जवस, मोहरी, खोबरे, बदाम, अक्रोड तेलाची मागणी कमी असल्याने स्थानिक बाजारातून खरेदी होते. एकट्या नगर जिल्ह्याचा विचार केला तर दरवर्षी हजारो टन तेलबियांची व्‍यावसायिकांकडून खरेदी होते.
- नगर जिल्ह्यात वर्षभरात छोट्या प्रक्रिया व्‍यवसायातून पन्नास कोटींपर्यंत उलाढाल होत असल्याचा अंदाज आहे.
- गेल्या दीड वर्षात तेलबियांच्या दरात मोठी वाढ झाली. त्‍यामुळे प्रक्रियेमध्ये उत्पादन खर्च वाढला, परंतु लगेचच तेल दरात वाढ करता आली नसल्याने त्याचा काही अंशी फटका बसला आहे.

Oil Production
Agri Tourism : विषमुक्त शेतीतून कृषी पर्यटनाला आधार

...अशी होते प्रक्रिया
- सर्वसाधारण लाकडी घाण्यातून साधारण सव्वा तासाला १२ ते १४ किलो तेलबियांवर प्रक्रिया होऊन तेल निर्मिती होते. दिवसभरात एका घाण्यापासून ६० ते ८० लिटर तेल तयार होते. तेल व पेंड वेगवेगळी होते. पेंड पूर्णतः कोरडी निघाल्याने वाळवण्याची गरज नाही.

- काढलेले तेल एका पातेल्यात साठवतात. त्यामुळे तेलातील गाळ बाजूला होतो, शुद्ध तेल राहते. त्याची गाळणी केली जाते. दोन ते तीन दिवसांनंतर त्याचे पॅकिंग करून ते मागणीनुसार विक्री करतात. मागणीनुसार १०० ग्रॅमपासून पाच लिटरपर्यंत पॅकिंग करण्यावर भर आहे. पॅकिंगनंतर चार ते सहा महिने तेल टिकू शकते.

थेट ग्राहकांना विक्री ः
लाकडी घाणा, यंत्रातून तयार केलेल्‍या तेलाला मागणी अधिक आहे.
व्यावसायिक थेट ग्राहकाला तेलाची विक्री करण्यावर भर देतात. त्यासाठी अलीकडच्या काळात सोशल मिडियाची मदत होत आहे. नगर येथील उमेश डोईफोडे यांनी सांगितले की, मी पाच वर्षापासून हा छोटासा प्रक्रिया व्यवसाय सुरू केला होता.

हळूहळू याचा विस्तार केला. वर्षभरात ९०० ते एक हजार लिटर तेलाची विक्री करतो. नगर शहरातील पाइपलाइन रस्त्यावर तेल विक्रीसाठी दुकान सुरू केले. या तेलात नैसर्गिकपणा असल्याने मागणी अधिक आहे. अनेक ग्राहक थेट मागणी करतात. वारुळवाडी येथील वेदप्रकाश सिंह हे पुणे, मुंबई व अन्य मोठ्या शहरात थेट ग्राहक, सोसायटी, संस्थांशी संपर्क करून मागणीनुसार तेलाची विक्री करतात.

पेंडीला मोठी मागणी ः
- तेल काढल्यानंतर तयार झालेल्या पेंडीला चांगली मागणी आहे. शेंगदाण्याचे एक लिटर तेल तयार झाल्यावर २ किलो पेंड निघते. शेंगदाणा पेंडीला प्रति किलो ४० ते ५० रुपये दर मिळतो. शेतकरी ही पेंड पशू, कोंबडी खाद्यासाठी खरेदी करतात.

- करडईचे एक किलो तेल तयार झाल्यावर अडीच किलोपर्यंत पेंड निघते. करडई पेंडीला २० ते २५ रुपये प्रति किलो दर मिळतो. पशुखाद्यासाठी पेंडीला मागणी आहे.
- तीळ, जवस, मोहरी, बदाम, अक्रोड, खोबरे आदीचे एक किलो तेल निघाल्यानंतर दोन ते अडीच किलो पेंड निघते. ही पेंड पशू खाद्यासाठी वापरली जाते.
- घरगुती, छोट्या तेल प्रक्रिया उद्योगातून नगर जिल्ह्यात दरवर्षी सुमारे दीड हजार टन पेंड तयार होते.

Oil Production
Crop Insurance Company : बुलडाण्यात पीकविमा कंपनीची कार्यालये बंद

प्रति किलो तेलासाठी लागणाऱ्या तेलबिया ः
- शेंगदाणा ः अडीच ते तीन किलो.
- खोबरे ः दोन ते सव्वादोन किलो.
- तीळ, जवस, मोहरी ः तीन ते चार किलो.
- करडई, सूर्यफूल ः चार ते साडेचार किलो.
- एरंडी ः तीन ते सव्‍वातीन किलो.
- अक्रोड, बदाम ः अडीच ते पावणेतीन किलो.

प्रति किलो तेलाचा दर (रुपये) ः
शेंगदाणा ः ३०० ते ३३०, खोबरे ः ४०० ते ५००, तीळ, जवस, मोहरी ः ४०० ते ५५०, करडई, सूर्यफूल ः २८० ते ३३०, एरंडी ः ४०० ते ५००, अक्रोड, बदाम ः २५००.
(टीप ः बाजारपेठेतील तेलबियांच्या उपलब्धतेनुसार तेलाच्या दरात चढ-उतार होतात.)

‘‘मी दोन वर्षांपूर्वी स्वखर्चातून लाकडी घाण्यातून तेल निर्मितीचा घरगुती व्यवसाय सुरू केला. आता त्याचा विस्तार करत आहे. या तेलात नैसर्गिकपणा असल्याने ग्राहकांची मागणी आहे. या छोट्या प्रक्रिया व्यवसायामुळे कुटुंब सावरण्याला मदत झाली.’’
- किशोर तनपुरे, वडगाव तनपुरे (ता. कर्जत, जि. नगर)

‘मी पाच वर्षांपासून तेलनिर्मिती व्यवसाय सुरू केला. दर्जेदार तेलनिर्मिती आणि विक्रीतून विश्‍वास संपादन झाल्याने ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या प्रक्रिया व्यवसायामुळे हक्काचा रोजगार मिळाला. लोकांना शुद्ध व नैसर्गिक तेल मिळते.
- उमेश डोईफोडे (नगर), ९७६७१०१०८७

‘‘मी बिहारवरून शिक्षणासाठी नगरला आलो. अभियांत्रिकीचे शिक्षण झाल्‍यानंतर काही काळ एका शेतकरी कंपनीत नोकरी केली. बॅंकेचे कर्ज घेतले, आठ लाखांची गुंतवणूक करून तीन वर्षांपासून लाकडी घाण्यावर तेल निर्मिती व्यवसाय सुरु केला. आता वर्षाला चाळीस लाखांपर्यत उलाढाल होते. वर्षभर तीन मजुरांना रोजगार दिला आहे.’’
- वेदप्रकाश सिंह (वारुळवाडी, जि. नगर)

प्रक्रिया केलेल्या रिफाइंड तेलाएवजी घाणा, यंत्रातून तयार केलेले तेल खरेदीकडे लोकांचा कल वाढतो आहे. त्यामुळे ग्रामीण भागात तेल घाणा, छोट्या यंत्रातून तेल प्रक्रिया उद्योगाला गती मिळाली आहे. यामध्ये शेतकरी कुटुंबातील युवक अधिक आहेत. या उद्योगासाठी हे युवक अन्न व औषध प्रशासनाकडून अधिकृत परवाने घेत आहेत.
- संजय शिंदे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com