Loan Recovery Amaravati News : अंजनगावसुर्जी तालुक्यातील लखाड येथील एका शेतकऱ्याकडून बँक ऑफ महाराष्ट्रने केलेल्या कर्जवसुली प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली. याबाबत तत्काळ चौकशीचे आदेश दिले. वेळ पडल्यास व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अंजनगावसुर्जी तालुक्यातील लखाड येथील शेतकरी रमेश सावरकर यांच्या जवळ अडीच एकर शेती असून २०१६ मध्ये त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्राचे ९५ हजार रुपये कर्ज घेतले होते. २०१९ च्या कर्जमाफीसाठी पात्र यादीत त्यांचे नाव असतानासुद्धा बँक ऑफ महाराष्ट्राच्या व्यवस्थापकांनी त्यांच्याकडे कर्ज वसुलीचा तगादा लावला होता.
अंजनगाव लोकन्यायालयात बँक ऑफ महाराष्ट्रने सदर प्रकरण दाखल करून त्यांना नोटीस दिली होती. ७२ हजार रुपयात तुमचे सेटलमेंट करण्यात आल्याचे बँक व्यवस्थापकांनी सदर कास्तकाराला सांगितले होते.
मात्र त्यानंतरही बँक व्यवस्थापकांनी सदर कास्तकाराची दोन लाख रुपयांच्या फिक्स डिपॉझिटमधील एक लाख ८६ हजार रुपये कर्ज खात्यात परस्पर वळते करून घेतले. त्यामुळे सदर कास्तकार बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आत्महत्या करण्याच्या विचाराने गेले होते.
याप्रकरणाची दखल जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी घेतली असून चौकशीचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे. चौकशी होताच बँक ऑफ महाराष्ट्राचे अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्या विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
या प्रकरणाची तक्रार लखाड येथील शेतकरी रमेश सावरकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रत्यक्ष भेटून केली आहे. या प्रकरणात बँक अधिकाऱ्यावर काय कारवाई होते, याकडे अंजनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या व्यवस्थापकाविरुद्ध तक्रारी वाढल्या असताना वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
अन् जिल्हाधिकारी गहिवरल्या
जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात रमेश सावरकर या अल्पभूधारक शेतकऱ्याने बँक ऑफ महाराष्ट्रने अन्यायकारक केलेल्या कर्जवसुलीची तसेच बँकेच्या समोर आत्महत्या करण्याच्या विचाराची आपबिती सांगितली. तेव्हा जिल्हाधिकारी पवनीत कौर दोन मिनिटे स्तब्ध होऊन अक्षरशः गहिवरल्या आणि तुम्ही असे करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा धीर देऊन बँकेच्या चौकशीचे आदेश दिले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.