Sugarcane Production Update : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुका हा उसाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील वाळकी गावही याच पिकासाठी ओळखले जाते. या भागातील अनेक शेतकरी एकरी शंभर टन उत्पादन साध्य करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याबरोबर नवीन पद्धतीचाही अवलंब होत आहे.
गावातील बाजीराव व विकास या चोरमले बंधूंची एकत्रित वडिलोपार्जित एकूण ५० एकर बागायती शेती आहे. त्यांच्याकडे सुमारे ३० एकरांवर आडसाली उसाचे क्षेत्र असते.
एकरी शंभर टनांहून अधिक उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट ठेवूनच त्यांचे व्यवस्थापन असते. दोघा बंधूंचे वडील माजी सरपंच असून, त्यांचाच ऊसशेतीचा वारसा दोघे बंधू चालवत आहेत.
जमीन सुपीकता व यांत्रिकीकरण
विकास यांचा ऊसशेतीत दहा वर्षांचा अनुभव तयार झाला आहे. सांगली जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकरी सुरेश कबाडे आणि दौंडचे कृषी- आत्मा विभागाचे अधिकारी महेश रूपनवर यांचे मार्गदर्शन त्यांना लाभते.
जमिनीची सुपीकता, सेंद्रिय कर्ब वाढविण्यावर विकास यांनी भर दिला आहे. त्यासाठी आधुनिक यंत्रे व अवजारांचा वापर ते करतात. त्यासाठी सुमारे १५ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे.
दोन ट्रॅक्टर्स, मल्चर, रोटाव्हेटर, नांगर, डबल पल्टी नांगर, कल्टिव्हेटर, रेजर आदींची बँकच त्यांच्या शेतात पाहण्यास मिळते. त्यातून मनुष्यबळ, खर्च, पैसे यात त्यांनी बचत साधली आहे.
पाचटाची कुट्टी करणारे यंत्र
या यंत्राचे वजन सुमारे ४८० किलो आहे. यात एकूण वीस पाती (ब्लेड्स) असून, ती इंग्रजी ‘वाय’ आकाराची आहेत. हे यंत्र सहा फुटांच्या जागेत कार्य करते. त्याची गती दोन हजार आरपीएम आहे. यंत्रांच्या संरक्षणासाठी सुविधा दिली आहे.
५० एचपी क्षमतेच्या ट्रॅक्टरला ते जोडता येते. त्याचा देखभालीचा खर्चही फारसा नाही. आडसाली ऊस व खोडवा तुटून गेल्यावर याप्रकारे वर्षातून दोन वेळा त्याचा वापर करता येतो.
मल्चरचा उपयोग
तीन वर्षांपूर्वी दीड लाख रुपयांना मल्चर घेतले आहे. याचा वापर प्राधान्याने दरवर्षी होतो. हे यंत्र खोडवा उसातील खोडक्यांचे तुकडे करण्याचे काम करते. शिवाय उसाच्या फुटव्याजवळ असलेले पाचट सरीत दाबणे व उसाच्या बगलेत असलेली माती पाचटावर टाकण्याचे काम करते.
त्यामुळे फुटवा सशक्तपणे येऊन पीक जोमात येते. हे यंत्र अत्यंत छोट्या आकारात पाचटाची कुट्टी करते. त्यावर युरिया एकरी ५० किलो, एसएसपी दोन बॅग व जिवाणू कल्चर यांचा वापर केल्यास दोन महिन्यांच्या कालावधीत चांगली कुजून त्याचे खत तयार होते.
ताग, धैंचा, गव्हाच्या काडाची कुट्टी करण्यासाठीही यंत्राचा फायदा होतो. वजनदार व मजबूत यांत्रिक रचना असल्याने जमिनीत काम करताना हादरे बसत नाहीत. अपेक्षित कुट्टी होण्यास मदत होते. केवळ ट्रॅक्टरचालक यंत्र चालविण्यासाठी पुरेसा ठरतो. दोन तासांत एका एकरावरील काम होऊ शकते.
शेणखत व कोंबडी खताचा वापर
घरची १० ते १२ जनावरे असल्याने शेणखत उपलब्ध होते. शिवाय दरवर्षी कोंबडी खताचा वापर एकरी ७० बॅग्ज (प्रति ४० किलोची) एवढा होतो. जमिनीला अनेक वर्षांपासून सेंद्रिय घटकांचा वापर सुरू असल्याने पूर्वी ०.४ टक्का असलेला सेंद्रिय कर्ब आता ०.९ पर्यंत वाढला असल्याचे विकास सांगतात.
पाचट कुट्टीमुळे पाण्याचे बाष्पीभवनही कमी झाले आहे. जिवाणूंची संख्या वाढून जमीन भुसभुशीत झाली आहे. शिवाय दरवर्षी वापरत असलेल्या रासायनिक खतांवरील खर्च आता ३० ते ४० टक्क्यांनी कमी झाला आहे.
तणांच्या नियंत्रणासाठी मजुरी व तणनाशकांवरील खर्चही कमी झाला आहे. जमीन सुपीक झाल्याचा फायदा कांदा, गहू, हरभरा आदी पिकांना चांगल्या प्रकारे झाला आहे. पाचटाची कुट्टी करून शेतात वापरल्याने पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत झाली आहे.
ऊस उत्पादनात वाढ
विकास यांनी एक डोळा, दोन डोळा पद्धतीने व रोप लागवड अशा विविध पद्धतींनी लागवड करून उत्पादनातील फरक पाहिले आहेत. रोप लागवड पाच बाय दीड फुटावर असते. कांडी लागवड असल्यास पाच फुटी सरीचा वापर केला आहे. को ८६०३२ या वाणाची व आडसाली हंगामाचीच ते निवड करतात. पूर्वी उसाचे एकरी ७० ते ८० टनांपर्यंत उत्पादन त्यांना मिळायचे.
अलीकडील वर्षापासून त्यांना एकरी ९० टनांच्या पुढे उत्पादन मिळू लागले आहे. एका प्लॉटमध्ये मागील वर्षी एकरी ११० टनांपर्यंत, यंदा दोन ते तीन प्लॉटमध्ये ९५ टन तर एका प्लॉटमध्ये १०२ टनांपर्यंत उत्पादन मिळाले आहे.
संपर्क - विकास चोरमले, ९८७५९५९५९५
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.